बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मंगळवारी ख्रिस गेलचा वामनावतार क्रिकेटविश्वाने अनुभवला. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या वेगवान प्रकारालाही हेवा वाटावा अशा चौफेर आतषबाजीने सारेच थक्क झाले. एकेक विक्रमांचे इमले त्या अजब आविष्कारापुढे नतमस्तक होत होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक १७ षटकारांची आणि १३ चौकारांची बरसात झाली आणि गेलचा ६६ चेंडूंत नाबाद १७५ धावांचा एक अविस्मरणीय नजराणा पेश झाला. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर शनिवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील लढतीची क्रिकेटरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
आयपीएलच्या सहाव्या पर्वाच्या गुणतालिकेमध्ये सध्या बंगळुरूचा संघ ८ सामन्यांत ६ विजयांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर बुधवारी गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला धूळ चारणारा मुंबई इंडियन्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईला बंगळुरूविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी गेलकरिता सापळा रचावा लागणार आहे.
पुणे वॉरियर्सविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात गेलने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावा आणि सर्वात वेगवान शतक नोंदवले. गेलच्या आक्रमणापुढे प्रतिस्पध्र्याची कितीही मोठी धावसंख्या खुजी ठरू शकते, असे म्हटले जाते. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांना पूर्ण ताकदीनिशी ही लढाई लढावी लागणार आहे.
मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सकडून ८७ धावांनी पराभव पत्करल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ९ विकेट राखून विजय मिळवत बदला घेतला. पण बुधवारी ड्वेन स्मिथ आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला एक आत्मविश्वास वाढविणारा विजय मिळवून दिला. परंतु सचिन तेंडुलकर आपल्या ४०व्या वाढदिवसादिवशी अपयशी ठरला. वानखेडेच्या खचाखच गर्दीसमोर या अनुभवी फलंदाजाकडूनही फटकेबाजीची अपेक्षा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महाशक्तीचा सामना करणे, हे कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक असते. मुंबई इंडियन्सच्या संघातही दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. पण कागदावरची ही ताकद मैदानावर दिसत नाही. ७ सान्यांत ४ विजय मिळविणारा मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत तळाच्या चार स्थानांवरील संघांमध्ये आहे.
मुंबईला अद्याप चांगली सलामी मिळू शकलेली नाही. सचिनसोबत कधी रिकी पाँटिंग तर कधी ड्वेन स्मिथ अशा जोडय़ा लावण्यात आल्या. पण त्याने चांगला निकाल मात्र मिळाला नाही. स्मिथने ४५ चेंडूंत ६२ धावांची खेळी साकारली. परंतु सचिनच्या खात्यावर ७ सामन्यांत फक्त १२५ धावाच जमा आहेत. शनिवारी घरच्या मैदानावर सचिन क्रिकेटरसिकांना निराश करणार नाही. मागील सामन्यात पाँटिंगने स्वत:हून माघार घेतल्यामुळे नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपविण्यात आली होती. पाँटिंगलाही ६ सामन्यांत फक्त ५२ धावा करता आल्या आहेत. परंतु यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक, रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड ही मुंबईची मधली फळी मात्र जबाबदारीने खेळून संघाच्या गरजा भागवत आहे.
मुंबईने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर लिलावात दहा लाख डॉलर्सचा भाव मोजला. परंतु तो अजूनही मुंबईच्या संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र ऑसी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन मुंबईसाठी यशदायी ठरला. त्याने ६ सामन्यांत ९ बळी घेतले आहेत, लसिथ मलिंगाने तितक्याच सामन्यांत ५ बळी घेतले आहेत.
फिरकीच्या विभागात हरभजन सिंग बळी मिळविण्यासाठी झगडतो आहे. त्याने ७ सामन्यांत ३१.३३च्या सरासरीने ६ बळी घेतले आहेत. त्या तुलनेत प्रग्यान ओझा अधिक किफायतशीर ठरला आहे. त्याने १७.४२च्या सरासरीने ७ बळी घेतले आहेत.
 दुसरीकडे बंगळुरूची ताकद म्हणजे ख्रिस गेल. जो सर्वाधिक ४३२ धावांसह ‘ऑरेंज कॅप’ रुबाबात मिरवतो आहे. विराट कोहलीसुद्धा बेफाम फॉर्मात आहे. त्याच्या खात्यावर ३३३ धावा जमा आहेत. ए बी डी’व्हिलियर्ससुद्धा आपल्या दिमाखदार फलंदाजीनिशी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
झहीर खानच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज आर. विनय कुमार आणि रवी रामपॉल प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवत आहेत. विनय कुमारच्या खात्यावर ८ सामन्यांत १३ बळी जमा ओहत. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने आतापर्यंत ७ सामन्यात ७ बळी घेतले आहेत. २१ वर्षीय उनाडकटकडून प्रशिक्षक रे जीनिंग्स यांना मोठय़ा अपेक्षा आहेत.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून
महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार
विजयामुळे मी आनंदीत झालो आहे. चेन्नईतील प्रेक्षक मला ‘थाला’ या नावाने संबोधत होते, ते मला फार आवडले. तब्बल दहा तास झोप घेतल्यावर मी आता ताजातावाना झालो आहे!