फेसबुकवर सध्या ‘इंडिया का त्योहार’ म्हणजेच ‘इंडियन प्रिमियर लिग’चा (आयपीएल) बोलबाला असल्याचे दिसून आले आहे. फेसबुकने ‘आयपीएल’ स्पर्धेशी संबंधित नुकत्याच जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार फेसबुकपेजवर जगभरातून २.१ कोटी नेटकर फक्त आयपीएलसंबंधीत पोस्टवर व्यस्त असतात. तर, आयपीएल निगडीत फेसबुकवर केलेल्या संवादांची आकडेवारी तब्बल १६.३ कोटी इतकी आहे. आयपीएल संदर्भातील कोणत्याही पोस्टवर कमेंट किंवा शेअर करणे यांचा यामध्ये समावेश आहे. आयपीएलमधील सर्व संघांचे फेसबुकवर अधिकृत अकाऊंट आहे. देशातील आठ राज्यांच्या संघात रंगणाऱया या ट्वेन्टी-२० क्रिकेट युद्धाची सोशल मीडियावरील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
आयपीएलचे सोशल मीडियावरील रुप अधिक सोपे करण्यासाठी फेसबुकने देखील यावेळी खास प्रयत्न केले. यामध्ये आयपीएलच्या ताज्या अपडेट्ससाठी विशेष जागा, तुमच्या आवडत्या संघ आणि खेळाडूंबद्दलच्या खास गोष्टी, अपडेट्स. असे युजर्सला खिळवून ठेवण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न केल्यामुळेच फेसबुकवर आयपीएलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा फेसबुकने केला आहे. यात आयपीएलच्या संघांनी सुद्धा वैयक्तिक पातळीवर संघाची लोकप्रियता वाढविण्यासाठी फेसबुकवर विविध क्लृप्त्या राबवल्या आहेत. उदा. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने यंदा #AskADilliBoy या हॅशटॅगद्वारे दिल्लीच्या संघातील खेळाडूंना आपल्या मनातील प्रश्न विचारण्याची सुविधा फेसबुक अकाऊंट धारकांना उपलब्ध करून दिली.