08 April 2020

News Flash

रंग-२

माणसाच्या स्वभावाप्रमाणेच रंगांमध्येसुद्धा गरम व थंड प्रकृतीचे रंग असतात.

माणसाच्या स्वभावाप्रमाणेच रंगांमध्येसुद्धा गरम व थंड प्रकृतीचे रंग असतात. त्यांचा योग्य समतोल साधत रंगसंगती केली की आकर्षक रंगसंगतीबरोबरच योग्य तो मानसिक परिणामही साधता येतो. त्यासाठीच हॉल, किचन, विश्रांतीची खोली अशा प्रत्येक ठिकाणी रंगांचा वेगवेगळा विचार करावा लागतो.

घटस्फोट- मध्यंतरीच्या काळात या शब्दाने माझी झोपच उडाली होती. लोकांच्या घराची सजावट करता करता नवरा-बायकोचे भांडण सोडवण्याचे काम मला सतत करायला लागायचे. इतर वेळी गोडी-गुलाबीने वागणारे जोडपे रंगाच्या बाबतीत इतके हमरीतुमरीवर येऊन भांडायला लागायचे की वाटायचे, झाला आता काडीमोड! एकाचा रंग दुसऱ्याला पसंत पडेल तर शप्पथ. एकाला निळी टेक्श्चरची भिंत पाहिजे तर दुसऱ्याला जांभळी, तिला केशरी पडदे पाहिजेत तर त्याला हिरवे. यांच्या भांडणात मधल्यामध्ये माझी संकल्पना, माझे डिझाइन याचा मलाच विसर पडायचा.. आणि अशा वेळी न्यूटनकाकांनी बनवलेले रंगचR  देवासारखे माझ्या मदतीला धावून यायचे. दोघांची मर्जी सांभाळून सजावटीबरोबर संसारातपण रंग भरणे यामुळे मला खूप सोप्पे गेले.

माणसाच्या स्वभावाप्रमाणेच रंगांमध्येसुद्धा गरम व थंड प्रकृतीचे रंग असतात. रंग चक्रामध्ये दिसून येईल की लाल, पिवळा व दोघांच्या मिश्रणाने तयार झालेला केशरी, हे रंग गरम/उष्ण गटात मोडतात. तसेच थंड/शीतल रंगांमध्ये निळा व हिरवा हे रंग प्रामुख्याने येतात. लाल व निळ्या रंगाच्या मिश्रणाने तयार होतो जांभळा रंग. हा रंग उष्ण गटात मोडतो, जर का यामध्ये लाल रंगाचा प्रभाव जास्त असेल तर आणि निळ्या रंगाची मात्रा जास्त असेल तर शीतल गटात मोडतो.

उष्ण गटात येणारे लाल, पिवळा व केशरी हे रंग बघताक्षणी आपल्या मनात काय भावना जागृत होतात? आपल्याला एकदम आळस झटकून उत्साही वाटते. सूर्य किरणांशी जुळणारे हे रंग अंगात जोश आणतात. यांच्या सान्निध्यात आशावादी वाटून सगळी मरगळ निघून जाते. डोक्याला चालना देणारे हे रंग बहुतेक करून मुलांच्या खेळण्याच्या जागी, शिशुवर्गात वापरले जातात. घरामध्ये दिवाणखान्यात हे रंग आलेल्या पाहुण्यांचे हसून स्वागत करतात. या रंगांनी घराला एकप्रकारचा आपलेपणा येतो. जेवणाच्या खोलीत, स्वयंपाकघरात यांचा संयत वापर सजावटीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. फक्त ‘अति तिथे माती’ या युक्तीनुसार उष्ण रंगांचा समतोल सांभाळणे गरजेचे आहे. मुख्य करून लाल रंग. या आक्रमक रंगाचा अती वापर सजावटीत अस्वस्थपणा निर्माण करतो. चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव या गोष्टी जोर धरू लागतात. त्यामुळे शक्यतो उष्ण रंगांच्या मूळ गडद छटा न वापरता पांढरा रंग मिसळून एकतर गुलाबी, हलका  केशरी, पिवळसर असे सौम्य किंवा काळा रंग मिसळून मरून किंवा गेरूसारखे निसर्गाशी मिळतेजुळते रंग वापरावेत.

जिथे आपल्याला विश्रांती- एकाग्रतेची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी शीतल रंग आपल्या कामी येतात. या रंगांच्या सान्निध्यात माणसाला शांत, संतुष्ट वाटते. साहजिकच झोपायच्या खोलीत, ध्यानधारणेच्या जागी, अभ्यासाच्या जागी शीतल रंगांनी चांगलाच फरक पडू शकतो. बऱ्याच ऑफिसेस, बँकांच्या सजावटीत निळ्या रंगाला प्राधान्य दिले जाते, यामागे एकाग्र चित्ताने काम करणे हे उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे स्पा, मसाज रूममध्ये हिरव्या-निळ्या रंगांना पर्याय नाही.

