नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय- प्रचंड धावसंख्या उभारायची आणि या मोठय़ा लक्ष्याच्या बळावर नियमित विकेट्स घेत सामना जिंकणे ही क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील हमखास विजयाची त्रिसूत्री. या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करत चेन्नई सुपर किंग्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९७ धावांनी विजय मिळवला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावांचा डोंगर उभारला. या  लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने नांगी टाकली. रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विनला गवसलेला सूर हे चेन्नईच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.
 लक्ष्याचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग, शॉन मार्श आणि जॉर्ज बेली पहिल्या सहा षटकांतच तंबूत परतले. मोठे फटके खेळण्याच्या नादात डेव्हिड मिलर आणि मुरली विजय यांनी आपल्या विकेट फेकल्या. पंजाबने ९५ धावांची मजल मारली. मुरली विजयने ३४ धावा केल्या.  तत्पूर्वी ड्वेन स्मिथ आणि मॅक्क्युलम यांनी ५० धावांची सलामी दिली. २६ धावांवर स्मिथ बाद झाला.  मॅक्क्युलमने ४४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. रैनाने २९ धावा केल्या. कर्णधार धोनीने जडेजाला हाताशी घेत  ४८ धावांची भागीदारी केली. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडूंनी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ३ बाद १९२ (ब्रेंडन मॅक्क्युलम ६६, महेंद्रसिंग धोनी ४१, अक्षर पटेल १/३५) विजयी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ९ बाद ९५ (मुरली विजय ३४, रवींद्र जडेजा ३/२२, रवीचंद्रन अश्विन २/१४)
सामनावीर : ब्रेंडन मॅक्क्युलम