इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) जैव-सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास क्रिकेटपटूला आणि त्याच्या संघाला मोठा फटका बसणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उल्लंघन करणाऱ्या खेळाडूची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात येईल, तसेच त्याच्या संघाला एक कोटी दंड आणि दोन गुण वजा असा भरुदडसुद्धा सहन करावा लागणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आठही संघांना पाठवलेल्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही खेळाडूने किंवा मार्गदर्शकाने पहिल्यांदा जैव-सुरक्षेच्या नियमाचा भंग केल्यास त्याला सहा दिवसांचे विलगीकरण बंधनकारक आहे. या नियमांचे दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास एक सामन्यासाठी निलंबित करण्यात येईल. मात्र त्यानंतरही तिसऱ्यांदा या खेळाडूकडून उल्लंघन झाल्यास त्याला स्पर्धेबाहेर करण्यात येईल आणि त्याच्या जागी नवा खेळाडू संघाला मिळणार नाही.

याचप्रमाणे खेळाडूने दैनंदिन आरोग्यविषयक पूर्तता, ‘जीपीएस’ यंत्रधारणा आणि कोविड-१९ चाचणी टाळल्यास ६० हजार रुपये दंड भरावा लागेल. हेच नियम खेळाडूंचे कुटुंबीय आणि संघ अधिकारी यांना लागू असतील. सर्व खेळाडू आणि साहाय्यक मार्गदर्शकांची प्रत्येक पाचव्या दिवशी करोना चाचणी होईल. जैव-सुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी संघाच्या अधिकाऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी.

जैव-सुरक्षित वातावरणातील कोणत्याही खेळाडू किंवा साहाय्यक मार्गदर्शकाने नियमांचे उल्लंघन करून संवाद साधल्यास संघाला पहिल्या चुकीप्रकरणी एक कोटी रुपये दंड सोसावा लागेल. याशिवाय दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास संघाच्या गुणांमधून एक गुण वजा होईल आणि तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दोन गुण वजा केले जातील. सुरक्षा आणि आरोग्यविषयक नियमांचे अनेकदा उल्लंघन झाल्यास ‘बीसीसीआय’कडून चौकशी करण्यात येईल.

चेन्नईच्या आसिफकडून नियमांचे उल्लंघन

‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारा चेन्नई सुपर किंग्जचा के. एम. आसिफ हा पहिला खेळाडू ठरला आहे. हे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला सहा दिवसांसाठी विलगीकरण करावे लागणार आहे. आसिफने हॉटेलमधील रूमची चावी हरवली. मग बदली चावी मिळवण्याच्या उद्देशाने त्याने हॉटेलचे स्वागत कक्ष गाठले. ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा नियमानुसार स्वागत कक्षात जाणे, हे  निषिद्ध होते. ‘‘खेळाडूकडून अनवधानाने चूक झाली. परंतु नियमांनुसार त्याला सहा दिवसांसाठी विलगीकरणाला सामोरे जावे लागेल. त्यानंतरच त्याला संघासह सराव करता येईल,’’ अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.