कोणत्याही प्रकारचे चालणे आरोग्यासाठी चांगलेच असते. पण नेहमी आपण फार वेगाने चालत नाही. वजन कमी करण्याच्या दृष्टीने साध्या चालण्याचा फारसा उपयोग होत नाही. वेगाने चालणे (ब्रिस्क वॉकिंग) वजन घटवण्यासाठी गरजेचे आहे. जेव्हा चालताना हृदयाच्या ठोक्यांचा वेग नेहमीच्या तुलनेत २५ ते ५० टक्क्य़ांनी वाढतो किंवा जेव्हा चालताना घाम येतो तेव्हा त्याचा वजन कमी करण्यासाठी फायदा होईल, असे समजावे. अर्थात वेगाने चालणे प्रत्येक व्यक्तीलाच शक्य होते असे नाही. वजन प्रमाणापेक्षा अधिक असेल किंवा आरोग्याच्या तक्रारी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. पण ज्यांना नेहमीच्या चालीने चालणे सहज शक्य आहे, त्यांनी वजन घटवण्यासाठी वेगाने चालण्याचा पर्याय जरुर अवलंबावा. चालण्याची सवय नसताना रोज अगदी पाचच मिनिटे चालले तरी उत्तम. हळूहळू ते वाढवत नेऊन वेगाने आणि अधिक वेळ चालणे जमेल. वजन घटवण्यासाठी दररोज ४० ते ६० मिनिटे आणि आठवडय़ाला अशा प्रकारे पाच दिवस ब्रिस्क वॉक करणे फायद्याचे ठरते. चालण्याचे ‘पॉवर वॉक’ किंवा ‘रेस वॉक’ हे प्रकार आहेत. व्यायामासाठी हे प्रकार फारच उपयोगी ठरतात. यात ब्रिस्क वॉकिंगपेक्षा भरभर आणि धावण्यापेक्षा कमी वेगाने चालायचे असते. वजन कमी करु इच्छिणाऱ्यांनी हा व्यायाम जरुर शिकून घेऊन करावा.
– डॉ. श्रीहरी ढोरे-पाटील, बॅरिअ‍ॅट्रिक सर्जन