26 June 2019

News Flash

युफोर्बिया मिली

युफोर्बयिा मिली ही चिकाच्या निवडुंगाचीच एक जात आहे.

युफोर्बयिा मिली ही चिकाच्या निवडुंगाचीच एक जात आहे. भारतात अनेक ठिकाणी शेताच्या कडेला कुंपणासाठी चिकाच्या निवडुंगाची लागवड केली जाते; कारण ह्य़ा  निवडुंगाला काटेही असतात आणि गुरे-ढोरेही चिकाचा निवडुंग किंवा त्याची पाने खात नाहीत. खरे तर चिकाच्या निवडुंगाचे मूळ स्थान भारत नसून आफ्रिका खंडातील वाळवंटी प्रदेश आहे. ह्य़ा चिकाच्या निवडुंगाला फुले येत असली तरी ती अगदीच छोटुकली व अनाकर्षक असतात. पण ह्य़ा चिकाच्या निवडुंगाचे एक जवळचे भावंड म्हणजे युफोर्बयिा मिली.

युफोर्बयिा मिलीच्या बुंध्यावर, दाटीवाटीने खूप काटे असतात. म्हणूनच युफोर्बयिा मिलीचे इंग्रजीतील साधारण नाव आहे “Crown of thorns.”  ही झाडे जरा ठेंगणी ठुसकीच असतात. तसे पहिले तर युफोर्बयिा मिलीची फुलेही अगदीच छोटुकली व अनाकर्षक असतात. पण त्या अनाकर्षक फुलांना एक आगळेच सौंदर्य प्राप्त करून देण्यात प्रत्येक फुलासभोवार दोन पुष्प छदे (bracts) असतात. ही पुष्प छदे रंगीत असतात. ह्य़ा पुष्प छदांत अनेक रंग असलेले प्रकार सापडतात; त्यातही लाल रंग जास्त प्रामुख्याने आढळतो. गंमत अशी की, मधल्या फुलाच्या परस्पर विरुद्ध दिशांना असणाऱ्या ह्य़ा पुष्प छदांची रचना जणू काही चुंबन घेणाऱ्या ओठांसारखी असते. ह्य़ाच कारणाने ह्य़ा फुलांना ‘Kiss-me-quick’ असे गमतीदार नावही आहे.

युफोर्बयिा मिली ही वनस्पती वाळवंटातील असल्याने, पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी हिला आपल्या अवयवांत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते; अशा वनस्पतींना इंग्रजीत ‘succulent’ अशी संज्ञा आहे. एक वेळ अशा वनस्पतींना पाण्याची वानवा झाली तरी चालू शकते; परंतु गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाल्यास मात्र ह्य़ा बिलकूल तगू शकत नाहीत. जास्त पाण्याने त्यांचा कुजका लगदाच होऊन जातो. म्हणूनच पावसाळ्यात ह्य़ांचा पावसापासून बचाव करणे फार जरुरीचे असते. लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या मिश्रणात खडबडीत वाळूचे प्रमाण जास्त ठेवावे, जेणेकरून जास्त पाणी पडल्यास त्याचा सत्वर निचरा होईल. साधारणपणे तीन भाग वाळू, एक भाग बागकामाची माती आणि एक भाग शेणखत किंवा पालापाचोळ्याचे खत असे मिश्रण करून घ्यावे. ह्य़ा वाळवंटी वनस्पतीला भरपूर उन्हाच्या जागीच ठेवावे. उन्हाची कमतरता भासल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे फुले कमी व पानेच जास्त असा प्रकार होतो.

ही वनस्पती रोग-किडींना सहसा बळी पडत नाही; त्यामुळे कीटकनाशके वगरे फवारण्याची गरज पडत नाही. ह्य़ा वनस्पतीची लागवड फांद्यांचे तुकडे लावून करता येते. ह्य़ा वनस्पतीची आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे क्वचित वेळी एका फुलातून दुसरे फूल किंवा चक्क दुसरे छोटुकले रोप उगवलेले दिसते. पण हे खरे नसते, कारण ते दुसरे फूल किंवा रोप फुलातून उगवलेले नसते; ते पुष्प छदामागील गाठीतून (node) फुटलेले असते. अशा जवळ जवळ वर्षभर फुलत राहणाऱ्या आणि कणखर झुडपाला आपल्या बागेत लावून तर पाहा.

नंदन कलबाग – response.lokprabha@expressindia.com

First Published on November 20, 2015 1:15 am

Web Title: euphorbia milii