01 October 2020

News Flash

‘पप्पू फार दंगा करतो..’

घरच्यांचे न ऐकणे, वर्गात लक्ष न देणे, खोडय़ा करून अख्ख्या वर्गाचे लक्ष वेधून घेणे, शिक्षकांची टिंगल उडवणे..

| January 7, 2014 06:47 am

घरच्यांचे न ऐकणे, वर्गात लक्ष न देणे, खोडय़ा करून अख्ख्या वर्गाचे लक्ष वेधून घेणे, शिक्षकांची टिंगल उडवणे.. ‘पप्पू’च्या दंगा करण्याचे अनेक प्रकार. खूप दंगा करणाऱ्या ५ ते ७ टक्केच मुलांना खरोखरच कोणती ना कोणती समस्या असते. विशिष्ट समस्या नसलेल्या मुलांची दंगा करण्याची प्रवृत्ती, त्याची संभाव्य कारणे आणि उपाय याबद्दल सांगताहेत बालमानसोपचारतज्ज्ञ
‘मुलांना शिस्त लावायचे वय काय,’ असा प्रश्न नेहमी केला जातो. मुले अगदी लहान असल्यापासून आईवडिलांना, कुटुंबातील इतर माणसांना बघत असतात. त्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे शाळेत घातल्यानंतरच मुलांना शिस्त लावायला सुरुवात करावी, असे मुळीच नाही. काय करणे योग्य आहे, काय चुकीचे आहे आणि चूक केल्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे, याची जाणीव त्यांना लहानपणापासूनच द्यायला हवी.  
हल्ली पहिली-दुसरीत जाईपर्यंत मुलांचे अतिरेकी लाड केले जातात. प्रत्येक गोष्टीत त्यांचे मत विचारले जाते. घरात घेतला जाणारा निर्णय मुलाला सांगणे वेगळे आणि त्याचे मत विचारणे वेगळे. मुलाने कपडे कुठले घालावेत किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर मुलाने काय खावे, अशा गोष्टींत मुलांचे मत जरूर विचारायला हवे. पण आईवडिलांचा मोबाइल मुलांनी किती वेळ हाताळावा, झोपायची वेळ कुठली असावी, रस्त्यावरून चालताना इकडे-तिकडे पळावे का, अशा गोष्टी ठरवण्याइतकी लहान मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता नसल्यामुळे त्या आईवडिलांनीच विचार करून ठरवणे आवश्यक आहे. स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मुलांना वयानुसार टप्प्याटप्प्याने मिळायला हवे.
‘मुलांना वाट्टेल ते करू द्या,’ असे बालमानसशास्त्र मुळीच सांगत नाही. वर्गातल्या सर्व मुलांकडून एकत्रितपणे वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करवून घेणे ही शिक्षकांची जबाबदारी असते आणि ती चांगल्या रीतीने पार पडावी यासाठी शिक्षकांना आणि शाळेला काही अधिकार द्यावे लागतात. अनेकदा पालक तक्रार करतील या भीतीने शिक्षक मुलांना शिस्त लावणे तर दूरच, पण कोणत्याही पद्धतीने त्यांची चूक लक्षात आणून देण्यास बिचकतात. याउलट काहीशा पारंपरिक पद्धतीच्या शाळा कडक शिस्तीचे दुसरे टोक गाठतात. या दोन्हींचा सुवर्णमध्य काढणे महत्त्वाचे असते. तो काढण्यासाठी शाळेची शिस्तीबद्दलची कल्पना स्पष्ट हवी.  अनेकदा शाळेची आणि शाळेतल्या शिक्षकांची चर्चा घरात फार अनादराने केली जाते. शिक्षकांचा वारंवार एकेरी उल्लेखही केला जातो. शिक्षिकांचा घरी अनादराने होणारा उल्लेख तसेच घरात स्त्रियांना मिळत असलेली वागणूक या गोष्टी विशेषत: मुलग्यांच्या वर्तणुकीवर परिणाम करतात. त्यामुळे शिक्षकांबाबतची आदराची भावना हा शालेय शिस्तीतला खूप महत्त्वाचा मुद्दा असतो.
मुलांना मारणे हे मानसशास्त्रीय दृष्टीने अयोग्यच आहे. मारणे ही शिक्षा असते आणि शिक्षा गुन्ह्य़ासाठी केली जाते. लहान मुलांच्या हातून गुन्हा नव्हे, चुका होत असतात. मार खाणारी मुले तेवढय़ापुरती शिस्तीने वागतात, पण आपण आपल्यापेक्षा कमकुवत असणाऱ्यांवर शारीरिक बळजबरी करू शकतो ही शिकवणच त्यांना त्यातून मिळते. आईवडिलांची पालक म्हणून विशिष्ट जबाबदारी असते आणि ती त्यांनी पार पाडणे महत्त्वाचे ठरते. पालकांनी मुलांसाठी त्यांच्या वयानुसार शिस्तीचे नियम ठरवून घ्यावेत. ठरलेला नियम घरातील सगळ्या लोकांनी पाळणे आवश्यक आहे. मुलांना शिस्त लावताना आधी केलेल्या चुकीची जाणीव करून देणे आणि चूक सुधारून योग्य पद्धतीने कृत्य करायला लावणे गरजेचे. तेवढय़ानेही भागले नाही तर मुलाला मिळणारे विशिष्ट फायदे (उदा. दिवसाला ठरावीक तास टीव्ही पाहणे, जेवणात मुलाला विचारून त्याच्या आवडीचे पदार्थ बनवणे इ.) काही काळासाठी बंद करता येतील. चुकीची खरोखरच जाणीव होऊन मुलाने त्याबद्दल स्वत:हून माफी मागायला तयार होणे आवश्यक आहे.     bhooshan.shukla@gmail.com
शब्दांकन : संपदा सोवनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2014 6:47 am

Web Title: why childrens do so much riot or masti
टॅग Health It,Parents
Next Stories
1 कॅन्सर आणि आयुर्वेद
2 रहा फिट
3 सर्दी, नाक चोंदणे आणि घसा खवखवणे
Just Now!
X