08 April 2020

News Flash

रंग-३

परीक्षेच्या पेपरमधला माझा आवडता प्रश्न असायचा जोडय़ा लावणे. पाचापैकी पाच मार्क्‍स हमखास मिळायचेच.

घर सजवताना इतर कशाहीपेक्षा जास्त उठाव येतो तो रंगांमुळे. पण हे रंग कसेही वापरायचे नसतात, तर त्यांच्या वापराचंही एक शास्त्र आहे. आपल्याला रंगांमधून नेमका कोणता परिणाम साधायचा आहे, यावर कोणते रंग वापरायचे ठरवता येतं.

परीक्षेच्या पेपरमधला माझा आवडता प्रश्न असायचा जोडय़ा लावणे. पाचापैकी पाच मार्क्‍स हमखास मिळायचेच. हीच आवड पुढे कॉलेजमध्ये मुला-मुलींच्या, हिरो- हिरोइनच्या जोडय़ा जमवण्यात कामी आली आणि आवडीचे रूपांतर कधी कधी ‘हिला ना, जोडय़ा जमवण्याची खोडच आहे’ म्हणून हिणवण्यात झाली. पण माझा हा छंद मी कायम ठेवला. माझ्या व्यवसायात याचा इतका उपयोग होईल असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. गृहसजावट करताना कितीही उंची फर्निचर वापरले, काश्मिरी गालिचे अंथरले किंवा परदेशी शोभेच्या वस्तू मांडल्या तरी सजावटीला पूर्णत्व येते फक्त आणि फक्त रंगामुळे. हीच रंगांची कार्यपद्धती मला मनापासून आवडते, कारण यात जोडय़ा जमवाव्या लागतात की कुठल्या रंगाबरोबर कुठला रंग चांगला दिसेल!
लाल, पिवळा व केशरी या उष्ण रंगांच्या जोडय़ा, निळा-हिरवा व जांभळा घेऊन शीतल रंगांच्या जोडय़ा व रंगचक्रात एकमेकांच्या विरुद्ध उभ्या असलेल्या पूरक रंगांच्या जोडय़ा. मागच्या लेखात रंगचक्र म्हणजे काय व त्याच्या आधाराने या जोडय़ा सजावटीत कशा वापरायच्या हे आपण बघितले. अशीच सजावटकाराची अजून एक लाडकी जोडी आहे, त्या जोडीचे नाव अ‍ॅनॉलॉग्ज (Analogous) किंवा ‘समरंगी’ जोडी. हा जोडीचा प्रकार म्हणजे जणू शाळेत एका बाकावर बसलेले जिवाभावाचे सवंगडी. प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, पण जगासमोर आपली ओळख अभिमानाने मिरवायला आवडते ‘त्या चौकडी’तील एक, अशीच. रंगचक्रात कुठलेही तीन किंवा चार बाजूबाजूचे रंग घेऊन ही जोडी तयार होते. पूरक रंगांसारखे विरुद्ध स्वभावाचे रंग नसल्याने घरात, ऑफिसमध्ये ही जोडी वापरून केलेली सजावट खूप शांत, प्रसन्न वाटते. यामध्ये एखादा मुख्य रंग ठेवून बाकीचे रंग साहाय्यक म्हणूनसुद्धा वापरू शकतो. उष्ण किंवा शीतल जो परिणाम आपण साधू इच्छितो त्यानुसार रंगांची जोडी आपण घेऊ शकतो. रंग जरी वेगवेगळे असले तरी एकमेकांत मिसळून जाणारे हे रंग कधीच एकदुसऱ्यापेक्षा वरचढ वाटत नाहीत. त्यामुळे अशा सजावटीच्या जागा आपल्याशा वाटतात. त्याचा कंटाळा येत नाही. शीतल रंगांच्या तीन-चार बाजूबाजूच्या छटा विश्रांतीच्या, झोपेच्या, लायब्ररीच्या जागी वापरू शकतो. पिवळा, भगवा व थोडा लाल असे उष्ण रंग वापरून मुलांची खोली, दिवाणखाना, स्वयंपाकघर सजवता येईल. रंगचक्र आपल्या मदतीला असल्याने थोडेसे धाडस करून थोडे उष्ण व थोडे शीतल रंग कल्पकतेने वापरून निराळाच परिणाम साधता येईल.
समरंगी जोडीला मिळतीजुळती अजून एक जोडी आहे, मोनोक्रॅमॅटिक (Monochromatic) किंवा ‘एकरंगी’. करायला खूप सोपी. यामध्ये एकाच रंगाच्या विविध छटा वापरल्या जातात. आपल्या आवडत्या रंगाच्या गडदपासून सौम्यपर्यंत कितीही छटा या सजावटीत आपण वापरू शकतो. एकाच रंगाला पकडून ठेवल्याने या सजावटीत चुकायची शक्यता कमी असते. दोन्ही रंग एकमेकांशी जुळतील का ही चिंता नसते.
