31 October 2020

News Flash

रंग-४

रंग या घटकाचा बऱ्याच ठिकाणी खूप बारकाईने विचार केलेला असतो.

रंग या घटकाचा बऱ्याच ठिकाणी खूप बारकाईने विचार केलेला असतो. अमुक ठिकाणी केशरी, तमुक ठिकाणी जांभळा, कुठे गडद निळा रंग वापरला असेल तर तो का, याचे उत्तर आपल्याला रंगांचं मानसशास्त्र समजून घेतलं तर मिळू शकतं.

रंगाच्या मानसशास्त्राबद्दल खूप मजेशीर किस्से आजूबाजूला पाहायला मिळतात. एका सव्‍‌र्हेत असे दिसून आले आहे की, ग्राहक पहिल्या ९० सेकंदांत ठरवतो की एखादी गोष्ट घ्यायची का नाही ते आणि त्याचा होकार ठरतो मुख्यत: वस्तूच्या रंगावर!! अर्थातच कंपनी, आकार या गोष्टी मुख्य भूमिका बजावतात, पण नंतर. प्रथम जी गोष्ट आकर्षति करते ती गोष्ट म्हणजे रंग. उगीच कंपनीच्या सीईओच्या मुलीला आवडतो म्हणून किंवा हा शुभ रंग आहे म्हणून रंग दिले जात नाहीत. त्यामागे रंगाचा जनमानसावर काय परिणाम होईल हे ठरवायला निष्णात रंगतज्ज्ञांची टीम असते. आपल्या याच मानसशास्त्राचा उपयोग ऑनलाइन शॉिपगच्या साइट्सवरही केला जातो. पसे भरण्यासाठीचे ‘८ी२’ चे बटन हे बरेच वेळा पिवळ्या किंवा केशरी रंगाचे असते. हेच रंग का, तर हे रंग आपले लक्ष आकर्षति करतात, आपल्याला निर्णय घ्यायला उद्युक्तकरतात म्हणून.

कधी तुमच्या लक्षात आले आहे का, की रंगांच्या बाबतीत ज्याचा आपण विचारही करू शकणार नाही अशा औषधांच्या गोळ्यासुद्धा विशिष्ट रंगाच्या असतात? बऱ्याच वेळेला झोपेच्या गोळ्या या निळ्या, हिरव्या किंवा अगदीच काही नाही तर पांढऱ्या अशा शीतल गटात मोडणाऱ्या असतात. तर शक्ती व अंगात ताकद वाढवणारे टॉनिक व गोळ्या लाल/ केशरी रंगाच्या असतात? असे का? तर या दोन्ही औषधांच्या गोळ्या असूनसुद्धा त्या घेण्याची कारणे वेगवेगळी आहेत. हातातून तोंडात जाईपर्यंत या रंगांचा आपल्या मेंदूवर त्या त्या रंगानुसार सकारात्मक परिणाम होतो. काही वर्षांपूर्वी स्कॉटलंडमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. त्या वेळी केलेल्या एका प्रयोगात असे दिसून आले की रस्त्यांवर फक्त जास्तीचे दिवे लावून गुन्हेगारीचे प्रमाण आटोक्यात येत  नाही तर, निळ्या प्रकाशाचे दिवे लावल्याने गुन्हेगारीत लक्षणीयरीत्या घट होत आहे. यामध्ये निळ्या रंगामुळे गुन्हेगारांच्या मानसिकतेत होणारे सकारात्मक बदल अभ्यासले गेले.

रंग व आपल्या शरीर-मनावरील त्याचा प्रभाव याचा अभ्यास आपल्या पूर्वजांनी खूप वर्षांपूर्वीच केला होता. आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रंग हा विशिष्ट तरंग लहरींनी बनलेला असतो. या तरंग लहरी आपल्या शरीरातील विशिष्ट ग्रंथींना चालना देतात, ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर पडतो. रंगांच्या याच अभ्यासातून पुढे आली ‘रंगचिकित्सा’ उपचारपद्धती. जी अजूनही वापरली जाते. याा उपचारपद्धतीत शरीरातील मेंदूपासून मणक्याच्या टोकापर्यंत सात ग्रंथींच्या जागा व त्यांना चालना देणारे रंग अभ्यासिले गेले. हे सात रंग आहेत जांभळा, गडद निळा (्रल्ल्िरॠ), आकाशी निळा, हिरवा, पिवळा, केशरी व लाल. या लेखात आपण पहिल्या दोन रंगांचा आपल्यावरील प्रभाव व त्याला अनुसरून केलेली गृहरचना जाणून घेऊ या.

जांभळ्या रंगाचे आपल्या शरीरातील मूळ कार्यस्थळ आहे मेंदू. जांभळ्या रंगाच्या लहरींनी मेंदूतील पीनीअल ग्रंथी चेतवल्या जातात. या ग्रंथींचे मूळ कार्य आहे झोपेचे तंत्र सांभाळणे. त्याचबरोबर आपल्या शरीरातील तापमान राखणे व सर्व शरीराचा समतोल साधणे. बऱ्याच शारीरिक तक्रारींचे मूळ कारण हे अपुऱ्या झोपेत असते. त्यामुळे अर्थातच जांभळ्या रंगाने रंगवलेली आपली झोपायची खोली या तक्रारी काही प्रमाणात कमी करू शकेल. हा रंग एक प्रकारची शांतता निर्माण करतो. या रंगाला आध्यात्मिक बठक आहे. स्वत:च्या पलीकडे विचार करायला लावणारा हा रंग अंतराळ, परमात्मा वगरे गोष्टी चितारताना खूप उपयोगी पडतो. म्हणूनच ध्यानधारणेच्या खोलीत, पूजा खोलीत हा रंग वापरल्यास उत्तम. या रंगाचा विश्रांतीच्या ठिकाणी केलेला वापर नक्कीच लाभदायी ठरतो.

