स्पर्धेच्या सुरुवातीला असातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने सलग चार विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. शुक्रवारी त्यांचा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जबरोबर त्यांच्याच मैदानात होत असला तरी विजयाचे पंचक साजरे करण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज आहे. या विजयासह मुंबईला बाद फेरीच्या दिशेन कूच करता येऊ शकते.
गेल्या सामन्यात मुंबईने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता. स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबईला चार पराभव स्वीकारावे लागले होते. पण त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केले असून १० सामन्यांमध्ये त्यांनी १० गुण कमावले आहेत. मुंबईच्या पुढे आता बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे प्रत्येकी ११ गुणांवर आहेत. त्यामुळे कोलकाताविरुद्धचा सामना त्यांनी जिंकल्यास ते बाद फेरीच्या दिशेने ठोस पाऊल टाकू शकतात. कर्णधार रोहित शर्मा, लेंडन सिमोन्स, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, पार्थिव पटेल हे कालांतराने चांगल्या फॉर्मात आले आहेत. गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जे. सुचित, मिचेल मॅक्लेघन भेदक गोलंदाजी करत आहेत.
चेन्नईच्या संघाने आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये ब्रेंडन मॅक्क्युलम, सुरेश रैना, ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो यांनी दमदार फलंदाजी केली आहे. गोलंदाजीमध्ये आशीष नेहरा, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा, पवन नेगी यांनी छाप पाडली आहे.