या चक्राच्या सहाय्याने आपण कधी विचारपण न केलेल्या रंगांच्या जोडय़ा एकत्र आल्या आणि सजावटीला वेगळ्याच पातळीवर घेऊन गेल्या. आपण आजूबाजूला नजर फिरवली तर या रंगचक्राचा वापर सजावटीबरोबरच माणसांच्या कपडय़ांत, फॅशन विश्वात सढळपणे केलेला आढळतो.

पूर्वीच्या काळी बायकांना साडीला तंतोतंत मॅचिंग लागायचे. दहा वेळा उन्हात नेऊन ब्लाऊज व साडी न्याहाळली जायची. तेव्हा उन्नीस- बीसचा फरकसुद्धा जीवावर येऊन स्वीकारला जायचा. पण आता बघाल तर हिरव्या साडीला लाल ब्लाउज, निळ्या ड्रेसवर केशरी ओढणी.. उन्नीस-बीसच काय, दुरान्वयेपण संबंध नसलेले हे रंग. पण किती छान दिसते त्यांची जोडी. रंगचक्रात या जोडीचे नाव आहे, पूरक रंग म्हणजे कॉम्प्लिमेंट्री कलर्स  (complementary colours). अगदी अचूक नाव. नवरा-बायकोच्या भांडणात हीच तर जोडी माझ्या कामी आली! नवरा- बायकोसारखेच हे रंगदेखील विरुद्ध प्रकृतीचे व स्वभावाचे. रंगचक्र बघितले तर एकमेकांच्या अगदी समोरासमोर उभे ठाकलेले. पण हेच विरुद्ध स्वभाव संसारात मजा आणतात. ज्या प्रमाणे ही जोडी एकमेकांना पूरक ठरते, एकाची उणीव दुसरा भरून काढतो, त्याप्रमाणे हे रंगदेखील समतोल साधतात. मॅचिंग करण्याच्या नादात आलेला एकसुरीपणा या जोडय़ांमुळे जाऊन, वातावरणात एकदम चैतन्य निर्माण होते. रंगचक्र बघितल्यास लाल-हिरवा, निळा-केशरी, पिवळा-जांभळा अशा एक प्राथमिक व एक दुय्यम रंगांतून तयार झालेल्या जोडय़ा दिसतील. या जोडीचे सगळ्यांना आवडणारे उदाहरण म्हणजे नाताळचा देखावा. हिरवीगार ख्रिसमसची झाडे, त्यावर लाल रंगाचे लोलक व झिरमिळ्या आणि लाल पोशाखातला सांताक्लॉज! कुठल्याही वयाच्या माणसाला आनंद वाटला नाही तरच नवल. सगळेच किती सुंदर, उत्साही. ही जोडी घेऊन केलेली सजावटदेखील अशीच हटके, नावीन्यपूर्ण दिसते. जसे आजकाल रंगीबेरंगी अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंट असलेली कापडे बाजारात पाहायला मिळतात, तसे मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असताना पिवळा व जांभळा या दोन रंगांची जोडी एकदम हिट झाली होती. तेव्हा रंगांचा अभ्यास केला नव्हता. पण नेहमीपेक्षा ही रंगसंगती काहीतरी खास आणि आकर्षक आहे हे लगेच लक्षात आले. त्यामुळे ज्या मुलीकडे या रंगाचा ड्रेस तिचा फॅशनसेन्स चांगला अशी धारणा आपोआप मनात तयार झाली होती.

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणे जरुरीचे आहे की कधीही हे दोन्ही रंग ५०-५० टक्के वापरू नयेत. जसा दालफ्रायचा ‘तडका’ महत्त्वाचा असतो, तसे आपल्या संकल्पनेनुसार, जागेनुसार एक मुख्य रंग ठेवून दुसरा रंग तडका देण्यासाठी वापरायचा. झणझणीत व लक्षात राहण्यासारखा. या जोडय़ा सार्वजनिक जागांमध्ये, मीटिंगच्या जागी, दिवाणखान्यात वापरू शकतो. लक्ष आकर्षित करणाऱ्या वैशिष्टय़ामुळे याचा वापर मुलांच्या कार्टूनमध्ये सढळ हाताने आढळतो. पूरक रंगांनी बनवलेली चित्रे जास्त उठावदार दिसतात.

अशा अजूनही काही जोडय़ा रंगसंगतीत वापरल्या जातात. प्रत्येक जोडीचे वेगळे वैशिष्टय़, वेगळा परिणाम. आपल्या आवडीनुसार व संकल्पनेनुसार त्याचा अचूक वापर करणे जरुरीचे आहे. तो कसा करायचा हे पुढील लेखात.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 1:18 am

Web Title: colour 4
टॅग Colour
Next Stories
1 रंग माझा वेगळा
2 प्रमाणबद्धता
3 ताल आणि लय
Just Now!
X