प्रेक्षक आणि प्रायोजकांचा घटणारा पाठिंबा यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा रद्द करण्याच्या मार्गावर आहे. या स्पर्धेमुळे निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी बीसीसीआयने मिनी आयपीएलचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या या छोटय़ा प्रारूपाची चाचणी संयुक्त अरब अमिरातीत होणार आहे.
चॅम्पियन्स लीग स्पर्धा क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय यांचा संयुक्त उपक्रम आहे. या स्पर्धेत आयपीएलमधील चार संघ, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतील दोन तसेच दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील दोन संघ यांच्यासह श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील ट्वेन्टी-२० संघ सहभागी होतात. मात्र तुलनेने अपरिचित खेळाडू, प्रमुख भारतीय खेळाडूंची अनुपस्थिती यामुळे सुरुवात झाल्यापासून या स्पर्धेला प्रायोजकांचा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा लाभला नाही. त्यातच स्पर्धेचे प्रक्षेपण हक्क असणाऱ्या स्टार समूहानेदेखील ही स्पर्धा म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे, असे स्पष्ट केल्याने बीसीसीआयने अखेर चॅम्पियन्स लीग स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघटनांना कळवल्याचे समजते.
चॅम्पियन्स लीगऐवजी आता मिनी आयपीएल आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. आठव्या हंगामात बाद फेरीत प्रवेश केलेल्या चार संघांमध्ये ही स्पर्धा होईल. साखळी सामने आणि त्यानंतर बाद फेरी असे स्पर्धेचे स्वरूप आहे. आयपीएलचा आठवा हंगाम संपल्यानंतर या नव्या स्पर्धेचे स्वरूप निश्चित करण्यासाठी बैठक होणार आहे. मान्सून कालावधीत ही स्पर्धा नियोजित असल्याने तसेच संयुक्त अरब अमिरातीने याआधी आयपीएलचे आयोजन यशस्वीपणे केल्याने नव्या स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीला प्राधान्य मिळाले आहे. नव्या स्पर्धेत आयपीएल मधलेच चार संघ असल्याने प्रेक्षक आकृष्ट होतील असा विश्वास बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केला.