रंगावरील हे लेख लिहिताना आता कोणीही भेटले की या माणसाचा आवडता रंग कुठला असावा याचे ठोकताळे मांडण्यात वेळ जातो. रंगांची एक गंमत आहे, ती म्हणजे माणसाच्या स्वभावाचा थोडाफार अंदाज त्याला आवडणाऱ्या रंगामुळे येऊ शकतो. रंगालाही व्यक्तिमत्त्व असते. जे प्रत्येक माणसाच्या कपडय़ांच्या आवडीतून, घराच्या सजावटीतून दिसून येते.

अध्यात्मिक जाणीव करून देणारा जांभळा, स्वत:ची ओळख व एकाग्रता वाढवणारा गर्द निळा, स्वत:बद्दल विश्वास निर्माण करणारा सौम्य निळा, प्रेमाचा वर्षांव करणारा हिरवा तर सर्जनशीलता वाढवणारा पिवळा. प्रत्येक रंगाच्या अंगभूत वैशिष्टय़ामुळे माणसाच्या शरीर मनावर होणारे परिणाम आपण मागच्या काही लेखात बघितले. आता अजून काही रंगांविषयी. काही काही नशीबवान मुले आई-बाबांचे फक्त चांगले गुण घेऊनच जन्माला येतात. त्यामुळे आधीच्या पिढीतले दोष जाऊन एक परिपूर्ण रसायन समोर येते. अशाच एका भाग्यशाली अपत्याचे नाव आहे भगवा किंवा केशरी. शारीरिक ऊर्जेने परिपूर्ण असा लाल व डोक्याला चालना देणारा पिवळा, अशा या दाम्पत्याच्या संयोगातून तयार झालेल्या या रंगामध्ये आपल्या पालक रंगांचे सर्व चांगले गुणच सामावलेले आहेत. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे लाल रंगाची आक्रमकता व पिवळ्याचा चंचलपणा हे दोष हा रंग मागे सोडून येतो व त्यामुळे  लोकांना जास्त सुसह्य़ वाटतो. पिवळ्याप्रमाणे हा पण एक उत्साहवर्धक रंग आहे. या रंगामुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते. खरं तर हा रंग इतका आशावादी आहे की आपल्या रोजच्या जीवनात थोडय़ा प्रमाणात का होईना याचा वापर करावा. मग भले ते आपले पेन असेल किंवा फाइल! आपल्या जवळच्या या रंगाच्या अल्पशा अस्तित्वानेच मनाला टवटवी येते.

Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

एखाद्या गोष्टीला आपण शारीरिक प्रतिसाद देतो, एखाद्या गोष्टीला बुद्धीच्या बळावर मात करतो. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण ‘गट फिलिंग’ने करतो. कधी कधी तिथे आपले तर्कशास्त्र, भावना बाजूला ठेवून काम करावे लागते. भगवा रंग या आपल्या ‘आतून’ येणाऱ्या आवाजाला खतपाणी घालतो.

भगवा रंग उत्साहदायी असल्याने आपल्याला दु:खातून बाहेर काढतो. काही कारणाने उदास व निराशेच्या गर्तेत अडकलेल्या माणसांच्या आजूबाजूला हा रंग वापरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो. बरेच वेळेला आपला आजार शारीरिक नसून मानसिक असतो. या आजारातून आपण नक्की बरे होऊ अशी उभारी हा रंग देतो. म्हणूनच हॉस्पिटल्समध्ये पेशंटला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून या रंगाच्या सौम्य छटांचा उपयोग करणे खूप आवश्यक आहे. बाकी कुठल्याही रंगापेक्षा आजारी माणसावर या रंगाचा फार चांगला परिणाम होतो. आपल्याकडे दुर्दैवाने हॉस्पिटल/नर्सिंग होममध्ये कशाला पाहिजेत रंग म्हणून फक्त पांढरा किंवा राखाडी रंगांसारखे रंग वापरले जातात. त्यामुळे धडधाकट माणसालासुद्धा आजारी वाटायला लागते.

लाल रंगाचा जो चांगला गुण भगव्यामध्ये उतरला आहे, तो म्हणजे भूक वाढवण्याचा. या रंगाच्या सान्निध्यात एकदा का टेबलाभोवती मंडळी जमली की खाणे फस्त झालेच म्हणून समजा.  हळूहळू करून पोटात किती कबाब जातील पत्ता लागणार नाही. लाल रंगाचा आक्रमकपणा भगव्या रंगात नसल्याने या रंगाच्या विविध छटा (सौम्यपासून टेराकोटापर्यंत) रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जातात. पण भगव्या रंगाच्या याच गुणामुळे डाएटवर असणाऱ्या लोकांनी या रंगापासून दूर राहिलेलेच बरे.

पिवळ्या रंगासारखाच आशावादी स्वत:वर विश्वास असलेला व सकारात्मक दृष्टिकोन असलेला भगवा रंग तरुणाईचा आवडता रंग आहे. हा रंग एकमेकांमधील संवाद वाढवतो, चर्चा घडवतो व नवनवीन कल्पनांची जोड देतो. हेच कारण आहे की बहुतेक करून सर्व फास्टफूड सेंटर्समध्ये जिथे तरुण लोकं जास्त येतात, भगव्या व पिवळ्या रंगाची सजावट केली जाते. या रंगावरून एका प्रसिद्ध जाहिरातीवर आधारित आपली जाहिरातही करता येईल, खूब जमेगी मैफिल जब मिल बैठेंगे तीन यार, तू-मैं और भगवा रंग!