निसर्गात जांभळा रंग बाकीच्या रंगांच्या मानाने कमी प्रमाणात दिसून येतो. या रंगाला बनवण्याचे कौशल्यसुद्धा माणसाला त्यामानाने बऱ्याच उशिरा अवगत झाले. या रंग निर्मितीमधील तुटवडय़ामुळे असेल आणि आधी फक्त श्रीमंतांसाठी हा रंग बनवला गेल्यामुळे असेल. जांभळ्या रंगाला एक शाही रंग म्हणून वलय प्राप्त झाले. याचा श्रीमंती थाट पूर्वीच्या राजेमहाराज्यांच्या पोशाखातून व राजवाडय़ांच्या सजावटीतून सढळपणे केलेला आढळतो. आजच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर कॅडबरी चॉकलेट. डोळ्यासमोर या चॉकलेटचे आवरण आणा. आता डोळे मिटून मनातल्या मनात त्याचा तो गर्द जांभळा रंग बदलून दुसरा कुठलाही रंग द्या. जांभळ्या रंगाचा शाही, श्रीमंतीपणा दुसऱ्या कुठल्या रंगात येतोय? मला वाटते आपल्या मनातल्या याच त्या रंगाच्या प्रतिमेमुळे, आज इतकी वष्रे हे चॉकलेट उच्च दर्जाचे, अभिरुचीसंपन्न म्हणून लोकांच्या मनात ठाण मांडून बसले आहे.

रंगचिकित्सेमध्ये दुसरा रंग येतो गडद निळा किंवा नेव्ही ब्ल्यू. जे लोक उपासना, ध्यानधारणा करतात ते आपले लक्ष दोन भुवयांच्या मध्ये केंद्रित करतात. हीच जागा आहे या रंगाची. या रंगाचा प्रभाव पिट्युटरी ग्रंथीवर पडतो. सर्व ग्रंथींमधील ही गुरू ग्रंथी. आपली मानसिक व शारीरिक वाढ ही या ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. शीतल गटात मोडल्यामुळे हा रंग शांतता निर्माण करतो. या रंगाच्या सान्निध्यात आपले मन एकाग्र व्हायला मदत होते. मनाचा चंचलपणा कमी होतो. रंगाच्या या खासियतीमुळे अभ्यासाची खोली, लायब्ररी अशा ठिकाणी हा रंग लावल्यास उत्तम. बऱ्याच ठिकाणी अभ्यासाची वेगळी खोली असण्याची चन आपल्याला परवडत नाही. अशा वेळी समोरचा सॉफ्टबोर्ड तरी आपण या रंगाचा करू शकतो. जेणेकरून मन विचलित न होता एकाग्रता वाढीस लागेल. हा रंग फक्त आपली माहिती वाढवत नाही, तर सखोल ज्ञान वाढवायला मदत करतो. विचारशक्तीला चालना देतो.

हा लेख लिहिताना सहज माझे आजूबाजूला लक्ष गेले तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या डॉक्टर नवऱ्याची एकूण एक वैद्यकीय पुस्तकांची कव्हरे ही या गर्द निळ्या रंगाची आहेत. अगदी ठरवून सजावट केल्यासारखी. या पुस्तकांचे वाचन करताना आवश्यक असणारी मनाची एकाग्रता, स्थिरता व आकलनशक्ती या रंगाच्या क्षमतेमुळे वाढत असावी का? आश्चर्य म्हणजे त्याच्या बाजूची माझी गृहसजावट व वास्तुशास्त्रावरची पुस्तके जास्त करून पिवळ्या व केशरी  रंगांच्या विविध छटांनी बनवलेली आहेत!!  हेच रंग का, याला पण कारणे आहेत. ती आपण पुढील लेखात बघणारच आहोत.

वाचन व अभ्यास या ठिकाणांबरोबरच  मसाज, फिजिओथेरपी रूममध्ये जिथे काळजीपूर्वक एकेका स्नायूंवर काम करावे लागते अशा ठिकाणीही गडद निळा रंग आपली कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतो. या रंगाची आपल्या मनात एक ‘प्रामाणिक व  कष्टाळू’ रंग म्हणून प्रतिमा तयार होते. त्यामुळे विश्वास संपादन करायला बऱ्याच कंपन्यांचे लोगोही या रंगात असतात.

याचा अर्थ असा आहे का की वर दिलेले हे रंग हे त्या त्या जागी वापरले नाही तर त्सुनामी येईल? अजिबात नाही. कुठलेही रंग कुठेही वापरून सजावट आकर्षक झालेली आपण किती तरी वेळा बघितले आहे. पण ज्या ठिकाणी आपण दिवसाचे जास्तीत जास्त तास घालवतो, अशा ठिकाणी सजावट फक्त आकर्षक दिसणेच पुरेसे नसते. त्या जागेचा वापर करणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम काय होतो हे लक्षात घेणेही जरुरीचे आहे. म्हणूनच सजावटीच्या बाकी इतर गोष्टींबरोबर प्रत्येक रंगाच्या वैशिष्टय़ांनुसार  व स्वभावानुसार गृहसजावट केल्यास मानसिक व पर्यायाने शारीरिक फायदा होतो हे मात्र नक्की!!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:16 am

Web Title: colour interior design
Next Stories
1 रंग-३
2 रंग-२
3 रंग माझा वेगळा
Just Now!
X