स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर (ओव्हॅरियन कॅन्सर)

मेनॅपॉजनंतर ५४ व्या वर्षी शरयूताईंना अचानक मासिक पाळीसारखा योनिगत रक्तस्राव होऊ लागला, तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

’ मेनॅपॉजनंतर ५४ व्या वर्षी शरयूताईंना अचानक मासिक पाळीसारखा योनिगत रक्तस्राव  होऊ  लागला, तेव्हा  त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सोनोग्राफी, गर्भाशय, निर्हरण, शस्त्रकर्म व त्याच्या प्रयोगशालेय तपासणीचा रिपोर्ट आल्यावर दुसऱ्या ग्रेडचा गर्भाशयाच्या अंतत्वचेपर्यंत पसरलेला स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर (ओव्हॅरियन कॅन्सर) असल्याचे निश्चित झाले. अनिवार्य अशी केमोथेरॅपी व रेडियोथेरॅपीची चिकित्सा पूर्ण करूनही ३ वर्षांनी १९९९ मध्ये कॅन्सरने पुन्हा डोके वर काढले. यावेळी उदरपोकळी व आतडय़ांपर्यंत कॅन्सरचा प्रसार झाला होता. यासाठीच्या शस्त्रकर्मानंतर शरयूताईंनी आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा व आहार विहारावरील नियंत्रण यांचे कटाक्षाने पालन करीत आजतागायत कॅन्सरवर मात केली आहे.
स्त्रीबीजकोश हा प्रजोत्पादन संस्थेतील अवयवांपकी प्रजोत्पादन करणारा म्हणजे स्त्रीबीजाची निर्मिती करणारा महत्त्वपूर्ण अवयव असून त्यात दर महिन्याला एका पक्व स्त्रीबीजाची निर्मिती होते. यालाच आयुर्वेदीय ग्रंथकारांनी दर ऋतूत म्हणजे दर महिन्याला निर्माण होते म्हणून आर्तव म्हटले आहे. आर्तव हा रसधातूचा उपधातू असल्याने ते रसाश्रित कफदोषाचे स्थान आहे. तसेच ‘‘आर्तवं आग्नेयम्।’’ या सूत्रानुसार ते अग्निगुणाचे असल्याने रक्तधातू व पित्ताचेही स्थान आहे. दर महिन्याला स्त्रीबीजास पक्वता आणून बीजवाही नलिकेतून (फॅलोपियन टय़ूब) त्याचे गर्भाशयात निस्सरण करणे, तेथे पुरुष शुक्राणूशी त्याचा संयोग करून फलित बीज तयार करणे व ही प्रक्रिया न झाल्यास दर महिन्यास रजप्रवृत्तीच्या रूपाने योनी मार्गाने त्याचे शरीराबाहेर निर्हरण करणे हे कर्म अपानवायूच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे स्त्रीबीजकोशाची रचना व क्रिया यांत वात-पित्त-कफ हे त्रिदोष, रस-रक्त व प्रजोत्पादनास हेतुभूत शुक्र धातू यांचा अंतर्भाव होतो. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार स्त्रीबीजकोशात बीजकोशास आवरण निर्माण करणाऱ्या एपिथेलियल सेल्स, स्त्रीबीज निर्माण करणाऱ्या जर्म सेल्स व स्त्रीबीजकोशाला आधार व आकार देणाऱ्या स्ट्रोमल सेल्स अशा तीन प्रकारच्या पेशी असतात व त्या त्या प्रकारच्या पेशींची अनियंत्रित व विकृत वाढ झाल्यास त्या त्या प्रकारचे कॅन्सर निर्माण होतात. यापकी एपिथेलियल सेल्स टय़ुमरचे प्रमाण सर्वात अधिक म्हणजे ८५ ते ९०% असून सामान्यत: यापकी प्रत्येक प्रकारच्या टय़ुमरचे बिनाईन म्हणजे नॉन मॅलिग्नंट व मॅलिग्नंट असे सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या पेशींच्या रचनेनुसार उपप्रकार आढळतात.
साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते व वयाच्या साठीनंतर ती दुणावते. आहारात चरबीयुक्त पदार्थाचा अधिक वापर व फळे-भाज्या-तृणधान्ये-कडधान्ये यांचा कमी वापर, एकदाही गर्भधारण न होणे, स्तनपान न करणे, गर्भधारणेसाठी किंवा रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनचा अधिक काळ औषध म्हणून वापर करणे, धूम्रपान, स्त्रीबीजाण्ड  स्तन  किंवा  आंत्र  व  गुदाच्या कॅन्सरची आनुवांशिकता, बी.आर्.सी.ए.१ व २ सारख्या विशिष्ट जनूकांमध्ये झालेले बदल ही आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरची संभाव्य कारणे आहेत. आयुर्वेद शास्त्रानुसार वात-पित्त-कफ  हे  त्रिदोष,  रस-रक्त  व शुक्र हे धातू व त्यांचे अग्नी तसेच जाठराग्नी यांची दुष्टी करणारा आहार- विहार- मानसिक स्थिती-विशिष्ट औषधांचा अतिरिक्त वापर या गोष्टी स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरला हेतुभूत ठरतात. वाल- पावटा- वाटाणा- राजमा-छोले- चवळी- मटकी यासारख्या कडधान्यांचा  व  बेसनाचा  अधिक मात्रेत व वारंवार आहारात समावेश, ब्रेड-बिस्किटे अशा अतिशय कोरडय़ा पदार्थाचे अधिक सेवन, शीतपेये,  आइक्रीम,  फ्रीजमधील थंड पदार्थाचे वारंवार सेवन, शरीराच्या शक्तीपेक्षा अधिक प्रमाणात व्यायाम करणे, रात्री जागरण करण्याची सवय, अतिशय चिंता करण्याचा स्वभाव यामुळे  होणारी  वातदोषाची विशेषत: अपान वायूची दुष्टी; हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाल्याच्या व तिखट मिठाच्या पदार्थाचे, कुळीथ, पपई, मांसाहारातील चिकन, चिंबोरी अशा उष्ण  पदार्थाचे वारंवार व अधिक मात्रेत सेवन, उष्णसंपर्कात – उन्हात अधिक काळ  काम करणे, तापट  स्वभाव  यामुळे होणारी  पित्त  व  रक्तधातूची  दुष्टी;  दही, केळे, काकडी, मिठाई, मांसाहार, दिवसा जेवणानंतर झोपणे, अजिबात व्यायाम न करणे, ए.सी.सारख्या शीत वातावरणात दिवसभर बठे काम करणे यामुळे होणारी कफ दोष, रसधातू व जाठराग्नीची दुष्टी; रजप्रवृत्तीच्या नसíगक चक्रात व्यत्यय आणणारी दीर्घकाळ घेतली  गेलेली  हार्मोन्सची  चिकित्सा यासारख्या कारणांमुळे होणारी शुक्रदुष्टी ही सर्व आयुर्वेदानुसार स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरची संभाव्य कारणे आहेत.
रजप्रवृत्तीसंबंधीच्या  विकृती,  दोन  रजप्रवृत्तांच्यामध्ये अथवा रजोनिवृत्तीनंतर योनिगत रजस्राव होणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, थोडेसे अन्न  सेवन  केले तरी पोट जड होणे, भूक मंदावणे, मलावष्टंभ, पाठीत दुखणे, अशक्तपणा,  मथुनसमयी  अतिशय वेदना होणे, वजन कमी होणे ही स्त्रीबीजकोशाच्या  कॅन्सरची  लक्षणे  असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, पेट स्कॅन, लॅपॅरोस्कोपी, बायॉफ्सी, सी. ए. १२५ ही रक्त तपासणी करून कॅन्सरचे निदान निश्चित  केले  जाते.  आधुनिक  वैद्यकशास्त्रानुसार शस्त्रकर्माने स्त्रीबीजकोशाचे व पूर्ण गर्भाशयाचे निर्हरण, केमोथेरॅपी, रेडियोथेरॅपी, हार्मोनल चिकित्सा व इम्युनोथेरॅपी या स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरसाठी प्रभावी चिकित्सापद्धती उपलब्ध आहेत. स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरमध्ये आधुनिक चिकित्सा घेऊनही कॅन्सरचा पुनरुद्भव होणे, उदरपोकळीतील अन्य अवयवांत कॅन्सर पसरणे, उदरपोकळीत जलसंचिती होणे असे उपद्रव अनेक रुग्णांमध्ये उद्भवत असल्याने व्याधिप्रतिकारशक्ती वाढविणारी आयुर्वेदिक चिकित्सा लाभदायी ठरते. आयुर्वेदानुसार रस व शुक्र या सौम्य धातूंची दुष्टी नष्ट करून त्यांना बल देणारी शतावरी, गुडूची, कुष्मांडावलेह, सुवर्णमालिनीवसंत ही औषधे; पित्तदोष व रक्तधातूच्या प्रसादनासाठी अनंतमूळ, कमळ, कामदुधा, मौक्तिक भस्म, प्रवाळ भस्म  अशी  शीतगुणाची  औषधे; वातदोषाच्या अनुलोमनासाठी एरंडस्नेह, िहग्वाष्टक चूर्ण  ही औषधे स्त्रीबीजकोशाच्या  कॅन्सरमध्ये उपयुक्त ठरतात. याशिवाय  स्त्रीबीजकोशाची  रचना व क्रिया यावर विशेषत्वाने कार्यकारी अशी चंद्रप्रभा वटी, कुमारी आसव, ही औषधेही गुणकारी ठरतात. रुग्णाचे बल चांगले असल्यास कॅन्सरच्या अपुनर्भवासाठी दरवर्षी बस्ति व वमन चिकित्साही वैद्यांच्या  मार्गदर्शनाखाली  करणे  हितकर  ठरते. नित्य सेवनास हितकर असा सहाही रसांचा समतोल असलेला, अधिक उष्णही नाही व शीतही नाही असा अनुष्णशीत, पाचक परंतु पोषक आहार सेवन करावा. योग्य मात्रेत व्यायाम, प्राणायाम, योगासने व मानसिक स्वास्थ्य या गोष्टीही स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधास व पुनरुद्भव टाळण्यास आवश्यक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ovarian cancer