खरे तर थंडीतच व्यायाम सुरू करावेत असे काही नाही. व्यायाम केव्हाही केला तरी त्याचे फायदे तेवढेच होतात. पण थंडीत घाम कमी येतो, हवा सुसह्य़ असते म्हणून या दिवसांत व्यायाम सुरू करणे बरे वाटते. व्यायामांनी शरीराची व स्नायूंची क्षमता वाढते, ‘स्टॅमिना’ सुधारतो, शरीराला प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमित व्यायामामुळे कोणताही आजार वा अपघात यांना तोंड देण्याची शरीराची क्षमता वाढते आणि एकूणच आरोग्य सुधारते.

हळूहळू व्यायाम वाढवत न्या
कोणताही व्यायाम करायच्या वेळी तो मनात आल्याबरोबर अचानक खूप वेळ करणे सुरू करू नये. अनेक जण कोणाचे तरी पाहून एकदम १-२ तास व्यायाम सुरू करतात किंवा एकदम जिममध्ये जाऊन वजने उचलू पाहतात. पण हे शरीरासाठी तापदायकच ठरते. गाडी शून्य वेगावरून एकदम शंभर वेग पकडत नाही तसेच शरीराला सवय नसताना अतिरेकी ताण दिल्यास इजा होण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे आधी ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग, सूर्यनमस्कार असे सोपे व्यायाम करावेत. व्यायामाचा वेळ व आवर्तने हळूहळू वाढवत नेणेच चांगले.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी

प्रमुख व्यायाम प्रकार
स्नायूंची क्षमता वाढवण्याचे वजन उचलण्यासारखे जिममधले व्यायाम, लवचिकता वाढवण्याचे योगासने व सूर्यनमस्कारांसारखे व्यायाम आणि शरीराची क्षमता (स्टॅमिना/ एंडय़ुरन्स) वाढवण्याचे जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग हे व्यायाम, असे व्यायामांचे तीन प्रमुख प्रकार आहेत. पण नुसताच वजने उचलण्याचा व्यायाम केल्यास स्नायू व सांध्यांना कडकपणा येईल, शरीराची ढबही बिघडू शकेल किंवा नुसतीच लवचीकता वाढवण्याचे व्यायाम केल्यास शरीराचा एंडय़ुरन्स व स्नायूंची क्षमता तितकी वाढणार नाही. त्यामुळे आपल्या व्यायामाच्या आराखडय़ात आपल्या प्रकृतीनुसार या व्यायाम प्रकारांचा योग्य मेळ हवा.

व्यायाम प्रकारांची संख्या नव्हे; पुरेसा वेळ महत्वाचा!
एकाच दिवशी वेगवेगळे व्यायाम प्रकार थोडा-थोडा वेळ चवीपुरते करण्यात फायदा नाही. कोणताही व्यायाम योग्य पद्धतीने व ठरावीक वेळ केल्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे एकेका व्यायामाला पुरेसा वेळ द्यावा. आठवडय़ात प्रत्येकी २ दिवस एक व्यायाम प्रकार करता येईल किंवा एक-दिवसाआड अशा पद्धतीनेही व्यायाम प्रकारांचा मेळ घालून कोष्टक ठरवता येईल.

‘स्ट्रेचिंग’चे व्यायाम महत्त्वाचे!

