19 February 2020

News Flash

ताल आणि लय

ताल आणि लय घराच्या सजावटीत खूप महत्त्वाच्या ठरतात.

64-lp-interiorताल आणि लय हे शब्द ऐकले की आपल्याला संगीत किंवा नृत्याबद्दल चर्चा सुरू आहे असं वाटतं. पण या दोन संकल्पना फक्त नृत्यातच नाही तर, घराच्या सजावटीतही खूप महत्त्वाच्या ठरतात.

मला वाटते लहानपणापासून तालाचे आणि आपले नकळत नाते जुळत असते. बाळाला झोपवताना एका विशिष्ट लयीत वर-खाली होणारी मांडी, अंगाई म्हणताना पाठीवर थोपटताना दिलेला ताल या सर्व गोष्टी बाळाला शांत करतात, त्या त्यातील स्पर्शामुळे व लयीमुळे. बरेचदा मी असे ऐकले आहे की बायकोची झोपमोड होते जर का नवऱ्याने घोरण्याची लय बदलली तर! काय असतो हा ताल किंवा लय? ज्याला इंग्रजीत आपण ऱ्हिदम म्हणतो. एका विशिष्ट वेळेने परत परत होणारी गोष्ट म्हणजे ताल. प्रामुख्याने याचा संबंध आपण फक्त संगीताशीच लावतो. पण असे नाहीये. आपल्या आजूबाजूला हा ताल सगळीकडेच सापडतो. आपल्या छातीत होणारी धडधड ही तालबद्ध असणेच हिताचे असते. कधी तिचा ठोका चुकला तर काय होते याची तुम्हाला माहिती आहेच. दिवस-रात्रीचा क्रम, विशिष्ट कालावधीने येणारे ऋतू हे सगळे तालचक्रातच फिरत असतात. असा हा ताल आपल्या घराला घरपण देण्यात हातभार लावतो. कसा ते आपण बघू.

डिझाइनचे ‘ताल / ऱ्हिदम’  हे तत्त्व सजावटीत वापरणे खूप सोपे आणि हमखास उठाव देणारे आहे. जसे गाण्यामध्ये प्रत्येक कडव्यानंतर आपण धृवपदावर येतो, तसेच खोलीमध्ये जेव्हा थोडय़ा थोडय़ा अंतराने आपल्याला एखादा रंग, टेक्श्चर, आकृती किंवा एखादी विशिष्ट प्रकारची रेघ भेटते तेव्हा सजावटीत ‘ताल’ तयार होतो. सजावटीत या गोष्टी धृवपदासारख्या काम करतात. यामुळे होते काय की सजावटीत व्हिज्युअल फ्लो तयार होतो. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे नजर विनासायास फिरते. वर्तुळ पूर्ण झाल्याने सजावटीत एक प्रकारची स्थिरता येते.

तालाचे हे तत्त्व समजण्यास अतिशय सोपे असल्याने बहुतांशी लोकांची याला पसंती असते. यामध्ये रचना व्यवस्थित दिसते. तुमच्या खोलीतील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला केंद्रभागी ठेवून त्याच्या आजूबाजूला बाकीची मांडणी करावी. समजा तुमच्याकडे सुंदर नक्षीकाम केलेला अँॅटिक पलंग आहे, त्यावरील ती नक्षी जर का तुम्ही कपाटाच्या हँडल्सवर, आरशाच्या एका कोपऱ्यात कोरून घेतली तर आपली नजर पलंग, हँडल्स, आरसा अशी फिरती राहील. त्याचप्रमाणे प्रसिद्ध चित्रकाराचे एखादे पेंटिंग संग्रही असणे म्हणजे केवढीतरी अभिमानाची गोष्ट. पण ते पेंटिंग तेव्हाच चांगले दिसेल जेव्हा आजूबाजूची सजावट त्याला उठाव देईल. अशा वेळी या पेंटिंगमधील एखादा रंग, चादर- पडदे किंवा फुलदाणीवर घेतला तर खोली लयबद्ध दिसेल. संगीत सोडून खोलीसाठी ‘लयबद्ध’ हा शब्दप्रयोग एखादे वेळेस खटकेल. पण लय ही फक्त ऐकण्याची नाही तर अनुभवायची, दिसण्याचीसुद्धा गोष्ट आहे हे तुम्हाला लवकरच जाणवेल.

