टाळेबंदीमुळे शेकडो अश्वमालकांना रोजगाराची चिंता

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : देशात प्रवासासाठी घोडय़ांचे एकमेव पर्यटन स्थळ ही माथेरानची ओळख. येथे पर्यटकांच्या सेवेसाठी असलेल्या घोडय़ांमुळे शेकडो घरांना रोजगार मिळतो. मात्र टाळेबंदीनंतर पर्यटन शून्यावर गेल्याने दोन महिन्यांपासून एकाच जागी उभ्या असलेल्या येथील घोडय़ांना विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे घोडेमालक हवालदिल झाले आहेत.

माथेरानमध्ये घोडय़ांशिवाय इतर प्रवासी वाहनाला परवानगी नाही. त्यामुळे २३५ घोडेमालकांचे ४६० प्रवासी घोडे पर्यटकांच्या सेवेत आहेत, तर दोनशे घोडे मालवाहतूक करतात. दस्तुरी फाटय़ानंतर माथेरानमध्ये घोडय़ाशिवाय पर्यटकांना दुसरा पर्याय नाही. एक हजार ७०० एकरवर असलेल्या माथेरानमधील ३८ पर्यटन स्थळे दाखवण्याचे काम या घोडय़ांवरून होते.

मार्च ते मे या हंगामातच टाळेबंदी झाल्यामुळे माथेरानमध्ये शुकशुकाट आहे; पण पुढील काही महिने पर्यटक माथेरानमध्ये फिरकणार नाहीत या भीतीने घोडेमालक चिंताग्रस्त झाले आहेत. पुढील काळातही घोडय़ांना पोटदुखी त्रस्त करु शकते, असे पशुधन विकास अधिकारी डॉ. अरुण राजपूत यांनी सांगितले. काही दानशूरांनी घोडय़ांचा खुराक देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मर्यादा असल्याचे अश्वचालक राकेश कोकळे यांनी सांगितले.

 

आजार वेगात.. तबेल्यात एकाच ठिकाणी दोन महिने उभे राहिल्याने घोडय़ांमध्ये विविध आजार निर्माण झाले आहेत. अनेकांच्या पायाला सूज आली आहे. दिला जाणारा जड खुराक घोडय़ांना पचत नाही. त्यामुळे त्यांची पोटदुखी वाढली आहे. अन्नपचनाअभावी काही घोडय़ांमध्ये पोटाचे विकार निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी येथील एका घोडय़ाचा पोटाच्या विकारामुळे मृत्यू झाला.

मालक रोजंदारीवर..

भुसा, बाजरी, गवत हा खुराक घोडय़ांना देण्याची ऐपत येथील घोडेमालकांमध्ये राहिलेली नाही. स्वत:चे पोट भरण्यासाठी हे घोडेचालक आता रोजंदारीचे काम करू लागले आहेत. एका घोडय़ाला महिन्याकाठी सात हजारांपर्यंत खर्च येतो. तो करणेही आता अनेकांना अवघड होत आहे.

दररोज पळणाऱ्या घोडय़ांना केवळ एकाच ठिकाणी उभे राहिल्यामुळे अनेक विकार जडले आहेत. त्यात त्यांचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

 – राकेश कोकळे,  अश्वचालक