बाद फेरीसाठी पाच संघ शर्यतीत आहेत. या संघांच्या समीकरणात बाद फेरीतले आपले स्थान हिरावले जाऊ नये हे ध्यानात घेत चेन्नईने पंजाबवर सहज विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल क्रमांक आणि बाद फेरीतील स्थान सुरक्षित केले. चेन्नईने पंजाबला १३० धावांवर रोखले आणि अडखळत सुरुवातीनंतरही सहजपणे हे लक्ष्य गाठत सुरेख विजय मिळवला.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. ड्वेन स्मिथच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला माइक हसी पहिल्याच षटकात तंबूत परतला. संदीप शर्माने त्याला बाद केले. हंगामातील शेवटचा सामना खेळणारा धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम केवळ ६ धावांवर तंबूत परतला. ब्युऑन हेन्ड्रिक्सने त्याला त्रिफळाचीत केले. २ बाद १० अशी स्थिती झालेल्या चेन्नईचीही घसरण होणार असे चित्र होते. मात्र सुरेश रैना आणि फॅफ डू प्लेसिस यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची संयमी भागीदारी करीत चेन्नईच्या विजयाची पायाभरणी केली. या जोडीने पंजाबला चमत्काराची कोणतीही संधी दिली नाही. अर्धशतकानंतर डू प्लेसिस रिशी धवनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.  डू प्लेसिस बाद झाल्यानंतर रैनाला कर्णधार महेंद्रसिंग धोनीची साथ मिळाली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी  ३२ धावा फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रैनाने नाबाद ४१, तर धोनीने २५ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी हा निर्णय आपल्यासाठी अनुकूल ठरवला. डावाच्या सुरुवातीलाच फिरकीपटूला गोलंदाजी देण्याचा प्रयोग फलदायी ठरला. पवन नेगीने वृद्धिमान साहाला बाद केले. त्याने ४ धावा केल्या. फॉर्मसाठी झगडणाऱ्या सहकाऱ्यांना बाजूला सारत कर्णधार जॉर्ज बेली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र तापातून बरे होत पुनरागमन करणाऱ्या आशीष नेहराने बेलीला माघारी धाडले. त्याला १२ धावा करता आल्या. दुसऱ्या बाजूने ईश्वर पांडेने आक्रमक फलंदाज मनन व्होराला तंबूचा रस्ता दाखवला.
३ बाद ३५ अशी घसरण झालेल्या पंजाबच्या डावाला गुरकीरत सिंग आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सावरले. हे दोघे स्थिरावले असे वाटत असतानाच रविचंद्रन अश्विनने गुरकीरतला बाद केले. त्याने १५ धावा केल्या. पाठोपाठ रवींद्र जडेजाने मॅक्सवेलला बाद केले.  हंगामात उशिरा सूर गवसलेल्या डेव्हिड मिलरला नेगीने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने ११ धावा केल्या. यानंतर अक्षर पटेल आणि रिशी धवन यांनी सातव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करीत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. ड्वेन ब्राव्होने अक्षर पटेलची ३२ धावांची खेळी संपुष्टात आणली. रिशी धवनने नाबाद २५ धावा केल्या. पंजाबने फक्त १३० धावांची मजल मारली.  पवन नेगीने २५ धावांत २ बळी घेतले.  
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ७ बाद १३० (अक्षर पटेल ३२, रिशी धवन २५, पवन नेगी २/२५) पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स : १६.५ षटकांत ३ बाद १३४ (फॅफ डू प्लेसिस ५५, सुरेश रैना ४१, संदीप शर्मा १/९)
सामनावीर : पवन नेगी

फॅफ डू प्लेसिस
५५ धावा
४१ चेंडू
०५ चौकार
०१ षटकार