कोणत्याही ऋतूत व्यायाम करताना व्यायामाच्या आधी व नंतर ‘स्ट्रेचिंग’चे व्यायाम अर्थात ‘वॉर्म अप’ आणि ‘कूल डाऊन’ महत्त्वाचे ठरते. तरुण वयात लवचीकतेमुळे कदाचित एकदम व्यायाम सुरू केल्यास शरीराचे फारसे नुकसान होणार नाही, पण चाळिशीनंतर शरीर कडक होत जाते. त्यामुळे अचानक व्यायाम सुरू केल्यास स्नायू व सांध्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नायूंना हालचालीची सवय होते. ‘वॉर्म अप’ केलेले नसते तेव्हा स्नायू व्यायामासाठी तयार नसतात. ‘कूल डाऊन’चेही महत्त्व तितकेच आहे. अर्धा-पाऊण तास जॉगिंग केल्यावर वेग हळूहळू कमी न करता अचानक थांबल्यास हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास अचानक कमी होईल आणि शरीरासाठी ते बरे नव्हे. त्यामुळे व्यायाम कोणताही असो, तो सुरू करणे व थांबवणे हा बदल हळूहळू केलेला चांगला.
डॉ. मिलिंद गांधी, अस्थिरोगतज्ज्ञ

योगासने सुरू करण्यासाठी उत्तम काळ
थंडीत योग केल्यास अंग उबदार आणि लवचीक राहते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. योगाभ्यासामुळे अन्नाचे पचन चांगले होऊन चयापचय यंत्रणा चांगले काम करते. विशेष म्हणजे थंडीत केलेल्या योगासनांचे फायदे पुढे ७-८ महिने टिकू शकतात. म्हणजेच उन्हाळा व पावसाळ्यात शरीर चांगले तग धरू शकते. नियमित योग शरीर आणि मन टवटवीत आणि उल्हसित करतो, आपण तुलनेने अधिक तरुण दिसू लागतो. थंडीत योगासनांना सुरुवात करताना आधी सूर्यनमस्कार, पर्वतासन, वीरभद्रासन, मत्स्यासन, हलासन ,सर्वागासन या प्रकारची आसने अधिक फायदेशीर ठरतात. आपल्या प्रकृतीनुसार ती शिकून घेऊन केलेली चांगली. थंडीत हवा प्रसन्न असल्यामुळे आपण अधिक वेळ आसनात राहू शकतो. थंडीत सुरू केलेली योगासने नंतरही जरूर सुरू ठेवावीत.
– डॉ. नितीन उनकुले, योग थेरपिस्ट.

अभ्यंग उल्हसित करी शरीरा!
केवळ दिवाळीच्या दिवसांतच नव्हे, तर थंडीत एकुणातच अभ्यंग अर्थात शरीराला तेलाचा मसाज जरूर करावा. थंडीत त्वचा कोरडी पडते. आयुर्वेदानुसार त्वचा ही पंचमहाभुतांमधील वायूपासून बनली आहे असे मानले जाते. म्हणजेच त्वचेत वायूचे अधिक्य असल्याचे मानले जाते. वायू कमी करण्यासाठी स्नेह, स्निग्धता महत्त्वाची. त्यामुळे शरीराला हिवाळ्यात तेल लावणे गरजेचे. अभ्यंगामुळे शरीर ‘रीलॅक्स्ड’ होते, मन उल्हसित होते आणि उत्साह वाढतो.
मसाजसाठी थंडीत तिळाचे तेल वापरणे चांगले, पण त्याखालोखाल इतर तेलेही वापरता येतील. तेल वाताला कमी करणारे, शरीराचे पोषण करणारे, त्वचेचे प्रसाधन करणारे हवे. बेलाची मुळी, अग्नीमन्थ वनस्पतीची मुळी, एरंडाचे मूळ ही द्रव्ये वात कमी करणारी द्रव्ये आहेत. मसाजचे तेल तयार करण्यासाठी या द्रव्यांचा वापर केला जातो.
दिवाळीत तेलाबरोबर उटणे लावतात. पूर्वी साबण लावला जात नसे त्यामुळे उटणे अभ्यंगानंतर शरीरावरील तेल धुवून टाकण्यासाठी फायदेशीर ठरे. आधी तेलाचा अभ्यंग करून १५ मिनिटांनी गरम पाण्यात कापड बुडवून अंग पुसून घ्यावे आणि नंतर आंघोळ करताना त्वचेवरील उरलेले तेल काढण्यासाठी उटण्याचा वापर जरूर करावा.
– वैद्य राहुल सराफ