08 April 2020

News Flash

रंग माझा वेगळा

रंगांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते कारण ते आपलं जीवन अर्थपूर्ण करतात.

रंगांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते कारण ते आपलं जीवन अर्थपूर्ण करतात. रंग निव्वळ रंगसंगतीसाठी नसतात तर त्यांना आपल्या भावजीवनातही महत्त्वाची भूमिका बजावतात आणि म्हणूनच घराच्या सजावटीमध्ये त्यांचं अस्तित्त्व अपरिहार्य असंच आहे.

कॉलेजमध्ये असताना ‘रोझ डे’च्या दिवशी बऱ्याच मुला-मुलींची धाकधूक होत असते. आपल्या मनातला राजकुमार किंवा राजकन्या आपल्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल गुलाब देणार का पिवळ्या गुलाबावरच आपली बोळवण करणार!! खरे तर फूल ते फूलच. पण याच्या रंगामागे दडलेल्या अर्थामुळे त्या वयात हा जीवन मरणाचा प्रश्न बनतो. पिवळा गुलाब हातात आल्यावर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघितला आहे. या फुलांच्या रंगाला माणसाने अर्थ चिकटवला. पण खरेच का हे रंग माणसाचे जीवन अर्थपूर्ण करतात? हो. नक्कीच.

अगदी रोजचे साधेच उदाहरण बघू या. सकाळी गरमागरम चहाचा आस्वाद आपण जिभेआधी डोळ्यांनी घेतो. आपल्या आवडीनुसार चहा झाला आहे की नाही हे त्याच्या रंगावरून कळते. मगच कप तोंडाला लावला जातो. मार्केटमधील भाजी ताजी आहे का शिळी हे त्याच्या बदललेल्या रंगावरून जोखता येते. वरण-भात, पोळी, चटणी, भाजी-कोशिंबीर यांनी सजलेले महाराष्ट्रीयन ताट पोटाबरोबर नजरेलापण त्याच्या विविध रंगांनी तृप्त करते. बाजारात नवीन आलेल्या वस्तूचा खप होण्यासाठी त्याच्या पॅकिंगवरील रंगसंगतीचा खूप हातभार असतो. आतल्या वस्तूची वैशिष्टय़े, उपयुक्तता ही नंतरची गोष्ट. एखाद्या कंपनीचा लोगो म्हणजे त्याची ओळख. हा लोगो कुठल्या रंगाचा घेतल्यास आपल्याप्रति विश्वास वाटेल, यासाठी मोठय़ा कंपन्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेतात. बालवयात मुलांना अ, ब, क, ड व आकडय़ांबरोबर अजून एक आवर्जून शिकवली जाणारी गोष्ट म्हणजे रंग! यावरूनच आपल्या लक्षात येईल की रंग ही आपल्या जीवनातील किती आवश्यक गोष्ट आहे.

रंग म्हणजे काय? ते कसे तयार होतात? प्रत्येक रंग हा वेगवेगळ्या तरंगलहरींपासून तयार होतो. जसजशी या लहरींची लांबी बदलते त्याप्रमाणे आपल्या डोळ्यांना दिसणारे रंगदेखील बदलतात. आपले डोळे साधारण ३९०-७०० नॅनोमीटरच्या मधील तरंगलहरींचे रंग बघू शकतात. त्यापेक्षा कमी किंवा जास्त लहरींपासून तयार झालेले रंग आपण बघू शकत नाही. जगात कुठलीच गोष्ट स्थिर नसते. या तरंगलहरीसुद्धा विशिष्ट गतीने कंपन पावत असतात. कंपन पावत असलेल्या या लहरींचा परिणाम आपल्या शरीरातील ग्रंथींवर होतो. आपण जाणतोच आपले शारीरिक व मानसिक आरोग्य या ग्रंथींवर अवलंबून असते. विशिष्ट कंपनांमुळे स्रवणारे ते विशिष्ट संप्रेरक आपला मूड बदलायला कारणीभूत ठरते. आपल्याला जेव्हा आनंद होतो तेव्हा ‘सिरोटोनीन’ नावाचे संप्रेरक शरीरात धावू लागते व जेव्हा भीती वाटते तेव्हा ‘अ‍ॅड्रेनालीन’ संपूर्ण शरीराचा ताबा घेते. या प्रसंगांमध्ये आपल्यात शारीरिक बदलाबरोबर मानसिक बदलसुद्धा होतात. त्यामुळे, जेव्हा माणसाला रंग व संप्रेरकांच्या संबंधांची जाणीव झाली तेव्हा ‘रंग’ ही फक्त डोळ्यांना सुंदर दिसणारी गोष्ट न राहता तो अभ्यासाचा विषय झाला. वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाश झोताच्या साहाय्याने माणसाची शारीरिक / मानसिक व्याधी दूर करणारी ‘रंग सिद्धांत’ किंवा कलर थेरेपी आज पुष्कळ लोकांना लाभदायक ठरली आहे.

रंगामुळे आपल्यात फरक पडतो याचा अनुभव तुम्ही नक्कीच घेतला असेल. एखादी उदास वाटणारी खोली रंग बदलल्याने एकदम प्रसन्न वाटते. एखादे चंचल मूल आजूबाजूच्या रंग बदलामुळे अभ्यासावर मन केंद्रित करू शकते. झोपायच्या खोलीला लाल रंगाच्या ऐवजी निळा रंग दिल्यास शांत झोप लागते, पण तेच जेवणाच्या खोलीला निळ्या ऐवजी लाल/ मरून रंग दिल्यास चार घास जरा जास्तच जातात हे तुमच्या लक्षातदेखील येणार नाही. खरे नाही वाटत? पुढच्या वेळी पडताळून पाहा.

