इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक आठवडा शिल्लक असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नीने माघार घेतल्यामुळे अमेरिकेच्या अली खानचा कोलकाता नाइट रायडर्स संघात समावेश करण्यात आला आहे. अली हा ‘आयपीएल’मध्ये खेळणारा अमेरिकेचा पहिलाच खेळाडू ठरणार आहे.

खांद्याच्या दुखापतीमुळे गर्नीने ‘आयपीएल’मधून माघार घेतली असून लवकरच त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याऐवजी नुकत्याच झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये ट्रीनबॅगो नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान गोलंदाज अलीला संघात सहभागी करण्यात आले आहे, असे कोलकाताचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांनी सांगितले. २९ वर्षीय अलीने कॅरेबियन लीगमध्ये आठ सामन्यांत आठ बळी मिळवले होते.

‘आयपीएल’मुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वातावरणनिर्मिती -शमी

कोलकाता : अडीच महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) अनुभवामुळे वातावरणनिर्मिती होईल, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने व्यक्त केले आहे. दोन्ही संघांतील क्रिकेटपटू ‘आयपीएल’ची १० नोव्हेंबरला सांगता झाल्यानंतर थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होतील. २०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक यश संपादन केले होते. चेंडू फेरफार प्रकरणामुळे त्या संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचा समावेश नव्हता. येत्या मालिकेत दोघेही खेळणार असल्याने ती रंगतदार होईल, असे शमीने सांगितले.

विंडीजच्या खेळाडूंचे अमिरातीत आगमन

* कॅरेबियन प्रीमियर लीग संपल्यामुळे ‘आयपीएल’साठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे शनिवारी अमिरातीत आगमन झाले. किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, सुनील नरिन असे अनेक खेळाडू ‘आयपीएल’मध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व करतात.