एकरंगी सजावटपण वातावरणात प्रसन्नता आणते. फक्त तो रंग कुठला वापरला आहे यावर ते अवलंबून असते. प्रत्येक रंगाचा जसा सकारात्मक प्रभाव पडतो तसाच त्या रंगाच्या अति वापराने नकारात्मक परिणामपण होऊ शकतो. म्हणूनच वापरायला सोप्पी असली तरी याचा वापर कल्पकतेने करणे जरुरी आहे.
एकरंगी जोडीमध्ये नकारात्मक प्रभाव कमी होण्यासाठी म्हणून पांढरा, बेज, काळा किंवा राखाडी हे तटस्थ रंग वापरले जातात. तटस्थ म्हणजे या रंगांची उपस्थिती आजूबाजूच्या रंगांवर मात करत नाही. त्यांच्या असण्याने रंगांच्या संकल्पनेत काही फरक पडत नाही. एखाद्या खंबीर पाठीराख्यासारखे हे रंग मागे राहून सजावटीत उठाव आणतात. तटस्थ रंग न वापरता फक्त एकाच रंगाच्या छटा भिंतीपासून फर्निचपर्यंत केल्यास कधीकधी फार कंटाळवाण्या, कधी उदासवाण्या तर कधी खूप संत्रस्त होऊ शकतात.
रंगांच्या या मुख्य जोडय़ांपासून बनलेल्या अजूनही काही जोडय़ा आहेत. त्यामध्ये दोन पूरक रंगांऐवजी तीन किंवा चार रंग घेऊन केलेली ‘दुहेरी पूरक’ जोडी, रंगचक्रात समान जागा सोडून तीन रंग जोडून केलेली ट्रायाडिक (Triadic) त्रिकुटाची जोडी. या जोडय़ापण फार सुंदर व वेगळ्या दिसतात. अगदी निराळ्याच रंगसंगतीने सजावट खुलून येते.
रंग म्हटले की तो भिंतीवरच लावायचा असा आपला समज आहे. वरील जोडय़ा भिंतींपुरत्याच मर्यादित न ठेवता, ज्या गोष्टी आपण बदलू शकतो अशा तुमच्या फर्निचर, पडद्यांवर, चादरीवर वापरल्यास जास्त चांगले. भिंतींचा रंग बदलणे हे वेळखाऊ व त्रासदायक काम असल्याने बरेचदा रंगकाम टाळण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे वर्षांनुवर्षे सजावटीत तोचतोचपणा येऊन कंटाळवाणे होते. अशा वेळी पडदे, चादरी, कुशन्स, सोफ्याचे (बदलता येणारे) कापड या अशा गोष्टी आहेत ज्यांचे वरील जोडय़ांच्या संकल्पनेनुसार वेगवेगळ्या रंगांचे सेट करून ठेवल्यास दर तीन-चार महिन्यांनी सजावट बदलल्याचा आनंद मिळू शकतो. भिंतीच्या रंगानुसार कधी तुम्ही समरंगी जोडी, कधी विरुद्ध रंगाचे कुशन्स वापरून पूरक जोडी, तर कधी भिंतीच्याच रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरून एकरंगी जोडीने सजावट खुलवू शकता.
अशा या रंगांच्या जोडय़ा! जसे ‘ट’ ला ट आणि ‘फ’ ला फ जुळवून यमक केले तरी त्याला काव्याचा दर्जा मिळेलच याची शाश्वती नसते. तसेच भिंती रंगवल्या आणि रंगीत पडदे टांगले की त्याला ‘चांगल्या सजावटी’चे प्रमाणपत्र मिळेलच असे नाही. त्यासाठी मूळ संकल्पना, त्या रंगांचा एकमेकांशी असलेला संबंध, आजूबाजूच्या परिसरावर झालेला परिणाम, साधलेला समतोल, या गोष्टीपण महत्त्वाच्या असतात. यासाठी रंगचक्र व वरील बनवलेल्या जोडय़ा आपल्या कामी येतात. त्यांच्या अभ्यासपूर्ण वापराने आपले घर दीर्घकाळ सुंदर दिसेल हे नक्की.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2016 1:01 am

Web Title: colour plays an important role in the interior home design
Next Stories
1 रंग-२
2 रंग माझा वेगळा
3 प्रमाणबद्धता
Just Now!
X