क्रिकेट आणि त्यामध्ये ट्वेन्टी-२० हा फलंदाजांचा खेळ आहे, असे म्हटले जाते. पण चेन्नई सुपर किंग्जच्या आशिष नेहराने मात्र हे सारे साफ खोटे ठरवले. चार षटकांमध्ये फक्त १० धावांच्या मोबदल्यात त्याने चार फलंदाजांना बाद केले आणि संघाच्या विजयाचा तो यशस्वी मोहरा ठरला. सुरेश रैनाच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने १८१ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूला १५४ धावांवर समाधान मानावे लागले आणि चेन्नईने २७ धावांनी विजय मिळवला.
सामनावीर नेहराने बंगळुरुच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत संघाला दुहेरी यश मिळवून दिले. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारली आली नाही. कोहलीने ४२ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५१ धावा फटकावल्या. नेहरानेच कोहलीला बाद केले आणि त्यावेळीच बंगळुरूच्या संघाने पराभव स्वीकारला.
तत्पूर्वी, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर १८१ धावा फटकावल्या. एकाबाजूने ठराविक फरकाने फलंदाज बाद होत असताना रैनाने एक बाजू लावून धरत फक्त ३२ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ६२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. फॅफ डय़ू प्लेसिसने अखेरच्या षटकांमध्ये दमदार फलंदाजी करत १८ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३३ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ८ बाद १८१ (सुरेश रैना ६२, फॅफ डय़ू प्लेसिस नाबाद ३३; यजुवेंद्र चहल ३/४०) विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : २०  षटकांत ८ बाद १५४ (विराट कोहली ५१; आशिष नेहरा ४/१०)
सामनावीर : आशिष नेहरा.