27 September 2020

News Flash

आत्महत्या कशासाठी?

तिच्या प्रेमामध्ये ‘तो’ झपाटून गेला होता. तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. ज्या दिवशी त्यानं पहिल्यांदा तिला बघितले त्या दिवसापासून तो तिच्या प्रेमात पडला

| June 15, 2013 03:22 am

तिच्या प्रेमामध्ये ‘तो’ झपाटून गेला होता. तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. ज्या दिवशी त्यानं पहिल्यांदा तिला बघितले त्या दिवसापासून तो तिच्या प्रेमात पडला होता! हिंदी चित्रपटात जसं घडतं तसंच त्याच्या आयुष्यात घडेल असं त्याला वाटलं होतं! आपलं आयुष्य आता आनंदानं बहरुन जाणार अशा स्वप्नांत तो हरवून गेला होता. याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष आयुष्य आणि चित्रपट यातील फरक तो विसरला होता. जे व्हायचं तेच झालं, त्याच्या प्रेमाला नकार मिळाला. आपल्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेल्या ‘त्या’ला ‘डर’ चित्रपटातला ‘राहुल’ होणं शक्य नव्हतं! ‘ती’ला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची ताकद त्याच्यात नव्हती. त्याच्या प्रश्नाला त्याला एकच उत्तर दिसत होतं- ‘आत्महत्या’! पण यावर ठाम होणंदेखील त्याला अवघड जात होतं, त्यातच त्याला ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेचा टोल फ्री नंबर मिळाला. कोणाशी तरी बोलावं आणि आपलं दु:ख हलकं व्हावं आणि यापेक्षाही आपण आत्महत्या करतो आहोत हे कोणाला तरी कळावे म्हणून त्यानं ‘कनेक्टिंग’च्या नंबरवर फोन करुन आपलं दु:ख आणि आपला निर्णय ऐकवला.
आत्महत्या रोखण्यासाठी कार्य करणाऱ्या ‘कनेक्टिंग’च्या कार्यकर्त्यांनं त्याचं काम चोख बजावत त्याचे सगळं म्हणणं शांतपणे ऐकून तर घेतलंच, पण त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पुढील वेळेला ‘त्या’चा फोन आल्यानंतर त्यानं त्याचा विचार काहीसा बदलल्याचं कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर दोन-तीन वेळा त्याचा फोन आला. ‘कनेक्टिंग’ ने त्याची आत्महत्येची प्रबळ इच्छा, प्रवृती लक्षात घेऊन त्याचा क्रमांक पण घेऊन ठेवला होता. अधून-मधून दूरध्वनी करुन तेदेखील त्याच्याशी संवाद साधत होते.
पुढचे काही महिने गेल्यानंतरही ‘तो’ ‘ती’च्या दु:खातून बाहेर पडला नव्हता. एक दिवशी त्याने पुन्हा फोन केला तो ‘मी विष घेतलं आहे’, हे सांगणाराच! तेवढे सांगून त्याने फोन कट केला. कार्यकर्त्यांनी त्याला पुन्हा फोन केला, पण तो उचलत नव्हता. ही आत्महत्या कशी थांबवावी, या विचारांनी कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यांनी परत- परत त्याला फोन केला, पण ‘तो’ काही फोन उचलत नव्हता. मधे काही तास गेले आणि एकदाचा फोन उचलला गेला. त्याचा मित्र फोनवर होता. त्यावेळी मित्राकडून समजलेली हकीकत अशी..त्याने दारुमधून विष घेतले होते, त्यानंतर काहीच वेळात त्याचे काही मित्र त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी त्याला त्यांच्याबरोबर बाहेर येण्याचा आग्रह केला. शेवटी तो त्यांच्याबरोबर बाहेर गेला आणि अचानक त्याला उलटय़ा होऊ लागल्या. त्याला काय होतंय, हे मित्रांना काही केल्या समजेना. अखेर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्याने विष प्राशन केल्याचे लक्षात आले. वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने तो वाचला. स्वत:च मृत्यूला कवटाळू पाहणाऱ्या त्याने दुसऱ्या दिवशी ‘कनेक्टिंग’ला फोन केला आणि आपण खूप मोठी चूक करीत होतो, आता आपण बरे आहोत, असे सांगितले. या सगळ्या घटनेला आता वर्षांहून अधिक काळ लोटला. तो आता त्याच्या त्या दु:खातून पूर्णपणे बाहेर आला आहे. अधून-मधून तो ‘कनेक्टिंग’ला फोन करुन तेथील कार्यकर्त्यांशी काही काळ बोलतो, पुन्हा-पुन्हा थॅक्स म्हणतो आणि हे सुंदर आयुष्य आपण आनंदाने जगत असल्याचे सांगतो. त्याला आपलं मन मोकळं करायला ‘कनेक्टिंग’चे कान मिळाले आहेत.
