19 February 2020

News Flash

सोयीचे स्वयंपाकघर

कुठल्याही घराचा केंद्रबिंदू असते ते स्वयंपाकघर.

कुठल्याही घराचा केंद्रबिंदू असते ते स्वयंपाकघर. ते दिसायला किती छान आहे, किती अत्याधुनिक उपकरणांनी युक्त आहे, यापेक्षाही महत्त्वाचा असतो तो त्यात घरच्या गृहिणीच्या सोयीसुविधांचा किती विचार केला गेला आहे, हा मुद्दा. हा विचार नेमका कसा करायचा याचे विवेचन-

घर म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. ४०-४५ वर्षांपूर्वीच पुलंनी वर्णन केलेल्या लोकांच्या घर बांधणीच्या उत्साहामध्ये व सध्याच्या गृहसजावटीच्या उत्साहामध्ये काहीही फरक पडला नाहीये. सध्या बिल्डर जी घरे बांधून देतो त्यात आपल्याला सुख मानावे लागते. पण सजावट तर आपल्या हातात असते. त्यामुळे घरात पाय ठेवता क्षणी दारावरची पाटी कुठून कोरून घेतली, यापासून पडद्याच्या कापडासाठी दिल्लीतील कुठले मार्केट चांगले इथपर्यंत सविस्तर वर्णन ऐकण्याची तयारी ठेवावी लागते. यामध्ये सध्या, घराच्या बाकीच्या सजावटीबरोबर स्वयंपाकघराच्या टूरसाठी एक खास ‘स्लॉट’ ठेवलेला असतो. ओढायचे पण कष्ट न करता हलकेच दाबून उघडणारे ड्रॉवर्स, कळ दाबली की उघडणारी दारे, पूर्वापार चालत आलेल्या काळ्या गॅ्रनाईट ऐवजी हव्या त्या रंगातील चकचकीत ओटा, दिवसभर मागे रेंगाळत राहणाऱ्या अन्नपदार्थाचा वास घालवणारी आकर्षक चिमणी अशा काही गोष्टींनी भारतीय स्वयंपाकघराचा ताबा घेतला आहे.

आपला खिसा गरम असेल तर मार्केटमधील देशी विदेशी कंपन्यांकडून आपल्याला आपले स्वयंपाकघर आकर्षक करून घेता येईल. पण मोठ्ठे व आधुनिक स्वयंपाकघर म्हणजे चांगले स्वयंपाकघर असे नसते. तिथे कार्यक्षमता जास्त महत्त्वाची. या लेखाच्या निमित्ताने आपण कार्यक्षम स्वयंपाकघर कसे असावे हे बघणार आहोत.

सर्वप्रथम कुठल्याही स्वयंपाकघरात शेगडी, फ्रीज व सिंक यांना जोडणारा त्रिकोण सांभाळणे फार गरजेचे असते. सर्वात जास्त काम या तीन गोष्टींच्या अवती भवती होते. त्यामुळे यांना जोडणारी जागा ही विनाअडथळ्याची, वावरायला सुटसुटीत असणे फार महत्त्वाचे आहे. या तीन जागांना जोडणाऱ्या बाजूंची बेरीज ही २५ फुटापेक्षा जास्त नसावी. नाहीतर एका वेळच्याच जेवणासाठी लागणारे साहित्य दरवेळी फ्रीजमधून काढून, ते सिंकवर धुऊन, गॅसवर शिजवायला ठेवण्यातच पाय मोडतील. तुम्ही कितीही म्हणालात की, आम्ही बाबा सगळ्या गोष्टी विचार करून एकदाच फ्रीजमधून काढून घेतो. तरी मी खात्रीने सांगेन की जर आमचा १५ वेळेला फ्रीज उघडला जात  असेल तर तुमचा दहा वेळा तरी उघडला जातच असणार. सगळे सामान बाहेर काढून ठेवायला ओटय़ावर जागा तर पाहिजे! भले तुमचे स्वयंपाकघर कितीही मोठ्ठे असो, पण म्हणून या तीन महत्त्वाच्या जागा तीन दिशांना विखरून न ठेवता २५ फुटाच्या आत ठेवल्यास स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीची दमणूक कमी होईल व तिची तब्येत चांगली राहील.

त्याचप्रमाणे या बाजूंची बेरीज दहा फुटापेक्षा कमीही नको. आपल्या स्वयंपाकघरात एकावेळी कमीतकमी दोन व्यक्ती तरी काम करत असतात. कोणी भांडी घासतंय, कोणी स्वयंपाक करतंय, कोणी भाजी चिरतंय. अशा वेळी दहा फुटापेक्षा कमी जागा असेल तर लोकं एकमेकांवर आदळतात. वावरायला जागाच राहात नाही. अशावेळी बरेच लोक स्वयंपाकघरात छोटे सिंक ठेवून, भांडी घासायचे सिंक लगतच्या ड्राय बाल्कनीत ठेवतात, जेणेकरून काम करायला जरा जागा मिळते. पण कधी कधी काय होते की बिल्डिंग पूर्ण झाल्यावर बिल्डरने दिलेली स्वयंपाकघरातील प्लिम्बगची जागा आपण बदलू शकत नाही. अशा वेळी काम चालू असतानाच नीट विचार करून आपल्या सोयीनुसार प्लंिबगची लाईन आधीच बदलून घ्यावी व या तीन जागांमधील अंतर जरा वाढवावे.

