प्लेऑफमध्ये जवळजवळ आपले स्थान निश्चित करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघास कमकुवत दिल्ली डेअरडेव्हिल्सवर येथे मंगळवारी मात करण्यास अडचण येणार नाही अशी आशा आहे. या दोन संघांमधील आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा सामना येथे होत आहे.
 चेन्नई संघाने साखळी गटातील अव्वल स्थानावर आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यांनी आतापर्यंत १२ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले आहेत तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या आघाडय़ांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या दिल्ली संघाच्या आशा मावळल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत बारा सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. त्यांनी एक मे रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी लागोपाठ चार सामने गमावले आहेत. त्यांच्याकडे अनेक नामवंत खेळाडू असले तरीही त्यांच्याकडून अपेक्षेइतकी चमकदार कामगिरी पाहावयास मिळालेली नाही.
दिल्ली संघास उद्याच्या सामन्यात हार पत्करावी लागली तरी फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंवर प्लेऑफच्या प्रवेशाचे कोणतेही दडपण असणार नाही. निश्चिंत मनाने ते खेळू शकणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जीन पॉल डय़ुमिनी याच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या दिल्ली संघास चेन्नईविरुद्ध विजय मिळविण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
भरघोस मानधन मिळालेल्या युवराजसिंग या त्यांच्या भरवशाच्या खेळाडूला यंदा अपेक्षेइतके यश मिळालेले नाही. डय़ुमिनीबरोबरच क्विन्टॉन डीकॉक यानेही फलंदाजीत निराशा केली आहे. दुखापतीमधून तंदुरुस्त झालेल्या झहीरखान याला गोलंदाजीत फारसा प्रभाव दाखविता आलेला नाही.
चेन्नई संघापुढेही काही समस्या असल्या तरी त्यांनी आठ सामने जिंकताना या समस्या त्यांच्या विजयाच्या मार्गात आलेल्या नाहीत. रविवारी त्यांनी राजस्थान रॉयल्स या तुल्यबळ संघावर विजय मिळविला असून त्याचा फायदा त्यांना येथील लढतीत मिळण्याची शक्यता आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम याच्यावर त्यांची पहिल्या फळीतील फलंदाजी अवलंबून आहे. तो अपयशी ठरला तर संघाची कामगिरी खराब होते हे पाहावयास मिळाले आहे. द्वायने स्मिथ यानेही अपेक्षेइतकी चांगली कामगिरी केलेली नाही. येथील लढतीत त्यांच्यावर चेन्नईची मोठी भिस्त आहे.
चेन्नईचा आशिष नेहरा याने यंदा गोलंदाजीत प्रभावी यश मिळविले आहे. त्याला रवींद्र जडेजा व रवीचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजांची चांगली साथ मिळेल अशी अपेक्षा आहे.