रंगाचा प्रभाव तापमान कमी-जास्त करण्यातदेखील होतो. लहानपणी बहुतेकांनी आईकडून उन्हाळ्यात काळे किंवा गडद कपडे घालण्यावरून ओरडा खाल्ला असेल. गडद रंग जास्त उष्णता शोषून घेतो व साचवूनपण ठेवतो. त्यामुळे साहजिकच आधीच तापमानाची कमाल मर्यादा ओलांडली असताना गडद कपडे घालायचे टाळणेच श्रेयस्कर. पांढरे किंवा सौम्य रंगाचे कपडे वापरणे जास्त चांगले. जी गोष्ट कपडय़ांच्या रंगाबाबत तीच गोष्ट सजावटीत वापरणाऱ्या रंगाबद्दलपण सांगता येईल. जिथे भगभगीत, प्रखर ऊन येते त्या जागी सौम्य रंगाच्या भिंती जास्त बऱ्या, जेणेकरून त्या जागेचे तापमान आवाक्यात राहील.

रंगांना स्वत:ची अशी एक भाषापण असते. सिग्नलला पोलीस नियंत्रण नसतानादेखील हिरवा म्हणजे पुढे जा, पिवळा म्हणजे गती कमी करा आणि लाल म्हणजे थांबा, हे आपल्याला माहीत असते (पाळतो का नाही ही दुसरी बाब). दुरून वाचता येत नसले तरी पिवळी पाटी म्हणजे ‘धोका’ हे मनात फिट्ट बसले असते. वॉट्सअ‍ॅपवर लाल चेहरा पाहिला की गर्लफ्रेंड चिडली आहे म्हणून घाम फुटतो. आयुर्वेदिक गोष्टींसाठी 29-lp-colourकधी लाल-जांभळा रंग वापरलेला बघितला आहे? त्याला हिरवाच रंग लागणार. शांतता दर्शवण्यासाठी जसा पांढरा रंग पाहिजे तसेच अंगी स्फुरण चढले असताना भगव्या रंगाला पर्याय नाही.

शाळेत असताना प्रिझममधून प्रकाश सोडल्यावर दुसरीकडून सात रंग बाहेर येतात, हा प्रयोग सगळ्यांनीच केला असेल. या शोधाचा जनक न्यूटन, याने त्यातून प्रेरित होऊन ‘रंग चक्र’ किंवा कलर व्हील तयार केले. ज्याचा उपयोग आजही प्रत्येक वास्तुतज्ज्ञ, डेकोरेटर व रंग निर्मितीतील कंपन्या घरबांधणीमध्ये व सजावटीमध्ये करतात. एवढेच काय फॅशन डिझायनिंग, वस्त्रनिर्मितीतील लोकांचा रंग-चक्राशिवाय ‘धागा’पण हलत नाही. यामध्ये लाल, पिवळा व निळा हे मूळ/ प्राथमिक रंग मानले गेले आहेत. दोन प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने तयार होतात ते सेकंडरी किंवा दुय्यम रंग (निळा+पिवळा= हिरवा, पिवळा+लाल= केशरी व लाल+निळा= जांभळा). परत यांच्या आपापसातील मिश्रणाने बनलेले रंग आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.

सजावटीत हे प्राथमिक रंग कसे वापरता येतील ते आपण आधी बघू या. लाल, पिवळा, निळा हे रंग म्हणल्यावर आधी डोळ्यासमोर येतात ते रंगीत फुगे, गोळ्या आणि मुलांची खेळणी. लक्ष आकर्षून घेणारे हे रंग अर्थातच मुलांच्या खोलीत, शिशुविहारामध्ये नेहमी आढळतात. वातावरणात उत्साह व चैतन्य आणायला हे रंग आपल्या उपयोगी पडतात. असे असूनदेखील, प्राथमिक रंग हे त्यांच्या मूळ स्वरूपात खूप गडद असल्याने त्यांचा जशाचा तसा वापर सजावटीला मारक ठरतो. मुख्य करून तिन्हीही रंग एकत्र वापरणार असाल तर! अशा वेळी तीनपैकी दोन रंग त्यांच्या मूळ रूपात ठेवून तिसऱ्या रंगात पांढरा किंवा काळा रंग मिसळून त्यापासून होणारी छटा वापरावी किंवा एक मूळ रंग व दोघांच्या छटा, असेही करू शकतो. यामुळे सजावट बालिश न दिसता अभिरुचीसंपन्न दिसण्यास मदत होते.

वर सांगितल्याप्रमाणे दोन प्राथमिक रंग एकत्र करून होणारे रंग म्हणजे केशरी, हिरवा व जांभळा. मूळ रंगांप्रमाणे हे रंग भडक नसल्याने त्यांचे आजूबाजूला असलेले अस्तित्व डोळ्याला सुखावते. यामध्ये केशरी रंग सोडल्यास हिरवा व जांभळा रंग शीतल प्रकृतीचे आहेत. म्हणजे असे रंग, ज्यामुळे परिसर शांत वाटतो. बरेच आर्टिस्ट आपली कला प्राथमिक रंगांपेक्षा दुय्यम रंगांतून व्यक्त करणे जास्त पसंत करतात.

न्यूटनने बनवलेल्या रंग चक्रामुळे रंगांचा एकमेकांशी असलेला संबंध एका नजरेत आपल्या समोर उलगडला जातो. यातूनच रंगांच्या विविध प्रकाराच्या जोडय़ा बनवल्या गेल्या आहेत. त्या कशा वापरायच्या आणि ही रंगांची दुनिया अजून रंगीत कशी करायची हे पुढील लेखात!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:15 am

Web Title: colour scheme interior design
Next Stories
1 प्रमाणबद्धता
2 ताल आणि लय
3 डिझाइनचे तत्त्व- समतोल
Just Now!
X