28 September 2020

News Flash

मानसिक स्वास्थ्य : तारेवरची कसरत

मानसिक आजार हे संस्कृतीनं घडवलेल्या संकल्पना आहेत.

मन समजून घेताना!

नेहमीच मानसिक स्वास्थ्य टिकवून राहावे, असं म्हणणं म्हणजे इलेक्ट्रॉनची कक्षा नियमित लंबवर्तुळाकार असावी, असं म्हणण्यासारखं आहे. मानसिक आरोग्य ही मुळात एकदा ठरवून ठेवायची अन् मग मिळवून ठेवायची गोष्ट नाहीये. तसं ते असतं, तर इलेक्ट्रॉनचीही कक्षा खाचाखोचांशिवाय लंबवर्तुळाकार असली असती. आपण सगळेजण प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या वागण्याच्या शक्यता अजमावून पाहात असतो आणि परिस्थितीप्रमाणे अन् मगदुराप्रमाणे आपला प्रतिसाद बेतत असतो.

डोक्यात खाज आली तर जितक्या सहजपणे आपण हात उचलून केसांतून फिरवून हलकेच खाजवू, तितक्याच प्रतिक्षिप्तपणे आपण वेगवेगळ्या कृतींवर निर्णय घेऊन अमलात आणतो. अर्थात, हे सहज वाटणारे निर्णयसुद्धा गुंतागुंतीच्या प्रक्रियांचे परिणाम असतात, हे आपल्याला हात मोडल्याशिवाय उमगत नाही आणि विचार प्रक्रिया बथ्थड होऊन कुठलाही निर्णय घेणे अवघड झाल्याशिवाय समजत नाही. थोडक्यात म्हणजे आपले मन बहुतेक वेळा आपल्या बुद्धिपुरस्सर जाणिवेशिवाय, जणू काही ‘ऑटोपायलट’वर काम करत असते. प्रश्न पडल्याशिवाय आपण बुद्धी वापरत नाही. म्हणून अडचणी अन् प्रश्न यांची भूमिका मोलाची आहे; त्यातून आपण स्वत:ला आणि आपल्या वातावरणाला समजून घेत असतो.

शरीर अन् मन हे एकत्र राहतात. संवेदनेबरोबरच आपोआप भावना जागी होते, मग ऑटोपायलटवर किंवा बुद्धिपुरस्सर विचार करून निर्णय होतात अन् कृती घडते. ही कृती समाजमान्य असायला हवी; तिनं समाजमान्य मर्यादा ओलांडल्या तर मनोविकृती आहे, असं समजलं जातं. म्हणून मानसिक आजार हे संस्कृतीनं घडवलेल्या संकल्पना आहेत. प्रत्येक समाजात या मर्यादा भिन्न असू शकतात. काही आजारांमध्ये सार्वत्रिकपणे आढळणारे मेंदूतले बदल दिसतात. त्यांचे मेंदूतल्या रासायनिक किंवा जीवशास्त्रीय पेशीरचनेतल्या किंवा कार्यामधल्या बदलांप्रमाणे वर्गीकरण करता येणे, काही एका मर्यादेपर्यंत उपचार करता येणे, ही वैद्यकशासेत्राची मोठी उडी. पण आपल्या स्वत:च्या अनुभवाप्रमाणे संवेदना, भावना, विचार अन् कृती यांचा अर्थ लावणे, त्यावर येणाऱ्या समाजाच्या प्रतिक्रियांचा आढावा घेऊन आपली दिशा पक्की करणे किंवा दुरुस्त करणे, हा झाला अनुभवाच्या अंगाने मानसिक व्यापार आणि विकार यांचा अभ्यास. अशा रीतीने शरीर, अनुभव, समाज आणि संस्कृती यांचा संगम होण्याचे ठिकाण म्हणजे मन.

दुखण्याचे चार पदर     

कुठल्याही दुखण्याला चार पदर असतात. निव्वळ शारीरिक किंवा मानसिक अशी वर्गवारी ही अपुरी आहे. म्हणून तथाकथित मानसिक आजारांच्या उगमाचे स्रोत शोधायचे झाले तर शरीर, मनाला आलेले अनुभव, समाज, आणि संस्कृती अशा चारही गोष्टींचा धांडोळा घ्यावा लागतो. या प्रत्येक स्रोताचा कमी-अधिक प्रभाव प्रत्येकच दुखण्यामध्ये असतो. साहजिकच उपचारही या चारही अंगांचा विचार करून व्हायला हवेत. यातील प्रत्येक अंगाने इतर तिघांचे भान ठेवले पाहिजे. यातल्या सगळ्या अंगांची जाणीव करून घेण्याची, भान ठेवण्याची, पर्याय निवडण्याची अन् कृती करून परिणामांना तोंड द्यायची क्षमता फक्त मनातच असल्याने मनाचे स्थान एकमेव. भावना ही त्यातली दरक्षणी अनुभवाला येणारी गोष्ट. आवड अन् नावड यांची ‘लिटमस टेस्ट’ देणारी. म्हणून तिचं निरीक्षण ठेवून रोजचा हिशेब मांडता येईल.

कोणता ताण चालेल?

आपण सगळे अनेक बाबतीत सारखे असलो, तरी कित्येक बाबतीत एकमेवाद्वितीय असल्यानं प्रत्येकाला एकच एक लाइफस्टाइल सुचवता येणार नाही. एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात प्रत्येकाला मोलाच्या वाटणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी काय करता येईल, कुठले ताण किती घेता येतील, त्यासाठी कोणती किंमत चुकवावी लागेल अन् मिळणाऱ्या समाधानात संतोष कसा मानता येईल हे पाहता येईल. वेगळं असणं म्हणजे ‘अबनॉर्मल’ नव्हे, हे लक्षात ठेवलंच पाहिजे. ताण हवा की नको, ही निवड आपल्याला उपलब्ध नसून कुठला ताण चालेल, हीच निवड आपल्यापाशी आहे. प्रत्येक आनंद निरोगी असतोच असं नाही, अन् प्रत्येक दु:ख हे आजारीच असेल, असंही नाही. त्यातल्या त्यात चांगल्या समाजात राहण्याचा प्रयत्न करणे, सगळ्या संस्कृतींमधून चांगलं निवडून आपलं शरीर अन् मन जास्तीत जास्त काळ उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि या निरोगी आयुष्याचा स्वत:च्या अन् इतरांच्या भल्यासाठी शक्यतोवर प्रयत्न करणं असं निरोगी मनाचं गमक मानता येईल.

डॉ. वासुदेव परळीकर

drashwin15@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:55 am

Web Title: to maintain mental health is more difficult
Next Stories
1 हृदयशस्त्रक्रियांविषयी थोडेसे!
2 आरोग्यदायी झोप!
3 मधुमेह बरा होऊ शकतो का?
Just Now!
X