अर्नवाझ दमानिया यांच्या पुढाकाराने २००५ मध्ये स्थापन झालेली ‘कनेक्टिंग’ही स्वयंसेवी संस्था. ‘एशियन अमेरिकन सुसाईड प्रिव्हेंशन’च्या प्रमुख डॉ. अरुणा झा यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाने कनेक्टिंगची सुरुवात झाली. तेव्हापासून ‘कनेक्टिंग’ तरुणवर्गाच्या भावनिक आरोग्यासाठी काम करत आहे. ‘कनेक्टिंग’ची टीम भावनिक सबलीकरणासाठी आणि आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी सजगता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करते. ‘कनेक्टिंग’चे सर्व काम कार्यकर्त्यांच्या मदतीने चालते आणि तेही मोफत.
हेल्पलाईनद्वारे ताणतणावांचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच आत्महत्येचे विचार सातत्याने येणाऱ्या लोकांना या विचारांपासून दूर कसे राहावे याचे मार्गदर्शनही ‘कनेक्टिंग’ करते. विद्यार्थ्यांसाठी शाळेत, महाविद्यालयात, इतरांसाठी विविध कार्यालयात, हाऊसिंग सोसायटय़ांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये जाऊन सजगता वाढवणारे कृती कार्यक्रम ‘कनेक्टिंग’तर्फे आयोजित केले जातात. चर्चा आणि खेळांच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचे काम संस्था करते. ज्या ठिकाणी आत्महत्या झाली आहे किंवा ज्या ठिकाणच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे, तेथील इतर व्यक्तीदेखील अनेकदा त्या आत्महत्येमुळे निराशेच्या गर्तेत जातात किंवा त्यांच्याही मनात आत्महत्येचे विचार घोळायला लागतात, त्या व्यक्तींसाठी समुपदेशनाची गरज भासते. एखाद्या घरात आत्महत्या झाल्यानंतर तेथील इतर व्यक्तींशी संवाद साधणे, त्यांना भावनिक धीर देण्याची गरज असते. हे कामदेखील संस्थेच्या माध्यमातून केले जाते. ‘कनेक्टिंग’चा १८००-२०९-४३५३ हा टोल फ्री क्रमांक आणि ९९२२००११२२ हा क्रमांक आठवडय़ातील सर्व दिवस दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असतो. या हेल्पलाईनवर येणाऱ्या कॉल्सवर ‘कनेक्टिंग’चे प्रशिक्षित कार्यकर्ते संवाद साधताना पूर्वग्रहविरहित दृष्टिकोन ठेवून निष्पक्षपातीपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. या हेल्पलाईनवर दिवसातून पाच ते दहा कॉल्स, तर महिन्यातून अडीचशे ते तीनशे कॉल्स येतात. वर्षभरात साधारणपणे अडीच हजारांच्या आसपास कॉल्स येतात. संस्थेसाठी सध्या ऐंशी कार्यकर्ते काम करीत आहेत. या कॉल्सपैकी पन्नास टक्के येणारे कॉल्स नवीन असतात, तर पन्नास टक्के पुन्हा-पुन्हा येणारे असतात. पुन्हा कॉल करणारी व्यक्ती जास्तीत जास्त चार वेळा कॉल करत असल्याचे दिसून आले आहे.
संपर्कासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध असूनसुद्धा दोन जीवांमध्ये होणारा संवाद आज हरवला आहे.त्यामुळे एकाकीपणा, भावनिक असुरक्षितता यांचं प्रमाण वाढलं आहे. कौटुंबिक अडचणी, मानसिक ताण, प्रेमप्रकरणं, आर्थिक अडचणी, नोकरीविषयक अडचणी, व्यसनाधीनता अशा अनेक गोष्टींमुळे केल्या जाणाऱ्या आत्महत्यांमध्ये वाढच झालेली दिसते.
आत्महत्येसंबंधी सतत चर्चा करणे, नातलगांशी निरवानिरवीचे संभाषण करणे, या संभाषणाबरोबर आपल्या किंमती वस्तू प्रियजनांना वाटून टाकणे, हे वर्तन मनातील आत्महत्येच्या विचारांचे निदर्शक असू शकते. नैराश्य आणि हतबलतेची भावना, एकाकीपणा, यांतून मनस्थितीत वारंवार बदल घडताना दिसू शकतात. एकदम चिडचिड, संताप करणे, नेहमीच्या वर्तनात किंवा झोपेच्या वेळांत बदल होणे,  नैराश्याला अंमली पदार्थाचा आधार शोधणे, ही लक्षणे मनात चाललेल्या आत्महत्येचा विचारांची असू शकतात. असे विचार करणाऱ्या व्यक्तींना मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक मदतीचा हात देऊ शकतात. घरातील इतरांनी व मित्रमैत्रिणींनी अशा व्यक्तीला एकटे न सोडणेच हितावह.

