स्त्रियांचे रुमाल पुरुषांपेक्षा लहान का असतात, असा प्रश्न मी सर्व पुरुषांना विचारतो. विविध स्तरातील पुरुषांकडून उत्तर मिळते की स्त्रियांनी त्यांचा रुमाल ओला केला की पुरुषांना त्यांचा रुमाल काढून द्यावा लागतो. तेव्हा मी उत्तरतो, जर पुरुषांनी त्यांचे रुमाल स्वतसाठी वापरले तर ते अधिक काळ आणि अधिक आनंदी जगतील.
‘मोहबत्तें’मध्ये अमिताभ ‘परंपरा, प्रतिष्ठा..’ बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील कठीण भाव आठवताहेत? स्वतच्या मुलीच्या आत्महत्येसंबंधीच्या भावना दडपून टाकल्याचा तो परिणाम होता. अगदी तसंच ‘थ्री इडियट्स’मधल्या ‘व्हायरस’चे झाले होते. मुलाच्या आत्महत्येची घटना तो पचवू शकला नसल्याने कठोर झाला होता.
संकटावेळी भावना लपवल्या पाहिजेत, असा पुरुषांचा ग्रह असतो. ते रडले तर लोक त्यांना कमकुवत समजतील आणि त्याचा फायदा घेतील, अशी त्यांना भीती वाटते. उलट पुरुषांनी भावना व्यक्त केल्या तर कुटुंबाला हायसे वाटते. मुलांना त्यांचे वडील सामान्य वाटू लागतात. वडील नसण्यापेक्षा वडील असलेले बरे, कणखर वडील हे इतर वडिलांपेक्षा चांगले पण  सामान्य वडील हे सर्वात जास्त चांगले असतात.
प्रत्येक पुरुषाने त्याच्यामध्ये दडलेल्या स्त्रीला ओळखणे आवश्यक आहे. स्वतमधील भावनांशी ओळख करून घ्या. योग, विपश्यना किंवा समुपदेशनाने फरक पडू शकतो. तत्त्वज्ञान वाचणारे किंवा नियमित धर्मग्रंथांचे पठण करणारे त्यांच्या भावनांबाबत जागरूक असतीलच, असे नाही.
कणखर मनासारखे दुसरे काहीच नसते. कणखर मनाचे दरवाजे खुले असतात. प्रेम, भिती, दुख, असुया, राग आणि आनंद या भावना आहेत. त्या सर्व सकारात्मक आहेत. जे दुख लपवून ठेवतात ते प्रेम किंवा आनंद पूर्णाशाने अनुभवू शकत नाहीत. ते मोकळेपणाने रडतात ते प्रेमही करतात. अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षकांना लिहिले होते.. अश्रूंमध्ये लाज वाटण्यासारखे काही नसते, हे त्याला शिकवा. प्रेम व्यक्त करतानाही पुरुष कमी पडतात. आतून प्रेम आहे म्हणे.. काय उपयोगाचे? बाहेर दिसले पाहिजे. भीती ही किती सामान्य भावना आहे. मुलांच्या परीक्षेदरम्यान.. जेव्हा ते म्हणतात, की माझी टरकलीय, तेव्हा अर्धी समस्या निकाली निघालेली असते. जेव्हा वडील पालक-शिक्षक बैठकीत स्वतच्या भावना मांडतात तेव्हा त्यांची भीती कमी होते. भीतीमुळे संताप निर्माण होतो आणि त्यामुळे मुलांचा छळही होऊ शकतो.
भावना या खाद्यपदार्थासारख्या नाशवंत असतात, वेळ जाईल तशा त्या शिळ्या होतात. राग कोंडला गेला की त्याचे रुपांतर संतापात होते. त्यानंतर खुन्नस, तिरस्कार व मग सूडाची भावना पेटते.. हृदयाकडून शुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या रोहिणीमध्ये संतापामुळे अडथळे निर्माण होतात आणि हृदयविकाराचा झटका येतो. मनाने भावना दडपल्या की मग त्या शरीरातील इतर ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. मधुमेह, नैराश्य, अ‍ॅसिडीटी, गर्भाशयातून रक्तस्राव, अंगदुखी, सांधेदुखी आदी. .. मनाला कुलूप घातले की शरीर रडायला सुरुवात करते.
शाळेत जाताना आईने धरलेला त्यांचा चिमुकला हात, पहिल्या प्रेमाच्या आठवणी.. अशा घटना आठवाव्या आणि त्या आत्ताच घडताहेत असे समजून त्याचा अनुभव घ्यावा. या आठवणींबाबत मित्रांशी गप्पा मारा. हा उत्तम उपाय आहे. भावनांशी ओळख, त्या समजून घेणे, मान्य करणे, अनुभवणे आणि व्यक्त करणे. दररोजचा भावनिक खूप उपयोगी पडू शकेल.