आता राहिला रंगांचा राजा.. लाल रंग. सर्वात आक्रमक, अतिशय धडाडीचा, सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा व प्रचंड ताकदीचा. या रंगाचे वर्णन करायचे तर ‘मी, माझे’ या भोवतीच घुटमळणारा रंग असे करता येईल. या रंगाच्या प्रभावाखाली बाकीचे रंग एकदमच नगण्य होऊन जातात. कितीही गर्दी असू देत हा रंग प्रथम लक्ष वेधून घेतो. स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये या रंगाचा एकतरी कपडा असणे अत्यंत गरजेचे आहे. याचा उपयोग कोणावर प्रभाव पाडायला कामी येतो. खास करून एखाद्या मिटिंगमध्ये स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा कोणासमोर भाषण देताना. हा रंग सर्वाचे लक्ष तुमच्यावर केंद्रित करायला मदत करतो. अर्थात याचा संयमित व कल्पकतेने वापर करणे फार गरजेचे आहे. नाहीतर या रंगाच्या अती वापराने तुमची गर्विष्ठ, आत्मकेंद्री अशी प्रतिमा होऊ शकते.

जसा पिवळा रंग मेंदूशी जोडला गेला आहे तसा लाल रंग शारीरिक ऊर्जेशी जोडला गेला आहे. हा रंग भरपूर ताकद, मस्ती आणि स्फूर्ती घेऊन येतो. या रंगाच्या आक्रमक गुणधर्माचा प्रभाव खेळाडूंवरपण पडतो. असे म्हणतात की, ‘विनर्स वेअर रेड’ बॉक्सिंग, कुस्ती वगैरे खेळात लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्पर्धकाला मानसिक व शारीरिक फायदा होतो, तसेच प्रतिस्पर्धी थोडा दबला जातो हे सिद्ध झाले आहे. मैदानी खेळातसुद्धा लाल युनिफॉर्मच्या संघाचा चाहता वर्ग जास्त असतो. हे असे का होते तर, लाल रंगामुळे स्वत:ची शारीरिक ऊर्जा वाढते, पण तेच समोरच्याची कार्यक्षमता व विचार करण्याची कुवत मात्र घटते.

भारतात व बऱ्याचशा पूर्व आशियाई देशात लाल रंगाला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे हा एक शुभ रंग म्हणून ओळखला जातो. लग्नकार्यात वधूची साडी, कपाळावरचे कुंकू, शेला, तोरणे यात लाल रंग आवर्जून वापरतात. चीनमध्ये सुद्धा या रंगाला खूप महत्त्व आहे. त्यांच्या प्रत्येक सणात व लग्नात लाल रंगाचा पुरेपूर वापर केलेला आढळतो.

झणझणीत रस्सा, तंदुरी कबाब, मिसळ, बटर चिकन.. भुकेने पोटात खड्डा पडला ना? चवीबरोबर डोळ्यासमोर उभे राहतात वेगवेगळ्या डिशेसमध्ये सजवलेले हे लालीलाल पदार्थ. या पदार्थाच्या चवी व वासाबरोबरच आकृष्ट करतो तो त्याचा रंग! लाल रंग भूक वाढवतो. त्यामुळे कुठल्याही खाण्याच्या जागी लाल रंगाच्या विविध छटा वापरलेल्या आढळतात. जेणेकरून भरपेट खाऊन गिऱ्हाईक व भरपूर पैसा कमवून मालक दोघेही तृप्त होतात.

पण लाल रंगाचा जशाचा तसा वापर जरा धोकादायक ठरू शकतो. खासकरून जर या रंगाची माहिती नसेल तर. त्यापेक्षा लाल रंगाच्या छटा वापरणे जास्त सोप्पे आहे. या छटा पांढरा किंवा काळा रंग मिसळून गुलाबीपासून मरूनपर्यंत विविध रंगांच्या बनू शकतात. या छटा लाल रंगासारख्या आक्रमक नसल्याने लोकांना जास्त भावतात. भडक लाल रंगात थोडा थोडा पांढरा रंग मिसळून गुलाबी रंगाच्या कितीतरी आल्हाददायक छटा बनवता येतात. हा सौम्य-शांत रंग बाळांच्या कपडय़ांच्या दुकानांपासून बायकांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांपर्यंत कुठेही अतिशय सुंदर दिसतो. तसेच मरून रंग खानदानी, अभिरुचीसंपन्न दिसतो. ज्यांना लाल रंग त्याच्या मूळ स्वरूपात वापरायचे धाडस नसेल अशांसाठी मरून रंग हा एक चांगला पर्याय आहे. याचा वापर दिवाणखाना, जेवायची जागा, स्वयंपाकघरात अतिशय चांगला दिसतो.

लाल रंगाचे डोळ्याला भासणारे वजन खूप जास्त असते. त्यामुळे सजावटीत संतुलन साधण्यासाठी या रंगाचा संयत वापर करणे फार गरजेचे आहे.

असे हे रंग. यांचे महत्त्व २० व्या शतकाच्या सुरुवातीला चित्रकारांना जेव्हा कळले, तेव्हा रूढार्थाने काहीही आकृती-आशय नसलेले चित्र फक्त रेघा आणि रंगांच्या मार्फत व्यक्त करण्याची कला पुढे आली. चित्रकार रंगांमधून आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवू लागला. यालाच पुढे ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट’चा दर्जा मिळाला. रंगांचे काम फक्त डोळ्यांना सुखावण्याचे नसून सजावट व आजूबाजूचे वातावरण अर्थपूर्ण करणे हे पण आहे. कुठला रंग कुठे, कधी वापरावा याच्या थोडय़ाशा अभ्यासाने आपण आपल्या जीवनातपण रंग भरू शकू हे नक्की.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com