* मुंबई इंडियन्सवर ४८ धावांनी विजय
* हसी, रैनाची धावांची बरसात
* जडेजा, ब्राव्होची प्रभावी गोलंदाजी
आयपीएल क्रिकेट स्पध्रेला हादरविणाऱ्या ‘स्पॉट-फिक्सिंग’च्या हालचालींनी एकीकडे देशाच्या राजधानीतील वातावरण तणावग्रस्त असताना फिरोझशाह कोटला स्टेडियमवरील पहिल्या पात्रता सामन्यातील फलंदाजांच्या आतषबाजीने क्रिकेटरसिकांना थोडासा दिलासा दिला. चेन्नई सुपर किंग्जने ‘आयपीएलमधील महाशक्ती’ या आपल्या बिरूदाला साजेशा खेळाचे प्रदर्शन करीत पाचव्यांदा अंतिम फेरीत झेप घेतली आहे. मंगळवारी चेन्नईने मुंबई इंडियन्सचा ४८ धावांनी पराभव केला.
मायकेल हसी आणि सुरेश रैना यांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले. त्यामुळेच आयपीएल क्रिकेट स्पध्रेतील पहिल्या पात्रता सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने १ बाद १९२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
‘मिस्टर क्रिकेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसीने क्रिकेटरसिकांचे मनोरंजन करीत १० चौकार व दोन षटकारांनिशी ५८ चेंडूंत ८६ धावांची नाबाद खेळी साकारली. सुरेश रैनाने हसीहून अधिक आक्रमकतेने फलंदाजीचे प्रात्यक्षिक सादर करीत पाच चौकार आणि पाच षटकारांसह ४२ चेंडूंत ८२ धावा काढल्या. हसी आणि रैना जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२.४ षटकांत १४० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मंगळवारी सर्वाधिक चोप मिळाला तो लसिथ मलिंगा (०/४५) आणि मिचेल जॉन्सन (०/८५) जोडीला. या दोघांच्या आठ षटकांमध्ये चेन्नईच्या फलंदाजांनी ८५ धावा काढल्या.
त्यानंतर, ड्वेन स्मिथने ६ चौकार आणि ५ षटकारांसह २८ चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारून मुंबई इंडियन्सला आशादायी चित्र दाखवले. परंतु समोरून त्याला योग्य साथ मिळाली नाही. जडेजाने ३१ धावांत ३ बळी तर ड्वेन ब्राव्होने ९ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत १ बाद १९२ (मायकेल हसी नाबाद ८६, मुरली विजय २३, सुरेश रैना नाबाद ८२; किरॉन पोलार्ड १/२८) विजयी वि. मुंबई इंडियन्स : १८.४ षटकांत सर्व बाद १४४ (ड्वेन स्मिथ ६८, किरॉन पोलार्ड २४; रवींद्र जडेजा ३/३१, ड्वेन ब्राव्हो ३/९, मोहित शर्मा २/३२).

ऑरेंज कॅप
१. माइक हसी (चेन्नई सुपर किंग्स)    ७३२
२. ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    ७०८
३. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    ६३४
पर्पल कॅप
१. ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्ज)    २८
२. जेम्स फॉल्कनर (राजस्थान रॉयल्स)    २६
३. विनय कुमार (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    २३
सर्वाधिक षटकार
१. ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    ५१
२. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)    २८
३. किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स)    २५