पालक आणि मुलांचं नातं जितकं हळुवार तितकंच घट्ट! पण कधी अगदी लहानशा गोष्टींवरुन हे नातं बिघडायला लागलं तर? अशा वेळी गरज असते पालकांनी शांतपणे बसून आपल्या मुलांच्या नजरेतून आपल्या वागण्याचा विचार करुन बघण्याची. या नात्यातले प्रश्न कदाचित चुटकीसरशी सुटणार नाहीत. पण स्वत:ची मानसिकता थोडीशी बदलून बघितलं तर ते तितकंसं अवघडही नाही!

प्रश्न – मी नोकरीतून आताच निवृत्त झालो आहे. निवृत्तीनंतर माझे घरातल्यांशी सारखे खटके उडू लागले आहेत. मी आयुष्यभर काही तत्वे पाळली. कोणतीही गोष्ट निष्कारण वाया घालवायची नाही हे त्यातले एक महत्वाचे तत्व. वीज किंवा गॅस गरजेशिवाय वाया घालवायचा नाही, अन्न वाया घालवायचे नाही अशा लहान- लहान बाबतीत मी माझी मते माझ्या मुलांना पटवून द्यायला बघतो. विशेषत: निवृत्तीनंतर त्यांचा या बाबतीतला निष्काळजीपणा माझ्या लक्षात यायला लागला. पण माझी दोन्ही मुले चांगली उच्च शिक्षण घेत असूनही त्यांना मी सांगतो त्याचे महत्व वाटत नाही. ‘बाबा तुम्ही अतीच टोकता, खोलीत कुणी नसताना थोडा वेळ दिवा चालू राहिला तर काय बिघडते,’ असे म्हणून मलाच अक्कल शिकवतात. पत्नीही ‘मुले मोठी झालीत, उगाच वाद नको,’ असे म्हणून मलाच गप्प बसवते.
उत्तर- तुम्ही आताच निवृत्त झालात, हे खूप महत्वाचे आहे. ही एक अगदीच मोठी स्थित्यन्तराची अवस्था असते. सूक्ष्म अशी अनेक विश्व्ो तुमच्यावर येऊन कोसळतात. नोकरीतले नुसते पद संपुष्टात येते असे नाही, तर महिन्याच्या महिन्याला घरात येणारा पगार थांबतो. आपणच आपल्याला कमी तर समजत नाही त्यामुळे? मग त्यातून आजवर कळत-नकळत का होईना, पण ज्या बायको मुलांना आपण कमी समजलो स्वत:पेक्षा, त्यांनी आपलं ऐकणं तर दूरच, पण उलट आपल्यालाच अगदी वेडय़ात काढावं, हे म्हणजे फारच अपमानास्पद वाटू शकते. शिवाय रोज भेटणारे मित्र अन सहकारी हरवतात, ते वेगळेच.
वीज, गॅस अशी उर्जेची बचत असू दे, किंवा अन्न, पाण्यासारख्या गोष्टींची नासाडी टाळण्याचे पवित्र शहाणपण असू दे; आपली आयुष्यभराची मूल्य दर्शवणाऱ्या गुणांचं हे वैभवच आहे तुमच्याकडे. इतकी वष्रे घरात फारसे न दिसणारे बाबा आता या गोष्टी पटवून देऊ लागले, तर मुलांना सुद्धा पुन्हा मारक्या मास्तरांच्या शाळेत गेल्यासारखं वाटणारच की! अन् त्यांनी तर अशी शाळा लहानपणीही पाहिली नसणार; आपणच नाही का त्यांना हट्टानं ‘चांगल्या’ शाळेत घातले?
तर असं बघा करून, की पटवून देण्यापेक्षा त्यांना उदाहरणातून दाखवून देऊ या का? बायकोच्या प्रॅक्टीकल वागण्याचं अनुकरण करणं, हे तुम्हाला एकाच वेळी बायको आणि मुलं, दोघांच्याही ‘गुड बुक्स’ मध्ये घेऊन जाईल, असा रंग दिसतोय. थोडं धोरणानं अन धीरानं घेतलंत, अन् ही मंडळी मुळात छानच आहेत, हे विसरला नाहीत, तर काही मोठे प्रश्न नकोत यायला.
प्रश्न – माझी मुलगी सहा वर्षांची आहे. मी रोज स्वत: तिचा अभ्यास घेते, पण तिला मुळी अभ्यासच करायचा नसतो. आता पहिलीच्या मुलांचा अभ्यास तो किती! पण शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसवले की हिची रडारड सुरू! मी शाळेत तिच्या बाईंना जाऊन भेटले. पण वर्गात असतात चाळीस मुले. बाई तरी कुणाकुणाच्या कलाने घेणार! काय करावे समजत नाही. पहिलीतच ही गत! ही मुलगी वर्गातल्या इतर मुलांपेक्षा मागे पडली तर काय याची भीती वाटते.
उत्तर-   एका वाक्यात उत्तर द्यायचं तर असं सांगता येईल की तिला चांगला क्लास लावून बघा! रागावू नका. असं बघा की हल्ली सगळी मुलं क्लासमध्येच शिकतात. तुम्ही तिच्याबरोबर खेळा अन् तिच्यातले गुण ओळखून त्यांचं कौतुक करायची संधी सोडू नका. म्हणजे एकाच वेळी तुम्ही तिला रागवायच्या बंद व्हाल, कौतुक केल्याने आवडू लागाल, इतर मित्र-मत्रिणींमध्ये मिसळून ती थोडं-फार शिकेल सुद्ध, आणि तुम्हाला आता ही मुलगी इतरांपेक्षा मागे पडली तर काय- काय आभाळ कोसळेल
याचा वास्तविक अंदाज घेता येईल. याची उत्तरं जर खूप निगेटिव्ह आली, तर काउन्सेलरना भेटणं योग्य ठरेल.
शाळेतून आल्याबरोबर तिला खेळायचं असणार, खायचं असणार किंवा इतरांसारखं टी-व्ही कार्टून यात रमायचं असणार. अन ती ‘मागे पडली’ तर त्याची सगळी जबाबदारी फक्त आईवरच येणार, बरोबर? या सगळ्या मुद्यांवर विचार करू या अन परत बोलू या थोडय़ा दिवसांनी.
डॉ. वासुदेव परळीकर -paralikarv2010@gmail.com