*एखाद्या समस्येला उत्तर मिळत नसेल तर आत्महत्या हाच एकमेव पर्याय म्हणून तो स्विकारला जातो. आत्महत्या करण्याचे मनात येणारे विचार अनेकदा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे आत्महत्येपूर्वी बोलून दाखवले जात असतात. पण अनेकदा या सगळ्याकडे दुर्लक्षच केले जाते आणि त्यामुळे टाळता येऊ शकणारी आत्महत्या पण घडते. रेल्वेच्या फलाटावर उभी राहिलेली व्यक्ती शेजारील व्यक्तीला सहजतेने ‘रेल्वेखाली उडी मारली तर जीव जातो का?’ असे विचारते, किंवा एखादा ग्राहक औषधविक्रेत्याला ‘अमुक औषधाच्या किती गोळ्या खाल्या तर मृत्यू येतो?’ असे विचारतो. पिकावर फवारण्यासाठी किंवा ढेकूण, उंदीर मारण्यासाठी विषारी औषध घेत असताना ‘हे औषध पोटात गेले तर काही होते का’ हा विचारलेला प्रश्न साधा वाटू शकतो. पण हेच प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार रेंगाळत असल्याचे निदर्शकही असू शकतात.
तीव्र शारिरिक वा मानसिक आजाराने त्रस्त झालेली मंडळींच्या मनात आत्महत्येचे हिंसक विचार येऊ शकतात. अशा व्यक्तींना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करता येऊ शकते. मानवी मनातील आत्महत्येच्या विचारांना थांबवण्याचे सामर्थ जरी कोणामध्ये नसले, तरी त्याला विविध पर्याय नक्कीच आहेत. होणारी आत्महत्या वैचारिक देवाणघेवाणीने निश्चितपणे थांबवता येऊ शकते.
आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या व्यक्तींना वयोगटानुसार समुपदेश करण्याच्या विविध पद्धती आहेत. अशा विचारांनी त्रस्त व्यक्तीस वेळेवर मिळणारी मदत खूपच फायदेशीर ठरते. समुपदेशकाशी होणारा संवाद त्या व्यक्तीला आत्महत्येपासून रोखू शकतो. असे विचार मनात येणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो एकटे राहू नये, समुहामध्ये राहावे तसेच कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये, कारण व्यसनांमध्ये माणूस आपला सारासार विचार हरवून बसतो आणि त्याच परिस्थितीत आत्महत्या करण्याची अविवेकी कृती केली जाऊ शकते.
डॉ. रोहन जहागीरदार, मानसोपचारतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 3:22 am

Web Title: why suicide
टॅग Health It
Next Stories
1 सांध्यांच्या दुखापतीवर ‘पेशी कल्चर उपचार’
2 संक्षिप्त
3 ‘पार्किन्सन्स’ ची भीती नको!
Just Now!
X