27 November 2020

News Flash

थंडी आणि भूक

थंडीत भूक खूप लागते. खूप आणि सारखी भूक लागत असल्यामुळे अधिक खाल्ले जाते आणि अधिक खाल्ल्यामुळे वजनही वाढते.

| January 10, 2015 06:41 am

थंडीत भूक खूप लागते. खूप आणि सारखी भूक लागत असल्यामुळे अधिक खाल्ले जाते आणि अधिक खाल्ल्यामुळे वजनही वाढते. थंडीत पुन:पुन्हा भूक का लागते आणि अशी भूक लागल्यावर काय खाणे चांगले हे जाणून घेऊया..

‘बीएमआर’चे त्रांगडे
चयापचय क्रियेदरम्यान शरीरात निर्माण होणारी उर्जा शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असताना खर्च होण्याचा वेग म्हणजे ‘बीएमआर’ (बेसल मेटॅबोलिक रेट). या बीएमआरचा वजन वाढण्याशी थेट संबंध असतो. थंडीत तापमान कमी झाल्यामुळे शरीराचे तापमानही एरवीपेक्षा कमी राहते. थंडीचा प्रतिकार करण्यासाठी बीएमआर वाढतो म्हणून शरीरातील अधिक उर्जा खर्च केली जाते. बीएमआर वाढल्यामुळे शरीराला अधिक ऊर्जेची गरज भासते आणि त्यामुळेच थंडीत वारंवार काहीतरी खावेसे वाटते. थंडीत भूक वाढल्यामुळे वजनही वाढले, अशी तक्रार अनेक जण करतात. प्रत्येक शरीराच्या गरजेनुसार लागते तेवढेच अन्न हिवाळ्यात घेतले आणि त्याबरोबर नियमित व्यायाम सुरू ठेवला तर वजन वाढणार नाही. पण नेहमीपेक्षा अधिक भूक लागल्यावरही अन्नाचे प्रमाण न वाढवणे सर्वानाच शक्य होणार नाही. भूक लागेल तसे खायचे आणि वजनावरही नियंत्रण ठेवायचे असेही करणे शक्य आहे. पण त्यात आपण काय खातो याला फार महत्व द्यावे लागेल.

‘कम्फर्ट फूड’ आकर्षक, पण..
पिष्टमय पदार्थ पटकन ऊर्जा देतात. त्यामुळे पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असलेले अन्न खाल्ल्याने अनेकांना बरे वाटते. अशा ‘बरे वाटण्याच्या’ भावनेलाच ‘कम्फर्ट फूड’ असे म्हणतात. पण हे अन्न वजन वाढवणारे असल्यामुळे ते टाळलेलेच बरे. त्यामुळे थंडीत दर २ ते ३ तासांनी खावे पण प्रत्येक वेळी पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थ अधिक असलेले पदार्थ नकोत. ‘स्नॅक्स’च्या पदार्थामध्ये प्रथिने आणि तंतूमय पदार्थाचे प्रमाण अधिक असल्यास चांगले. थंडीत अनेक जण पाणी कमी पितात. असे होऊ न देता दिवसात दोन ते अडीच लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. दूध न घातलेला काळा चहा, काळी कॉफी, हिरवा चहा, गरम रस्सम किंवा सूप अशा पेयांमधूनही पाणी पोटात जाऊ शकेल.

 

थंडीत मधल्या वेळी हे खा!
* मिक्स डाळींचे घावन किंवा आप्पे
* इडली आणि त्याबरोबर भरपूर भाज्यांचे सांबार
* उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट
* व्होल व्हीट किंवा मल्टीग्रेन ब्रेड
* कडधान्यांची पाणीदार उसळ आणि पाव
* कमी तेलात भाजलेले भाज्यांचे कटलेट
* ग्रिल्ड’ मासा किंवा चिकन
* वाफवलेला मका
* अंजीर, जर्दाळू, बेदाणे, खजूर हा सुकामेवा बद्धकोष्ठ न होण्यासाठी मदत करतो. थंडीत अनेकांना बद्धकोष्ठ होत असल्याने हा सुकामेवा जरूर खावा. (काजू, बदाम, पिस्ते वजन वाढवणारे असल्याने ते टाळलेलेच बरे.)
* कम्फर्ट फूड’ची फारच इच्छा झाली तर कधीतरी व्होल व्हीट ब्रेडपासून बनवलेले ‘लो फॅट’ चीझ सँडविच किंवा ‘लो फॅट’ चीझ पिझ्झा खाता येईल किंवा ‘लो फॅट’ दुधात कोको घातून प्यायल्यास चालू शकेल. पण हा पर्याय रोज-रोज नकोच.

थंडीत पुन:पुन्हा भूककशी लागते?

मेंदूतील ‘हायपोथॅलॅमस’ हा भाग आपल्या भुकेच्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो. त्यातले ‘लॅटरल हायपोथॅलॅमस’ हे केंद्र खाण्याची इच्छा जागवते आणि ‘व्हेन्ट्रो मिडियल हायपोथॅलॅमस’ हे केंद्र भूक भागल्याचा संदेश देते. थंडीत शरीराचा ‘बेसल मेटॅबोलिक रेट’ वाढला की भूक जास्त लागते. भूक लागल्यावर जे खाल्ले जाते ते लवकर पचते. अन्न पचल्यावर रक्तातील साखर कमी होते आणि रक्तातले ‘ग्लुकोस्टॅटिक रिसेप्टर्स’ लॅटरल हायपोथॅलॅमसला साखर कमी झाल्याचा संदेश देतात. मग लॅटरल हायपोथॅलॅमस खाण्याची इच्छा निर्माण करतो. भूक भागल्यावर पुन:पुन्हा हीच प्रक्रिया शरीरात घडत राहते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 6:41 am

Web Title: winter huger
टॅग Health It
Next Stories
1 प्रौढ स्त्रियांच्या समस्या
2 ओठ फुटणे,पायांना भेगा पडणेअसे का होते?
3 रन कीपर
Just Now!
X