05 March 2021

News Flash

हसी छा गये !

*चेन्नई सुपर किंग्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर १४ धावांनी विजय *माइक हसीची ९५ धावांची खेळी माइक हसीच्या ९५ धावांच्या सुरेख खेळीच्या जोरावर चेन्नईने २०० धावांचा डोंगर उभारला. त्यावेळी

| April 29, 2013 02:03 am

*चेन्नई सुपर किंग्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर १४ धावांनी विजय
*माइक हसीची ९५ धावांची खेळी
माइक हसीच्या ९५ धावांच्या सुरेख खेळीच्या जोरावर चेन्नईने २०० धावांचा डोंगर उभारला. त्यावेळी सुपर किंग्स हा सामना सहज जिंकतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. मात्र नाइट रायडर्सच्या मनविंदर बिस्लाने शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर नाइट रायडर्सच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. बिस्ला-मॉरगन जोडीने ६ षटकांत ७९ धावा वसूल करत कोलकात्याला विजयाच्या समीप नेले. डर्क नॅन्सने टाकलेल्या १८व्या षटकांत तब्बल २१ धावा फटकावत या जोडीने चेन्नईला अडचणीत टाकले. मात्र ब्राव्होच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याचा बिस्लाचा प्रयत्न माइक हसीच्या थेट धावफेकीमुळे फसला आणि सामन्याचे पारडे चेन्नईच्या बाजूने फिरले. बिस्ला बाद झाल्यानंतरही शेवटच्या षटकांत शेवटच्या षटकांत १९ धावांची गरज होती आणि धोकादायक मॉरगन खेळपट्टीवर होता. मात्र ख्रिस मॉरिसने टिच्चून गोलंदाजी करत कोलकात्याला केवळ चार धावा करू दिल्या आणि चेन्नईने पुन्हा एकदा घरच्या मैदानावरचे आपले वर्चस्व अबाधित राखले.
या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना गौतम गंभीर आणि मनविंदर बिस्ला यांनी वेगवान सुरुवात केली. १६ चेंडूत ३२ धावा फटकावत या जोडीने सकारात्मक सुरुवात केली. मात्र मॉरिसने गंभीरला त्रिफळाचीत करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. फिरकीपटू सचित्र सेनानायकेच्या जागी संघात स्थान मिळालेल्या ब्रेंडान मॅक्युल्लमला संधीचे सोने करता आले नाही. मोहित शर्माने त्याला झटपट बाद करत नाइट रायडर्सना अडचणीत टाकले.
अनुभवी जॅक कॅलिसही १९ धावा करुन ब्राव्होच्या गोलंदाजीवर बाद झाला. ३ बाद ९९ अशा स्थितीत असलेल्या नाइट रायडर्सपुढचे धावगतीचे आव्हान वाढते होते मात्र मनविंदर बिस्ला आणि इऑन मॉरगन जोडीने चौथ्या विकेटसाठी अवघ्या ३७ चेंडूत ७९ धावांची वेगवान भागीदारी करत खळबळजनक विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र एकोणिसाव्या षटकांत चोरटी धाव घेण्याचा बिस्लाचा प्रयत्न हसीच्या धावफेकीमुळे फसला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. बिस्लाने १४ चौकार आणि २ षटकारासंह ९२ धावांची खेळी केली. बिस्ला बाद झाल्यानंतर स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध युसुफ पठाण खेळपट्टीवर आला. मात्र मॉरगन-पठाण जोडीला शेवटच्या षटकांत १९ धावा करण्याचे आव्हान पेलवले नाही आणि चेन्नईने १४ धावांनी विजय मिळवला. चेन्नईतर्फे मोहित शर्मा, ख्रिस मॉरिस आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी एक बळी टिपला.
तत्पूर्वी चेन्नईने २०० धावांचा डोंगर उभारला. मुरली विजयच्या ऐवजी संघात स्थान मिळालेल्या वृद्धिमान साहाने माइक हसीच्या साथीने सलामीला आला. या जोडीने आक्रमण आणि बचाव यांचा सुरेख मिलाफ साधत शंभर धावांची सलामी दिली. या भक्कम सलामीनेच चेन्नईच्या मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. साहा-हसी जोडीने दहाच्या सरासरीने दहा षटकांमध्येच शंभरी गाठली. रजत भाटियाने साहाला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांसह २३ चेंडूत ३९ धावा केल्या. साहानंतर हसीने रैनाला साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावा केल्या. सुनील नरिनचा चेंडू सीमारेषेपलीकडे भिरकावून देण्याचा हसीचा प्रयत्न फसला आणि देबब्रत दासने त्याचा झेल टिपला. हसीने कलात्मक मात्र तरीही आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना ५९ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ९४ धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले.

यानंतर सुरेश रैना आणि महेंद्र सिंग धोनीने ३ षटकांतच ३२ धावा वसूल केल्या. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नांत रैना धावचीत झाला. त्याने २५ चेंडूत ४४ धावा फटकावल्या. धोनीने १२ चेंडूत १८ धावा केल्याने चेन्नईला दोनशेचा टप्पा गाठता आला. नाइट रायडर्सतर्फे नरिन आणि भाटिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ३ बाद २०० (माइक हसी ९५, सुरेश रैना ४४, वृद्धिमान साहा ३९, रजत भाटिया १/३५) विजयी विरुद्ध विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ४ बाद १८६ (मनविंदर बिस्ला ९२, इऑन मॉरगन ३२, मोहित शर्मा १/२३)
सामनावीर : माइक हसी
आदित्य तरे, मुंबई इंडियन्सचा खेळाडू
मुंबई इंडियन्सचा शानदार विजय..धवल कुलकर्णीचा भन्नाट स्पेल.. मित्रा तुझ्या कामगिरीने प्रचंड आनंदी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 2:03 am

Web Title: chennai super kings won by 14 runs against kolkata knight riders
टॅग : Ipl,Sports
Next Stories
1 दे धक्का!
2 ‘रॉयल्स’ मुकाबला
3 मी भारताचे प्रतिनिधित्व करतो हे मुंबईकर प्रेक्षक विसरतात
Just Now!
X