स्वयंपाकघरातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टोरेज- सामानाची कपाटे. ही कपाटे जास्तीची करा हे सांगायची खरेतर आपल्याला गरजच नाहीये. मुंबईसारख्या शहरात दोन इंच जागा मोकळी सोडल्यास आपण गुन्हा केल्यासारखे लोक आपल्याकडे बघतात. पण बरेच वेळेला ढीगभर कपाटे असूनसुद्धा सामान बाहेरच असते. याचे मुख्य कारण म्हणजे कपाटाची कधी उंची कमी पडते तर कधी रुंदी. त्यासाठी ज्या गोष्टी कायम स्वरूपात आपल्याकडे राहणार आहेत त्यानुसार कपाटांची लांबी रुंदी ठरवावी. फक्त आकर्षक दिसतात म्हणून रेडीमेड कपाटे घेऊ नयेत. त्याचबरोबर सध्याच्या आधुनिक स्वयंपाकघरात रोज नवीन नवीन उपकरणे येत असतात. यासाठीसुद्धा थोडा पुढचा विचार करून ज्या गोष्टी घेण्याची शक्यता आहे अशांसाठी आधीच जागा तयार करून ठेवणे केव्हाही श्रेयस्कर. सध्या कपडय़ांचे मशीन असणे ही चन नाही, तर गरज झाली आहे. त्याचप्रमाणे घरकाम करणाऱ्या बायकांचा प्रश्न बघता येत्या काही वर्षांत भांडी धुण्याचे मशीनसुद्धा गरज होऊन बसणार आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात आधीच प्लिम्बगची सोय व ओटय़ाची उंची थोडी वाढवून घ्यावी. जेणेकरून भविष्यातील फोडाफोडी वाचेल. त्याचप्रमाणे सिंकला तेलकट भांडी धुण्यासाठी गरम पाण्याची व सिंकखाली ‘क्रशर’साठी (अन्नाचे कण, फळांच्या साली वगरे बारीक करणारे मशीन) विजेच्या प्लगची सोय करून ठेवणे केव्हाही चांगले. मग भले तुम्ही आत्ता त्याचा वापर केला नाही तरी चालेल,
पण भविष्यात ‘एवढय़ा साध्या गोष्टी आधीच करायला पाहिजे होत्या’ अशी पस्तवायची पाळी तरी येणार नाही. हे श्रीमंतांचे चोचले म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

25-interior-lp

आजकाल पाश्चात्त्य संस्कुतीनुसार रेडीमेड किचन्स व रेडीमेड ओटे बनवले जातात. या ओटय़ांची रुंदी आपल्या पूर्वीच्या ओटय़ांपेक्षा कमी असल्याने कधी कधी त्रासदायक होते. आपल्याकडील वाटणघाटण, पुऱ्या- पोळ्या लाटायचे सामान, तळणी या स्वयंपाकाच्या पद्धती लक्षात घेऊन त्यानुसार ओटय़ाची रुंदी बनवून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ओटय़ावर शेगडीच्या दोन्ही बाजूला गरम भांडी उतरवून ठेवायला पुरेशी मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे. शेगडीला खेटूनच मिक्सर, मायक्रोवेव्ह वगरे उपकरणे नसावीत.

स्वयंपाकघराचे प्लॅिनग करताना आमचा बराच वेळ त्या घराच्या पद्धती समजून घेण्यात जातो. काही घरात फक्त ओल्या फडक्याने ओटा साफ केला जातो, तिथे प्रॉब्लेम नसतो. पण बऱ्याच लोकांच्या घरी पाणी टाकून ओटा साफ करायची पद्धत असते. अशावेळी ज्या ओटय़ावर स्वयंपाक केला जातो, त्याच ओटय़ावर सिंक असणे जरूरीचे आहे. नाहीतर गॅसची पाइपलाइन एका ओटय़ावर व सिंक दुसऱ्या ओटय़ावर असल्यास वेळीच बदल करून घेणे आवश्यक आहे.

या व्यतिरिक्त घराच्या बाकीच्या खोल्यांप्रमाणेच स्वयंपाकघरात पुरेसा प्रकाश व वायुविजनाची सोय असणे गरजेचे आहे. अन्न व्यवस्थित शिजले आहे का नाही हे बघायला भरपूर नसíगक प्रकाश स्वयंपाकघरात आला पाहिजे. रात्रीच्या वेळी आपल्या पाठून प्रकाश आल्यास आपलीच सावली अन्नावर पडून, अन्न नीट शिजले आहे का नाही हे कळत नाही. त्यामुळे दिव्याची रचना अशी करावी जेणेकरून शेगडीवर नेहमी थेट प्रकाश येईल. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात हवा खेळती राहणे फार आवश्यक आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी आईने केलेल्या आमटीच्या वासाने पोटात भुकेने खड्डा पडतो. पण हाच वास संध्याकाळच्या चहाच्या वेळेपर्यंत हवेत रेंगाळत राहिला तर मळमळायला लागते. त्यासाठी म्हणून वायुविजनाची सोय असणे गरजेचे आहे. एकतर वास घालवण्यासाठी स्वयंपाकघराला मोठ्ठी खिडकी पाहिजे किंवा चांगल्या प्रतिची चिमणी, एक्झॉस्ट फॅन तरी पाहिजे. असे केल्यास घरभर वास पसरणार नाही व घरी आल्या-गेल्यांच्यावर आपले इंप्रेशनपण टिकून राहील.

तर असे हे स्वयंपाकघर. आपल्या घराचा केंद्रिबदू. त्याला कार्यक्षम बनवायला वरील गोष्टी पाळणे आवश्यक आहे. आजकाल बाजारात अत्याधुनिक ‘मॉडय़ुलर किचन्स’ जागोजागी दिसतात. त्याबद्दलची माहिती व स्वयंपाकघराचे विविध प्रकार पुढील लेखात.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 23, 2016 1:24 am

Web Title: kitchen interior
Next Stories
1 प्रकाशाशी नो तडजोड!
2 पोत ऊर्फ टेक्श्चर
3 ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट
Just Now!
X