जे लोक आरोग्यदायी आहार घेतात व नियमित व्यायाम करतात, तेच कामाच्या ठिकाणी चुणूक दाखवू शकतात व त्यांची कामगिरी उत्तम असते, असा दावा एका अमेरिकी संशोधनात करण्यात आला आहे. ‘हेल्थ एनहान्समेंट रीसर्च ऑर्गनायझेशन’ (हिरो) व ‘ब्रिगहॅम यंग विद्यापीठ’ तसेच ‘सेंटर फॉर हेल्थवेज’ या संस्थांच्या संशोधकांनी केलेल्या पाहणीत असे दिसून आले, की दिवसभरात आरोग्यदायी आहार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामगिरी इतरांपेक्षा २५ टक्क्य़ांनी चांगली असते. जे लोक आठवडय़ात पाच किंवा अधिक वेळा भाज्या किंवा फळे खातात त्यांची कामगिरी ही इतरांपेक्षा २० टक्क्य़ांनी चांगली असते. ‘बिझिनेस न्यूज डेली’ या संकेतस्थळावर म्हटले आहे, की जे कर्मचारी आठवडय़ातून तीन दिवस ३० मिनिटे व्यायाम करीत होते, त्यांची नोकरीतील कामगिरी १५ टक्क्य़ांनी अधिक चांगली होती. जे लोक आरोग्यदायी आहार व नियमित व्यायाम करणारे होते, त्यांचे कार्यालयाला दांडय़ा मारण्याचे प्रमाण २७ टक्क्य़ांनी कमी होते. लठ्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांची नोकरीतील कामगिरी ही ११ टक्क्य़ांनी चांगली होते. जास्त वजन असेल, तर दांडय़ा मारण्याचे प्रमाण वाढते तसेच कामातील गुणवत्ता व त्याचे प्रमाणही कमी होते. कारण या लठ्ठ लोकांमध्ये नैराश्य व इतर आजार बळावतात. कर्मचाऱ्यांचे आरोग्य, त्यांची कामगिरी, कार्यालयीन उत्पादकता याविषयीचा अहवाल अलिकडेच प्रसिद्ध केल्याचे ‘हिरो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेरी नॉयस यांनी सांगितले. अमेरिकेतील विविध भौगौलिक भागातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या २०,११४ कर्मचाऱ्यांचा अभ्यास यात करण्यात आला आहे.