मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याचे कसब पुन्हा एकदा दाखवून देत चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर विजय मिळवला. पराभवाची हॅट्ट्रिक टाळत चेन्नईचा संघ विजयपथावर परतला आहे. घरच्या मैदानावर खेळतानाही चेन्नई सुपर किंग्सने १४८ धावाच केल्या. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ सुस्थितीत होता. मात्र विराट कोहली धावचीत झाला आणि बंगळुरूची लय बिघडली. विराट बाद झाल्यानंतर अवघ्या २७ धावांत बंगळुरूने ६ विकेट्स गमावल्या आणि चेन्नईने शानदार विजय साकारला.
ख्रिस गेलच्या जागी संधी मिळालेला निक मॅडिन्सन ४ धावा करुन तंबूत परतला. यानंतर विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्सने २४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. इश्वर पांडेने एबीला डू प्लेसिसकडे झेल द्यायला भाग पाडले. त्याने २१ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी आणि पवन नेगी यांच्या चतुराईमुळे मनदीप सिंग शून्यावरच तंबूत परतला. विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत विजय आवाक्यात आणला. ड्वेन ब्राव्होच्या अफलातून प्रसंगावधानामुळे विराट धावचीत झाला. त्याने ४८ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात नेहराने दिनेश कार्तिकला बाद केले. त्याने २३ धावा केल्या. स्थिरावलेले दोन्ही फलंदाज झटपट बाद झाल्याने बंगळुरूसाठी समीकरण कठीण झाले. धावगतीच्या दडपणासमोर आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात बंगळुरूचा उर्वरित डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बंगळुरूचा डाव १२४ धावांतच आटोपला. आशिष नेहराने १९ धावांत ३ बळी घेतले. अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या सुरेश रैनाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी घरच्या मैदानावरही अडखळत खेळताना चेन्नईने १४८ धावांची मजल मारली. मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात ड्वेन स्मिथला त्रिफळाचीत केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. ब्रेंडन मॅक्क्युलम आणि सुरेश रैना यांनी ३३ धावांची भागीदारी करत डाव सावरला. डेव्हिड वाइसने मॅक्क्युलमला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर रैनाला फॅफ डू प्लेसिसची साथ मिळाली. मात्र हर्षल पटेलने एकाच षटकात रैना आणि डू प्लेसिसला बाद करत चेन्नईच्या धावगतीला वेसण घातली. रैनाने ५ चौकार आणि एका षटकाराच्या साह्य़ाने ५२ धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा ३ धावा करून तंबूत परतला. पवन नेगीला मिचेल स्टार्कने माघारी धाडले. त्याने १३ धावा केल्या. आठव्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेला ड्वेन ब्राव्हो २ धावांवर तंबूत परतला. बंगळुरूच्या गोलंदाजांच्या एकत्रित सांघिक कामगिरीमुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बंगळुरूतर्फे मिचेल स्टार्कने २४ धावांत ३ बळी घेतले. डेव्हिड वाइस आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेत स्टार्कला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ९ बाद १४८ (सुरेश रैना ५२, महेंद्रसिंग धोनी २९, मिचेल स्टार्क ३/२४, हर्षल पटेल २/१९) विजयी विरुद्ध विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १९.४ षटकांत सर्वबाद १२४ (विराट कोहली ४८, दिनेश कार्तिक २३, आशिष नेहरा ३/१९, ड्वेन ब्राव्हो २/१७)
सामनावीर : सुरेश रैना