*  गेलच्या झंझावातापुढे कोलकाताचे लोटांगण
* बंगळुरुचा ८ विकेट्स राखून दणदणीत विजय
काही खेळाडू असे असतात की ते एकदा खेळायला लागले तर त्यांच्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही, तसाच एक तडाखेबंद सलामीवीर म्हणजे ख्रिस गेल. गेलचे वादळ पुन्हा एकदा आपल्या घरच्या घरात घोंघावले. त्याचा हा झंझावात एवढा जबरदस्त होता की कोलकाता नाइट रायडर्सला त्याच्यापुढे सपशेल लोटांगणच घालावे लागले. आपल्या घणाघाती फलंदाजीने गेलने तब्बल ९ षटकार ठोकत नाबाद ८५ धावांची खेळी साकारली आणि कोलकात्याला फक्त त्याची फलंदाजी पाहण्यावाचून पर्याय राहिला नाही. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने बंगळुरूपुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. गेलच्या या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूने ८ विकेट्स आणि १५ चेंडू राखत हा सामना जिंकला. सामनावीराचा पुरस्कारही गेलनेच पटकावला.
कोलकाताच्या १५५ या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूला पहिला धक्का १२ धावांवर बसला, पण त्याची तमा गेलला नव्हतीच. कारण आपल्या मनगटात हा सामना फिरवण्याची ताकद आहे, हे तो जाणून होता आणि तसे करूनही दाखवले. कोलकात्या गोलंदाजीवर चाल करून जात त्याने प्रेक्षकांना हवाई फटक्यांचा उत्तम वस्तुपाठ दाखवून दिला. गेलने ५० चेंडूंत तब्बल ९ षटकारांसह चार चौकारांची बरसात करत नाबाद ८५ धावा फटकावत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. गेलला या वेळी कर्णधार विराट कोहली (३५) आणि एबी डि‘व्हिलियर्स (नाबाद २२) यांची चांगली साथ लाभली. डि‘व्हिलियर्सबरोबर गेलने ८३ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, बंगळुरूने नाणेफेक जिंकत कोलकात्याला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवून दाखवला. बंगळुरूच्या गोलंदाजीपुढे कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. गौतमने मात्र गंभीरपणे फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
गंभीरने या वेळी ७ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीसह ५९ धावांची खेळी साकारली. गंभीरला या वेळी युसूफ पठाण (२७) आणि मनोज तिवारी (२३) यांनी चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बंगळुरूच्या माऱ्यापुढे नमते घ्यावे लागले. बंगळुरूच्या आर. पी. सिंगने या वेळी भेदक मारा करत २७ धावांत तीन फलंदाजांना तंबूत धाडले.

संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ८ बाद १५४ (गौतम गंभीर ५९, युसूफ पठाण २७, आर. पी. सिंग ३/२७) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : १७.३ षटकांत २ बाद १५८ (ख्रिस गेल नाबाद ८५, विराट कोहली ३५; लक्ष्मीपती बालाजी १/३३)
सामनावीर : ख्रिस गेल.