तुम्ही संगीतकार रावेल यांचे ‘बोलेरो’ हे अफलातून संगीत ऐकले आहे? नसेल तर यूटय़ूबवर जरूर ऐका. सुरुवात होते ती अतिशय मंद सुरावटींनी. एवढी मंद, की आपण आवाज फुल्ल करतो. पण हळू हळू १७ मिनिटे वाजणारी ती एकच धून आपल्याला इतकी कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवते की, पुढची काही मिनिटे आपण त्या सुरावटीतून बाहेरच पडू शकत नाही. लोक म्हणतात ‘बोलेरो’ची न आवडणारी गोष्ट म्हणजे हे संगीत १७ मिनिटांनी संपते ही! इथे याचा उल्लेख करायचा उद्देश म्हणजे ज्याप्रमाणे या संगीतात चढत्या/ उतरत्या भाजणीचा (मंद सुरावटीपासून तारसप्तकापर्यंत) उपयोग केला आहे त्यामुळे सूर तेच राहून नावीन्य प्राप्त झाले आहे. असाच ताल किंवा ऱ्हिदम आपण सजावटीत वापरू शकतो. आपण पुनरावृत्ती म्हणतो तेव्हा एखादी गोष्ट जशीच्या तशी परत परत मांडत जाणे गृहीत धरतो. पण एखादी वस्तू छोटय़ापासून मोठय़ापर्यंत मांडल्यास सजावट जास्त आकर्षक दिसते. माझ्या एका बहिणीला घुबड म्हणजे जीव की प्राण. त्याचा आकार, त्याचे ते मोठाल्ले डोळे यांच्या आकंठ प्रेमात आहे ती.  तिच्या घरात प्रवेशद्वारापासून बाल्कनीपर्यंत लाकूड, दगड, कापडापासून बनवलेली छोटी -मोठी घुबडे शेल्फवर, टेबलाच्या खालती आधारासाठी, सोफ्याच्या बाजूला टीकोस्टरवर अतिशय कलात्मकतेने ठेवलेली आहेत. त्यामुळे तिच्या घरी गेल्यावर सर्व जगानी अशुभ ठरवलेल्या या पक्ष्याच्या गोल गोल डोळ्यांत आपणदेखील हरवून जातो. ही सजावट आपल्यालापण या पक्ष्याच्या प्रेमात पाडते. बऱ्याच लोकांना गणपती, टेराकोटाच्या मूर्ती, मेणबत्त्या, शंख िशपले जमा करायचा नाद असतो. हा तुमचा संग्रह छोटय़ापासून मोठय़ापर्यंत कौशल्याने मांडल्यास नक्कीच तुमचे घर बाकीच्या घरांपेक्षा हटके दिसेल.

तर हे झाले आपल्या सजावटीत ऱ्हिदम किंवा ताल कसा आणायचा या संदर्भात. जसे संगीतामध्ये व पोशाखात काळानुसार बदल होत गेले, तसेच बदल सजावटीतपण होत गेले. साधारण २०व्या शतकाच्या शेवटी शेवटी एक नवा डिझायनर लोकांचा कंपू तयार होऊ लागला. या लोकांनी वर्षांनुवष्रे चालत आलेल्या साचेबद्ध सजावटींना फाटा द्यायला सुरुवात केली. महागडय़ा सागवानी टेबलाला प्लॅस्टिकच्या खुच्र्या का नकोत, सोफे एकाच रंगाचे का पाहिजेत, व्हिक्टोरियन प्रकारच्या पलंगावर चित्त्याच्या कातडीचे िपट्र का नको असे प्रश्न त्यांना पडायला लागले. आणि याचे उत्तर शोधता शोधता त्यातून पुढे आलेली शैली म्हणजे ‘फ्यूजन’. या शैलीत सगळी बंधने गळून पडली. तुम्ही काहीही करू शकता, अट फक्त एकच होती ती म्हणजे ‘सुसंगती किंवा हार्मनी’ सांभाळणे. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी अशी जुडली गेली पाहिजे की जेणेकरून संपूर्ण रचना ‘एक’ वाटेल. यावरून तुम्हाला जिगसो पझलची आठवण आली असेल. प्रत्येक तुकडा वेगळा. पण चित्र तेव्हाच पूर्ण होते जेव्हा सगळे तुकडे अचूक जागच्या जागी बसतात. आधी लोक या प्रकाराला ‘कशावरही काहीही’ म्हणून हिणवायचे. पण वरकरणी सोप्पी वाटणारी ही शैली खरंतर खूप अवघड आहे.

सजावटीत अनेक मार्गानी आपण हार्मनी आणू शकतो. जसे आकार, रंग, टेक्श्चर व माल-ज्यापासून त्या वस्तू बनवल्या आहेत. पण या प्रकारात डिझायनरला सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती प्रपोर्शन किंवा एकदुसऱ्याशी असलेल्या प्रमाणबद्धतेची. या प्रकारात डिझायनरचे कसब सर्वात जास्त पणाला लागते. आधीच्या लेखामध्ये समतोल कसा साधायचा यावर लिहिले आहे. हा समतोल सजावटीत ‘सुसंगती’ आणायला सर्वात महत्त्वाचे कार्य करतो. एकाही गोष्टीची पुनरावृत्ती न करता वेगवेगळ्या आकारांची, रंगांची सांगड घालणे हे खायचे काम नाही. जसे आपटेंच्या घरात नेनेंच्या समान संस्कृतीमधून आलेल्या मुलीचे फारसे कौतुक होणार नाही. पण तेच पूर्ण वेगळ्या पाश्र्वभूमीतून आलेल्या, वेगळ्या संस्कारात वाढलेल्या, पण आपटेंच्या घरात पूर्ण एकरूप झालेल्या बॅनर्जीच्या मुलीचे जास्त कौतुक होईल. हे तसेच आहे. ज्याला आपण विविधतेत एकता (unity in variety) म्हणतो तसे.

तर अशी ही सजावटीची दोन तत्त्वे. एक ताल व दुसरे सुसंगती. कोणाची मदत न घेता तुमची तुम्हाला सजावट करायची झाल्यास ‘ताल’ तत्त्वानुसार करू शकता. पण तुम्हाला तुमची गृहसजावट संतुलन / हार्मनी या तत्त्वावर आधारित करायची झाल्यास कोणा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यास जास्त चांगले. नाहीतर सजावटीचे  ‘फ्यूजन’ होण्याऐवजी ‘कन्फ्युजन’ व्हायला वेळ लागणार नाही.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

First Published on April 15, 2016 1:09 am

Web Title: interior design ideas
Next Stories
1 डिझाइनचे तत्त्व- समतोल
2 डिझाइनचे तत्त्व- समतोल
3 इंटिरियर – रेघा : वळणदार आणि नागमोडी
Just Now!
X