उत्सवप्रिय भारतीय क्रिकेटरसिकांना ४६ दिवसांची आयपीएल म्हणजे अनेक दिवाळीचे सण सलग आल्यासारखे.
आयपीएलबद्दल अनेक तक्रारी असतील, पण संयोजन गुणवत्ता काय असते ते आयपीएलने दाखवून दिले आहे. एक भव्यदिव्य, समृद्ध, श्रीमंत अनुभव घेण्याकरता आयपीएल प्रत्यक्ष जाऊन पाहायला हवी. एक उत्कृष्ट दर्जाचा इव्हेंट भारतात होऊ शकतो, हे पाहून छान वाटतं. सुंदर ग्राउंड्स, बसण्यासाठी चांगली व्यवस्था, सणाचे वातावरण, संगीत, भव्य स्क्रीन्स, सगळ्याची विपुलता यामुळे ही स्पर्धा लोकप्रिय झाली आहे.
पहिल्या सामन्यात मुंबईने पहिली फलंदाजी केली. कोलकात्याच्या खेळपट्टीने सुखद धक्का दिला. मोर्केल आणि रुस्सेलचे चेंडू असे निघत होते की क्षणभर वाटले मेलबॉर्नची वर्ल्डकप फायनल संपलेली नाही. कोलकात्याची विकेट संथ आणि चेंडू खाली राहणारी म्हणून प्रसिद्ध. कालचा विकेटवरचा वेग म्हणजे गोड गोड स्वयंपाक करणाऱ्या काकूंच्या घरातून झणझणीत ठेच्याचा वास येण्यासारखा अनपेक्षित होता.
मोर्केलने रायडूला टाकलेल्या चेंडूने तब्येत खूष झाली. बाऊंस मिळवून सीमवर पडून चेंडू बाहेर निघाला. रायडूला वर्ल्डकपमुळे बेंचची सवय झाली असणार. शून्यावर आऊट झाला आणि गेला आत. बिच्चारा रायडू.
रोहित आणि एंडरसनने मस्त फलंदाजी केली. रोहित विकसित होत चालला आहे. आयपीएलमधून भारतीय क्रिकेटला काय फायदा होतो, हे सर्वात महत्वाचे. कोण सुधारतो, कोण नवीन खेळाडू मिळतो यावर क्रिकेट फॅन्सनी लक्ष ठेवायला हवे.
सुनील नरेन अजून फेकतोच आहे आणि बीसीसीआय त्याला घेतेच आहे. खोट्या गोलंदाजांवर कारवाई न करणारे मॅच फिक्सिंगवर काय कारवाई करणार?
१६८ धावांचे लक्ष्य कोलकात्याने आरामात पार केले. मुंबईचा पेस अॅटक बघून त्यांना ही आयपीएल सोपी नाही हे लक्षात येतंय.
इतके फुल टॉस एका सामन्यात क्वचितच पाहायला मिळतात.
सचिन ,पॉन्टिंग, कॅलिस हे फलंदाजीचे ब्रह्मा, विष्णु, महेश शेजारी शेजारी पाहून फॅन्स खूष झाले.
सिद्धूला सेटमॅक्सवर कॉमेंट्री आहे याची आठवण करून द्यायला हवी. कारण तो आस्था चॅनलच्या मूडमध्ये असतो.
जय राम जी की।
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)