News Flash

काळजी घ्या हृदयाची

हृदयविकाराच्या झटक्याचे सहसा आढळणारे लक्षण म्हणजे छातीत दुखणे. छातीतल्या या वेदना सर्वसाधारणत: ब्रेस्ट

| November 9, 2013 01:04 am

हृदयविकाराचा झटका कसा लक्षात येतो?
हृदयविकाराच्या झटक्याचे सहसा आढळणारे लक्षण म्हणजे छातीत दुखणे. छातीतल्या या वेदना सर्वसाधारणत: ब्रेस्ट बोनपासून (स्टरनम वा प्रीकॉर्डियम) सुरू होतात. जबडय़ात, दातात वेदना होणे, दोन्ही हात- विशेषत: डावा हात दुखणे, पोटाच्या वरच्या भागात दुखण्यापर्यंत या वेदना पोहोचतात. या वेदनांचे वर्णन करताना रुग्ण घुसमटल्यासारखे वाटत असल्याचे सांगतात. जणू कुणीतरी त्यांच्या छातीवर बसले असावे, असे वर्णन रुग्ण करतात. काही रुग्णांना छातीत दुखत नाही. हे रुग्ण बहुतेक वेळा मधुमेही असतात. या प्रकारच्या हृदयविकाराच्या झटक्याला ‘सायलेंट हार्ट अटॅक’ म्हणतात. अशा वेळी मधुमेही रुग्णांना श्वास अपुरा पडतो आणि इतरांसारख्या छातीत वेदना होत नाहीत. छातीत धडधडणे, हृदयाचे ठोके वाढल्यासारखे वाटणे, घाम येणे, खूप थकवा येणे, काही वेळा बेशुद्ध पडणे ही लक्षणेही हृदयविकाराच्या झटक्याची असू शकतात.
कोणत्या वयात हृदयाची तपासणी करून घ्यावी?
हृदयाची तपासणी करून घेण्यासाठीचे आदर्श वय प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळे असू शकते. हृदयविकाराचा अधिक धोका असणाऱ्या व्यक्तींनी तिशीच्या आसपासच तपासणी करून घ्यायला हवी. इतरांनी चाळिशीच्या दरम्यान किमान एकदा तरी हृदयाचे ‘क्लिनिकल स्क्रिनिंग’ करून घ्यायला हवे.
हृदयविकाराचा अधिक धोका असणाऱ्या व्यक्ती म्हणजे ज्यांना हृदयविकाराच्या झटक्याची कौटुंबिक पाश्र्वभूमी आहे- उदा. आई, वडील, भाऊ, बहीण आदिंपैकी कुणालातरी हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे अशा व्यक्ती. याबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कॉलेस्टेरॉलची उच्च पातळी असलेल्या व्यक्तीही धोका असलेल्या गटातच येतात. सततची तणावपूर्ण जीवनशैली असणारी मंडळी, धूम्रपान, तंबाखूचे व्यसन असलेले लोक यांनाही हृदयविकाराचा धोका आहेच.
धोका असलेल्या व्यक्तींसाठी तपासण्या करण्याचे ‘कट ऑफ’ वय ३० वर्षे म्हणण्याचे कारण इतकेच की डॉक्टरांच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये हल्ली तिशीतील रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. अगदी २५ आणि २७ वर्षांच्या तरूणांनाही हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना दिसून येतात.
तपासण्या कोणत्या कराव्यात?..
संभाव्य हृदयविकाराचा झटका किंवा ‘कोरोनरी आर्टरी डिसिझ’ वेळीच टाळण्यासाठी प्रत्येकाने सर्वप्रथम स्वत:चे परीक्षण करावे. स्थूल व्यक्तींनी आपला ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) तपासावा. व्यक्तीचे वजन किलोग्रॅममध्ये मोजून त्याला मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागले की व्यक्तीचा बीएमआय मिळतो. हा बीएमआय १९ ते २५ यादरम्यान असेल तर आपले वजन योग्य असल्याचे समजावे. २५ ते ३० यादरम्यान असलेला बीएमआय व्यक्तीचे वजन जरूरीपेक्षा अधिक असल्याचे (ओव्हरवेट) दर्शवतो, तर ३० पेक्षा अधिक बीएमआय असणे लठ्ठपणाचा (ओबेसिटी) निदर्शक आहे. २५ पेक्षा अधिक बीएमआय हृदयविकाराचा धोका असणाऱ्या गटातील ठरू शकतो.
हृदयविकारासाठी ‘सिरम लिपिड प्रोफाईल’ ही चाचणी करायला सांगितले जाते. कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी आणि रक्तातील साखर तपासण्यासाठी मधुमेही रुग्णांनी ‘फास्टिंग’ म्हणजे उपाशीपोटी आणि ‘पोस्टप्रँडिअल’ म्हणजे जेवणानंतर या चाचण्या करून घ्याव्यात. एस. होमोसिस्टिन पातळी आणि सी. रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटिन पातळीही तपासून घ्यावी. या चाचण्या काहीशा महाग आहेत, पण त्या ‘कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज’विषयी (सीव्हीडी) माहिती देणाऱ्या आहेत.
