नुकतीच राज्यात एकामागून एक अशी दोन हृदय प्रत्यारोपणे झाली आणि त्याच्या बातम्यांनी सर्वाना अक्षरश: हलवून सोडले. अवयवदान या संकल्पनेतल्या मूत्रपिंडाच्या, डोळ्यांच्या किंवा फार-फार तर यकृताच्या प्रत्यारोपणाबद्दल बहुतेक जणांनी ऐकलेले असते. पण हृदयाचे प्रत्यारोपण ही बाब अजूनही आपल्याकडे नवीच समजली जाते. अवयवदानाची- त्यातही ‘मेंदू मृत’ म्हणजे ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवांचे दान करण्याविषयी जनजागृतीची गरज आहे. हृदय प्रत्यारोपणाच्या घटना आणि जागतिक अवयवदान दिवसाच्या पाश्र्वभूमीवर अवयवदानाविषयी थोडेसे-

रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करताना..
अवयवदानाचे जिवंत व्यक्तीने केलेले अवयवदान आणि मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान असे दोन प्रकार आहेत. यातील जिवंत व्यक्तीने केलेले अवयवदान ही संकल्पना बऱ्याच जणांना माहीत असते. पण ‘मेंदू मृत’ म्हणजे नेमके काय याबाबत अजूनही तितकीशी जनजागृती नाही. रुग्णाला ‘मेंदू मृत’ घोषित करण्याचे काम तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे केले जाते. ‘झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या पुण्यातील समन्वयक आरती गोखले म्हणाल्या,‘रुग्णाची मेंदू मृत अवस्था कळून घेण्यासाठी दहा ते बारा वैद्यकीय चाचण्या आहेत. या चाचण्या ठरावीक अंतराने पुन्हा करून रुग्ण मेंदू मृत असल्याची खात्री केली आणि त्यानंतर रुग्णाच्या अवयवांचे दान करण्याबाबत डॉक्टर आणि रुग्णालयाशी जोडलेले सामाजिक कार्यकर्ते नातेवाईकांना समजावून सांगतात. नातेवाईकांनी अवयवदानास संमती दिली तरच रुग्णाचे ठरावीक अवयव काढून ते इतर रुग्णाला देण्याची प्रक्रिया करता येते.’
रुग्ण ‘मेंदू मृत’ म्हणजे ‘ब्रेन डेड’ आहे म्हणजेच तो कोमात गेलाय का, तो त्या अवस्थेतून बाहेर पडू शकेल का, अशा रुग्णांच्या नातेवाइकांना असलेल्या प्राथमिक शंकांचेही या वेळी निरसन केले जाते. ‘आपल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासावर तर ठेवले आहे, मग डॉक्टरांनी त्याला ‘मेंदू मृत’ कसे घोषित केले,’ ही संकल्पना त्याच्या नातेवाइकांना समजावून सांगणे आव्हानात्मक असल्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्यां शिल्पा बर्वे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘काही वेळा रुग्णांच्या नातेवाइकांना वेगळीच चिंता सतावत असते. मेंदू मृत रुग्णाचे अवयव काढून घेतले तर त्याच्या मृतदेहाची अवहेलना होईल, अवयव काढल्यावर त्याचा देह विद्रूप दिसेल असा प्रश्न अनेक नातेवाईक विचारतात. असे होत नाही, हे त्यांना समजावून सांगावे लागते. मृताच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही, किंवा पुढील जन्मात तो त्या विशिष्ट अवयवाशिवाय जन्माला येईल का, असे प्रश्नही काही जणांकडून विचारले जातात.’

