*   ख्रिस गेलची नव्या विक्रमांसह नाबाद १७५ धावांची झंझावाती खेळी
* बंगळुरूचा २६३ धावांचा एव्हरेस्ट
हिम्मतवाला.. हा एक शब्द ख्रिस गेलच्या लौकिकाला साजेसाच आणि आपल्या या बिरुदावलीला साजेशी श्वास रोखून धरणारी खेळी त्याने साकारली. ३० चेंडूंत तर त्याने शतक झळकावत प्रतिस्पध्र्यासह प्रेक्षकांच्या तोंडचेही पाणी पळवले. हा खरंच सामना सुरू आहे की पुन:प्रक्षेपण वाटावे, हृदयाचा ठोका चुकवणारे फटके त्याच्या बॅटमधून निघाले आणि पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांना त्याच्या पायाशी लोळण घालावी लागली. अवघ्या ६६ चेंडूंत १७ षटकार, १३ चौकारांसह त्याने सजवलेली सर्वाधिक नाबाद १७५ धावांची खेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. त्याच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सला पहिल्यांदा फलंदाजी करताना २६३ धावांचा एव्हरेस्ट उभारता आला.
या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पुण्याचा डाव १३३ धावांत आटोपला आणि बंगळुरूने १३० धावांनी सहजपणे विजय मिळवला.
पुणे वॉरियर्सने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. दुसऱ्याच षटकात गेलने आपल्या पोतडीतून चौकारांची माळ बाहेर काढत २१ धावांची लूट केली. यानंतर गेल थांबलाच नाही. त्याने ना गोलंदाज पाहिला ना चेंडू. आपल्या गुणवत्तेबरोबर ताकदीच्या जोरावर त्याने आयपीएलमध्ये बॅटच्या जोरावर एक नवा अध्याय लिहिला. आयपीएलमधला सर्वाधिक १७ षटकारांचा, सर्वात जलद शतक (३० चेंडूंत) ठोकण्याचा आणि संघाला सर्वाधिक धावा नोंदवून देण्याचा विक्रम रचला. शतक त्याने ३० चेंडूंत पूर्ण केल्यावर त्याचा खेळ थोडासा मंदावला, कारण १०० ते १५० हे अंतर पार करायला त्याला २३ चेंडू लागले. त्यानंतरही घणाघाती फटक्यांनी त्याने नाबाद १७५ धावांची खेळी सजवत संघाला २६३ धावा रचून दिल्या.
बंगळुरूच्या या आव्हानाचा पाठलाग करणे अशक्यप्राय होते आणि तेच पुण्याच्या बाबतीतही झाले. गेलच्या खेळीने पुण्याची पूर्णपणे हवा काढून टाकली होती. त्यामुळे धावांचा पाठलाग करण्याच्या नादात पुण्याचे फलंदाज ठरावीक फरकाने बाद होत राहिले आणि अपेक्षेनुरूप त्यांना सामना गमवावा लागला.
संक्षिप्त धावफलक:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ५ बाद २६३ (ख्रिस गेल नाबाद १७५, तिलकरत्ने दिलशान ३३; अशोक दिंडा २/४८) विजयी वि. पुणे वॉरियर्स : २० षटकांत ९ बाद १३३ (स्टीव्हन स्मिथ ४१; ख्रिस गेल २/५) सामनावीर : ख्रिस गेल.
महेंद्र सिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार
आयुष्यात योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. ख्रिस गेलला फलंदाजी करताना बघून मी यष्टीरक्षक होण्याचा योग्य निर्णय घेतला असे वाटते.