कामगिरीत सातत्यपणा नसला तरी काही विजयांमुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ स्पर्धेत कायम आहे, पण आव्हान टिकवण्यासाठी ते प्रयत्नशील असून त्यांना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल.
गेल्या सामन्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवत त्यांनी आपले आव्हान शाबूत ठेवले होते. सध्याच्या घडीला ते पाचव्या स्थानावर असून त्यांना बाद फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी हा सामना चांगली संधी असू शकते. आतापर्यंत डेव्हिड वॉर्नरने दमदार फलंदाजी करत संघाला तारले असले तरी गेल्या सामन्यात शिखर धवन आणि ईऑन मॉर्गन यांनी धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला होता, त्यामुळे या सामन्यात त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या असतील. गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार, इशांत शर्मा असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाज आहेत. पण यापुढील सामन्यांमध्ये ते वेगाचा सम्राट असलेल्या डेल स्टेनला संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
दिल्लीला स्पर्धेच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करता आली नसली तरी सध्याच्या घडीला युवराज सिंग, अँजेलो मॅथ्यूज चांगल्या फॉर्मात आले आहेत. त्याचबरोबर कर्णधार जे.पी. डय़ुमिनी आणि श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्मात आहे. वेगवान गोलंदाज झहीर खान आणि गुरविंदर संधू यांना आतापर्यंत छाप पाडता आलेली नाही. ११ सामन्यांमध्ये दिल्लीच्या खात्यामध्ये ८ गुण जमा असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे. दिल्लीचे तीन सामने बाकी असून यामध्ये त्यांना मोठय़ा फरकाने विजय मिळवणे अनिवार्य असेल.

प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली डेअरडेव्हिल्स-जेपी डय़ुमिनी (कर्णधार), युवराज सिंग, क्विंटन डि कॉक, मयांक अगरवाल, नॅथन कोल्टिअर नील, डॉमिनिक जोसेफ, चिदंबरम गौतम, इम्रान ताहीर, श्रेयस अय्यर, केदार जाधव, झहीर खान, अँजेलो मॅथ्यूज, अमित मिश्रा, अल्बी मॉर्केल, मनोज तिवारी, सौरभ तिवारी, जयदेव उनाडकत, जयंत यादव.
सनरायझर्स हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, रवी बोपारा, इऑन मॉर्गन, ट्रेंट बोल्ट, मॉइझेस हेन्रिके, भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार, नमन ओझा, लोकेश राहुल, इशांत शर्मा, करण शर्मा, लक्ष्मीरतन शुक्ला, डेल स्टेन, केन विल्यमसन.
सामन्याची वेळ : रात्री ८.०० वा.पासून
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी मॅक्स