मेंदू मृत व्यक्तींच्या अवयवांचे दान वाढणे गरजेचे
१९९५ पासून राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू करण्यात आला. तेव्हापासून २०१५ पर्यंत एकूण जिवंत व्यक्तीकडून रुग्णाला दिल्या जाणाऱ्या अवयवांच्या प्रत्यारोपणांची (लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट) संख्या ८,२६३ आहे. यात ८,०६१ प्रत्यारोपणे केवळ मूत्रपिंडांची आहेत, तर यकृताची २०२ प्रत्यारोपणे आतापर्यंत झाली आहेत. माणसाच्या शरीरातील दोन मूत्रपिंडांपैकी एक मूत्रपिंड, यकृताचा काही भाग दान करता येतो आणि या दोन प्रकारची ‘लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट’ साधारणपणे बघायला मिळतात. याशिवाय फुप्फुस, आतडे आणि स्वादुपिंडाचा काही भागही जिवंत दाते दान करू शकतात, मात्र अशी प्रत्यारोपणे दुर्मीळ आहेत.
मेंदू मृत व्यक्तीच्या अवयवांच्या प्रत्यारोपणांची संख्या मात्र या तुलनेत खूप कमी असल्याचे दिसून येते. १९९५ पासून आतापर्यंत राज्यात मेंदू मृत व्यक्तींचे ७३० अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाले. यात ५४६ मूत्रपिंडे, १५० यकृत, २ फुफ्फुसे, २ हृदय आणि इतर ३२ अवयवांचा समावेश आहे. राज्याच्या मानवी अवयव प्रत्यारोपण विभागाचे सहायक संचालक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील म्हणाले, ‘मेंदू मृत व्यक्तीचे अवयव दान न केल्यास ते वाया जात असल्यामुळे गरजू रुग्णांसाठी या अवयवांचे दान वाढणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात मेंदू मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण नगण्य होते. आता या बाबतीत काही प्रमाणात जनजागृती होत असल्याचे दिसून येते. मेंदू मृत व्यक्ती त्याच्या अवयवांच्या रूपाने दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहील आणि त्याचे अवयव ८ रुग्णांना वाचवू शकतील, ही गोष्ट नागरिकांपर्यंत पोहोचायला हवी.’
– संपदा सोवनी
sampada.sovani@expressindia.com

अवयव प्रत्यारोपणासाठी
राज्यात १०७ रुग्णालये
राज्यात १०७ रुग्णालये अवयव प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत असून त्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ७०, यकृतासाठी २०, हृदयासाठी ७, फुप्फुसांसाठी ३, हृदय व फुप्फुस या दोन्हीच्या प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत असलेले १, ओव्हरीज, स्वादुपिंड (पॅनक्रिआ), टिश्युसाठी प्रत्येकी १ रुग्णालय नोंदणीकृत आहेत. अवयव प्रत्यारोपणाबरोबरच या रुग्णालयांना मेंदू मृत व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढण्याचीही परवानगी आहे. याशिवाय केवळ अवयव काढण्याची परवानगी असलेली (नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रीट्रिव्हल सेंटर) ४२ रुग्णालये आहेत. तसेच ‘आय बँक’, कॉर्निआ प्रत्यारोपण अशा डोळ्यांच्या विविध संदर्भातील गोष्टींसाठी २६१ रुग्णालये नोंदणीकृत आहेत.
इतर प्रत्यारोपणांपेक्षा हृदय प्रत्यारोपण तुलनेने अवघड समजले जाते. मेंदू मृत व्यक्तीच्या शरीरातून हृदय काढल्यावर ते चार तासांच्या आत दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करावे लागते. त्यासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणेही अत्याधुनिक आहेत. नुकतेच पुण्यातून एका मेंदू मृत महिलेचे हृदय प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाले आणि त्याद्वारे मुंबईच्या रुग्णालयात एका बावीस वर्षांच्या तरुणाला जीवदान मिळाले. ही शस्त्रक्रिया पश्चिम भारतातील पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मानली गेली. ही शस्त्रक्रिया करणारे हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. संजीव जाधव म्हणाले, ‘मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये समन्वय साधून वाहतुकीसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करणे, केवळ त्या हृदयासाठी विमान तयार ठेवून तातडीने हृदय मुंबईला नेणे या गोष्टी शक्य होऊ शकल्या. पण राज्यातल्या लहान शहरांमधून हृदय प्रत्यारोपणासाठी मोठय़ा शहरात नेता येणे अजूनही जिकिरीचे आहे. हृदय प्रत्यारोपणासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणेही अवघड आहे. ‘हृदय देणे म्हणजे आत्मा देणे,’ अशी भावनिक संकल्पना अजूनही मानली जाते.’हृदयाच्या आजारात हृदय पूर्णत: खराब झाले तर त्याचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या मेंदू मृत रुग्णाचे हृदय दान करायचे आहे ते हृदय मूलत: निरोगी असावे लागते, तसेच दात्या रुग्णाचे वय साधारणत: ६५ वर्षांच्या आत असावे लागते. डॉ. जाधव म्हणाले, ‘मूत्रपिंड आणि हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या जुळणीची प्रक्रिया साधारणत: सारखी असते. यात दाता आणि रुग्णाच्या रक्तगटाची जुळणी केली जाते, रुग्णाच्या आणखीही काही चाचण्या प्रत्यारोपणापूर्वी घेतल्या जातात. प्रत्यारोपण झालेला रुग्ण एक ते दोन आठवडय़ांत हिंडू-फिरू शकतो, अर्थात त्याला पूर्णत: बरे होण्यासाठी पुढे आणखी कालावधी लागतो.’