सांध्यांच्या दुखापतीवर ‘पेशी कल्चर उपचार’

हाडांच्या सांध्यांवर ‘कार्टिलेज’ नावाचे आवरण असते. नैसर्गिक रीत्याच या आवरणाला रक्तपुरवठा कमी असतो. हाडाला प्रॅक्चर झाले तर ते भरून येऊ शकते. तसे या आवरणाचे नसते. त्यामुळे सांध्यांवरील आवरण फाटल्यास किंवा दुखावल्यास ते परत पूर्वीसारखे भरून येण्याची शक्यता कमी होते.

हाडांच्या सांध्यांवर ‘कार्टिलेज’ नावाचे आवरण असते. नैसर्गिक रीत्याच या आवरणाला रक्तपुरवठा कमी असतो. हाडाला प्रॅक्चर झाले तर ते भरून येऊ शकते. तसे या आवरणाचे नसते. त्यामुळे सांध्यांवरील आवरण फाटल्यास किंवा दुखावल्यास ते परत पूर्वीसारखे भरून येण्याची शक्यता कमी होते. अशा वेळी शरीर दुखावलेल्या कार्टिलेजला पर्याय म्हणून ‘फायब्रोकार्टिलेज’ हे तात्पुरते आवरण तयार करते. पण कितीही झाले तरी फायब्रोकार्टिलेज हा जखमेवर तात्पुरती खपली धरण्यासारखा शरीराने केलेला तात्पुरता उपाय असतो. ते सांध्यावरील मूळच्या आवरणाची जागा घेऊ शकत नाही. फायब्रोकार्टिलेज लवकर खराब होऊन पुन्हा ‘आथ्र्रायटिस’ म्हणजे सांधेदुखी उद्भवण्याची भीती असते. अशा वेळी सांध्यांच्या आवरणातील पेशींच्या ‘कल्चर’ प्रक्रियेचा वापर करून दुखापतीवर केलेला इलाज फायदेशीर ठरू शकतो.
पेशी कल्चर उपचार पद्धतीत व्यक्तीच्या सांध्यावरील न दुखावलेल्या आवरणाच्या पेशींचा थोडा भाग काढून घेतला जातो, या पेशींचे प्रयोगशाळेत ‘कल्चर’ तयार करून त्यांची संख्या वाढवली जाते, या कल्चरमध्ये ‘फायब्रिन’ नावाचा ‘जेल’सारखा घटक मिसळला जातो आणि ते सांध्याच्या दुखावलेल्या आवरणाच्या जागी ठेवले जाते. या कल्चरमुळे आवरण पूर्वीसारखे भरून येते.  
काही वेळा रुग्णाचे मोडलेले हाड जुळत नाही. अशा तक्रारीसाठीही पेशी कल्चर उपचार वापरता येतात. अशा वेळी रुग्णाचे ‘बोन मॅरो’ काढून आणि त्यातील केवळ हाडासाठीच्या पेशी (बोन सेल्स) वेगळ्या काढतात. या पेशींचे वरील पद्धतीने कल्चर करून ते न जुळणाऱ्या हाडात ठेवले जाते. बोन मॅरो काढणे फार अवघड किंवा भीतीदायक नाही. हे बोन मॅरो रुग्णाच्या खुब्याच्या (हिप बोन) भागातून काढतात. स्थानिक भूल देऊनही हे काम करता येते.
जसजसे व्यक्तीचे वय वाढते तसा सांध्यांच्या आवरणाचा रक्तपुरवठा आपोआपच कमी-कमी होत जातो. त्यामुळे नैसर्गिक रीत्या हे आवरण दुखावण्याची शक्यता असते. याला ‘ऑस्टिओआथ्र्रायटिस’ असे म्हणतात. वयाच्या पन्नाशीनंतर अशा प्रकारे सांध्यांचे आवरण दुखावण्याची शक्यता वाढते. कमी वयोगटात चालत्या दुचाकीवरून पडल्यामुळे किंवा खेळताना झालेल्या ‘पडझडी’मुळे सांध्यांना मार बसू शकतो. १४ ते १८ या वयोगटात काही ‘हॉर्मोनल’ कारणांमुळे सांध्यांच्या आवरणाचा रक्तपुरवठा कमी होणे आढळू शकते. याला ‘ऑस्टिओकॉन्ड्रिटिस डेसिकन्स’ असे म्हणतात. यामुळेही आवरण दुखावू शकते. त्यासाठी त्या मुलाला किंवा मुलीला अपघात व्हावाच लागतो असे नाही.
कुठल्यातरी अपघातातत मार बसल्यामुळे गुडघा आणि घोटय़ाला होणारी दुखापत अगदी सर्रास आढळते. अशा दुखापतींवर पेशी कल्चर उपचारांचा फायदा होतो. ‘ऑर्थोस्कोपी’ म्हणजे ‘की होल’ शस्त्रक्रियेद्वारे हे उपचार केले जातात. लहान व तरुण वयातील व्यक्तींना हे उपचार निश्चितपणे फायदेशीर ठरतात. पण वय अधिक असलेल्या रुग्णांसाठी ते त्या प्रमाणात उपयुक्त ठरतीलच असे नाही. हे उपचार खर्चिक असल्यामुळे पन्नाशीच्या पुढे सहसा ते करण्याचा सल्ला दिला जात नाही.
खुब्याचा सांधा बदलण्याच्या शस्त्रक्रियेला पर्याय म्हणूनही पेशी क्लचर उपचारांचा अभ्यास झाला आहे. ‘अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप’ म्हणजे खुब्याचा रक्तप्रवाह कमी होण्याच्या विकारात खुब्याच्या सांधा पूर्णपणे खराब झाला असेल, तर तो बदलण्याची वेळ येऊ शकते. मात्र सांधा बदलावा लागण्याइतकी दुखापत झाली नसेल किंवा रुग्ण वयाच्या अगदी पंचविशीत-तिशीत असेल, तर सांधा बदलण्याचा निर्णय घेतला जात नाही. अशा वेळी खुब्यावरील उपचारांसाठी बोन कल्चर पद्धती वापरली जाऊ शकते. काही कोरियन तज्ज्ञांनी याबाबत केलेले अभ्यास उपलब्ध आहेत.
डॉ. शिरीष पाठक
स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ
शब्दांकन – संपदा सोवनी

* सांधा दुखावणे किंवा हाड जुळून न येण्यावर अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. ‘पेशी कल्चर’ उपचारपद्धती हा त्यांतील एक अत्याधुनिक प्रकार. हा प्रकार काहीसा खर्चिक असला, तरी सांध्यांचे आवरण किंवा हाड पुन्हा पूर्वीसारखे भरून येण्यासाठी हे उपचार फायदेशीर ठरतात. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Muscle culture therapy on joint injury

Next Story
कर्करोगात निर्माण होणारा द्रव शरीराबाहेर काढणारा पंप
ताज्या बातम्या