कर्णधार चतुर असला तर संघ प्रतिस्पर्धी संघावर कसाही विजय मिळवू शकतो, मग आव्हान कितीही मोठे असो किंवा संघाकडून कमी धावसंख्या झालेली असो. योग्य व्यूहरचना आखून प्रतिस्पर्धी संघाला जखडून टाकण्यात तरबेज असलेल्या महेंद्रसिंग धोनीने माफक लक्ष्य असतानाही कोलकाता नाईट रायडर्सला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. १३४ धावांचा पाठलाग करताना कोलकाताची भंबेरी उडवणारी गोलंदाजी धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांकडून करून घेतली. अभेद्य क्षेत्ररक्षण उभे करून धोनीने कोलकातावर दडपण निर्माण केले आणि अवघ्या दोन धावांनी सामना खिशात घातला.
प्रथम फलंदाजी करताना ड्वेन स्मिथ आणि ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी चेन्नईला अपेक्षित सुरुवात करून देत ४२ धावांची सलामी दिली, परंतु त्यानंतर आलेल्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.   पियूष चावलाने मॅक्क्युलमला (१९) पायचीत केले. त्यानंतर स्मिथने (२५) जबाबदारी स्वीकारून मोठे फटके मारले. मात्र, अतिरिक्त धाव घेण्याच्या नादात तो धावबाद झाला. त्यानंतर ठराविक अंतराने चेन्नईचे फलंदात तंबूत पाठविण्याची जबाबदारी कोलकाताच्या गोलंदाजांची चोख बजावली. फॅप डय़ु प्लेसिसने नाबाद २९ धावा करून संघाला १३४ धावांचा पल्ला गाठून दिला.
चेन्नच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताला पहिल्याच षटकात गौतम गंभीरच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर आलेल्या मनीष पांडेसह रॉबिन उथप्पाने अर्धशतकी भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. या जोडीला वेसण घालण्यासाठी  धोनीने आर अश्विनच्या हातात चेंडू दिला आणि अश्विनने एका मागोमाग या दोघांनाही बाद केले. हे दोघेही बाद होताच धोनीने कोलकातावर दडपण निर्माण केले आणि कोलकाताला विजयापासून वंचित रहावे लागले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज :  २० षटकांत ६ बाद १३४ (फॅप डय़ु प्लेसिस नाबाद २९, ड्वेन स्मिथ २५ ; पियूष चावला २/२६, आंद्रे रसेल २/२६) विजयी वि. कोलकाता नाईट रायडर्स ९ बाद १३२ (रॉबिन उथप्पा ३९; आर. अश्विन २/५, ड्वेन ब्राव्हो ३/२२).
सामनावीर : ड्वेन ब्राव्हो