‘आयपीएल स्पॉट फिक्सिंग’प्रकरणी अटकेत असलेल्या श्रीशांतने ‘एफआयआर’च्या प्रतीसाठी दिल्ली न्यायालयाकडे अर्ज केला होता. परंतु त्यावरील सुनावणीसाठी त्याचे वकील अनुपस्थित राहिल्याने व प्रत देण्याच्या मागणीसाठी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावाच न केला गेल्याने अखेर दिल्ली न्यायालयाने श्रीशांतचा अर्ज निकाली काढला.
‘एफआयआर’ देण्याबाबात श्रीशांतने केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. मात्र श्रीशांतच्या वतीने सुनावणीसाठी कुणीच वकील हजर न झाल्याने महानगर दंडाधिकारी गौरव राव यांनी त्याचा अर्ज निकाली काढला.  
श्रीशांतसह ‘राजस्थान रॉयल्स’च्या अंकित चव्हाण आणि अजित चंडीला या दोन खेळाडूंना गेल्या १६ मे रोजी ‘स्पॉट फिक्सिंग’प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीशांतच्या वकिलांनी ‘एफआयआर’ची प्रत मिळण्याकरिता मुख्य महानगरदंडाधिकारी लोकेश कुमार शर्मा यांच्याकडे अर्ज केला होता. परंतु प्रकरण अतिरिक्त महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले.  
दरम्यान, श्रीशांत आणि अन्य आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्यांना कोठडीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. त्या वेळी दिल्ली पोलिसांकडून आणखी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येते की त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती करण्यात येते हे मंगळवारीच कळेल. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंतच्या चौकशीत श्रीशांत आणि अन्य आरोपींकडून काय खळबळजनक माहिती पुढे आली याबाबतही मंगळवारी खुलासा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जर दिल्ली पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली, तर श्रीशांत आणि अन्य आरोपी तात्काळ जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.