‘इलेक्ट्रोकार्डिओग्राम’ (ईसीजी) आणि व्यायाम करताना ईसीजी चाचणी करण्यासाठी असलेली ‘ट्रेड मिल टेस्ट’ ही चाचण्यांची पुढची पायरी आहे. ‘एकोकार्डिओग्राम’ ही आणखी एक चाचणी हृदयविकारासाठी केली जाते. ही चाचणी हृदयाचे काम तपासण्यासाठी आणि हृदयाच्या विविध वॉल्वची हालचाल पाहण्यासाठी असते. त्यात कोंडलेल्या धमन्यांचे चित्र स्पष्ट होते.
‘कोरोनरी अँजिओग्राम’ ही धमन्यांमधील ब्लॉकसंबंधीची चाचणी आहे. या चाचणीसाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. व्यवस्थित क्लिनिकल डायग्नोसिस झाल्यानंतरच ही चाचणी करतात.
‘मल्टी स्लाईस सीएटी स्कॅन’, ‘एमआरआय अँजिओग्राम’ या नव्या चाचण्याही आता देशात होऊ लागल्या आहेत. पण तरीही पारंपरिक अँजिओग्रामच्या निदानाची अचूकता सर्वात चांगली असते.
वेळ अत्यंत महत्वाची
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णासाठी वेळ अतिशय महत्वाचा ठरतो. रुग्णाला जितक्या लवकर रुग्णालयात हलवता येईल तितका त्याच्या हृदयाच्या स्नायूंना धोका निर्माण होण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी होते. वैद्यकीय भाषेत याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात. हृदयविकाराची लक्षणे वेळीच ओळखण्यात रुग्णाबरोबरच त्या वेळी त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तींची भूमिकाही महत्वाची आहे. हृदयविकार बळावण्यापूर्वीच सावध करण्यात फॅमिली डॉक्टरांची भूमिका महत्वाची असते.
हृदयावरील शस्त्रक्रिया..
रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ‘मायोकार्डिअल इन्प्रॅकशन’ (एमआय) म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्याचे निदान केले जाते आणि धमन्या बंद होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गुठळ्या काढून टाकण्यासाठी उपचार सुरू केले जातात. याला ‘थ्राँबोलिसिस’ असे म्हणतात. या काळात हृदय अतिशय अस्थिर असते. त्याच्या धडधडीचा वेग बदलून, अनियमित होऊन ‘सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट’चीही शक्यता असते. या वेळी औषधांच्या साहाय्याने धमनी मोकळी करून रुग्णाचा रक्तदाब व हृदयाची धडधड यात स्थिरता आणली जाते.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने किमान ५ ते ६ दिवस रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली विश्रांती घेणे आवश्यक असते. रुग्णालयातून घरी गेल्यावरही दोन आठवडे विश्रांती घेणे, नियमित डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला कोरोनरी अँजिओग्राम करून घेण्याचा सल्ला दिला जातो. या चाचणीमुळे धमन्यांतील गुठळ्या मोकळ्या झाल्या की नाही, याची कल्पना येते.
आणीबाणीच्या वेळी ‘कार्डिअ‍ॅक कॅथेटरायझेशन लॅब’ (कॅथ लॅब) कोरोनरी आर्टरी मोकळी करण्यात महत्वाची भूमिका बजावते. यात हृदयाच्या चेंबरमध्ये ‘कॅथेटर’ घालून केलेल्या उपचारांचा समावेश असतो. पण ही पद्धत केवळ तज्ज्ञांकडूनच करून घेतली पाहिजे. तसेच त्या तज्ज्ञांचा अनुभवही दांडगा हवा.      
अँजिओप्लास्टी किंवा कोरोनरी आर्टरी बायपाससाठी येणारा खर्च
देशात बायपास शस्त्रक्रियेसाठी एक लाख ते अडीच लाख रुपये यादरम्यान खर्च येतो. रुग्णालय, रुग्णाने निवडलेली खोली यावरही हा खर्च अवलंबून असतो. अँजिओप्लास्टीसाठी इतकाच किंवा यापेक्षा थोडा अधिक खर्च येतो. हा खर्च धमन्या मोकळ्या करण्यासाठी वापरलेल्या ‘स्टेंट’ या स्प्रिंगसारख्या उपकरणाच्या किमतीवर अवलंबून असतो.    
शस्त्रक्रियेनंतर..
हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर किती काळात बरे वाटेल हे त्या- त्या व्यक्तीनुसार बदलते. या काळात ती व्यक्ती भावनिकदृष्टय़ाही अस्थिर झालेली असते. प्रत्येक मोठय़ा उपचारानंतर वाटते तसे हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतरही रुग्णांना अशक्त, गळून गेल्यासारखे वाटते. ही स्थिती सुमारे सहा आठवडे राहू शकते. रुग्णाला लवकर बरे वाटण्यासाठी जसा डॉक्टरांचा नियमित सल्ला गरजेचा आहे तशीच कुटुंबीय व मित्रमैत्रिणींची भावनिक साथ मिळणेही आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2013 1:04 am

Web Title: take care of heart
Next Stories
1 अस्वस्थता
2 केसांसाठी योग्य आहार
3 आरोग्य परिचय
Just Now!
X