भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) आयपीएलच्या ढंगातील आणखी एक ‘मिनी आयपीएल’ स्पर्धा सुरू करण्याच्या विचारात आहे. आयपीएलसारख्या ट्वेन्टी-२० स्पर्धेप्रमाणेच इतर देशांत स्थानिक पातळीवर होणाऱया ट्वेन्टी-२० स्पर्धांच्या अंतिम विजेत्या संघांमध्ये रंगणाऱया ‘चॅम्पियन्स लीग टी-२०’ स्पर्धेचा कायापालट करण्याचा विचार बीसीसीआयने सुरू केला आहे. गेल्या काही वर्षांपासून चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेची लोकप्रियता ढासळत चालली असल्याने या स्पर्धेला देखील आयपीएल स्पर्धेसारखा मनोरंजक मुलामा देण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. यादृष्टीने प्रयत्न देखील सुरू असल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
भारत, ऑस्ट्रेलिया आणि द.आफ्रिका हे तीन देश चॅम्पियन्स लीग टी-२० चे संयुक्त मालक आहेत. यंदाच्या मोसमात ही स्पर्धा संपुष्टात आणून त्याजागी आयपीएल-२ नावाची नवी स्पर्धा सुरू करण्याबाबत बीसीसीआयचे नवे सचिव अनुराग ठाकूर यांनी ऑस्ट्रेलिया आणि द.आफ्रिका क्रिकेट मंडळांशी संपर्क साधल्याचेही समजते.
क्रिकेट रसिकांना आकर्षित करून घेण्यास चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा अपयशी ठरत आहे. या स्पर्धेला नवा साज देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून चॅम्पियन्स लीगऐवजी ‘आयपीएल-२’ सुरू करण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरून भारतीय चाहत्यांना या स्पर्धेशी चांगले जुळवून घेता येईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱयाने सांगितले. या स्पर्धेचे पहिले सात मोसम यूएईमध्ये यशस्वीरित्या पार पडल्यामुळे या नव्या स्पर्धेचे ठीकाण मात्र कायम राहणार आहे.