*   चेन्नई सुपर किंग्जचा ८६ धावांनी विजय
*   माइक हसीची नाबाद ६५ धावांची खेळी
दिल्ली डेअरडेव्हिल्सची पराभवाची साडेसाती पिच्छा सोडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे दिल्लीला चेन्नई सुपर किंग्जकडून सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. १७० धावांचे आव्हान पेलताना दिल्लीचा डाव ८३ धावांवर संपुष्टात आणत चेन्नईने ८६ धावांनी दणदणीत अशा तिसऱ्या विजयाची नोंद केली. पराभवामुळे दिल्लीचे आयपीएलच्या सहाव्या मोसमातील आव्हान खडतर झाले आहे.
चेन्नईच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. दिल्लीचे आशास्थान असलेला डेव्हिड वॉर्नर (१) याचा मोहित शर्माने त्रिफळा उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच षटकांत मोहितने मनप्रीत जुनेजाला (२) पायचीत केले. वीरेंद्र सेहवाग आणि कर्णधार महेला जयवर्धने या अनुभवी फलंदाजांकडून मोठय़ा अपेक्षा असताना दोघांनीही निराशा केली. सेहवाग (१७) आणि जयवर्धने (१) लागोपाठच्या चेंडूंवर माघारी परतल्याने दिल्लीची अवस्था ४ बाद ३० अशी केविलवाणी झाली. तेव्हाच दिल्लीचा पराभव होणार, असे चित्र दिसू लागले. जीवन मेंडिस आणि केदार जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी ३१ धावांची भर घालून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण मेंडिस (१२) बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला. तळाच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. अखेर दिल्लीचा डाव ८३ धावांवर गडगडला. केदार जाधवने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. चेन्नईकडून मोहित शर्माने तीन तर रवीचंद्रन अश्विनने दोन बळी मिळवले.
तत्पूर्वी, माइक हसीचे धडाकेबाज नाबाद अर्धशतक आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २३ चेंडूंत साकारलेल्या ४४ धावांच्या वेगवान खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ४ बाद १६९ धावांचे आव्हान उभे केले. हसीने ५० चेंडूंत ६६ धावांची लाजवाब खेळी साकारताना ६ चौकार आणि २ षटकार खेचले. सुरेश रैनानेही ३२ चेंडूंत ५ चौकारांसह ३० धावांचे योगदान दिले.
नाणेफेक जिंकल्यावर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मुरली विजय आणि हसी दोघांनीही दमदार प्रारंभ केला. उमेश यादवया पहिल्या षटकात विजयने दोन चौकार मारले. या दोघांनी ३० धावांची सलामी नोंदवली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने ही जोडी फोडली. त्यानंतर रैनाने मॉर्केलला कव्हरच्या दिशेने चौकार मारत आपला इरादा स्पष्ट केला. दिल्लीचा कप्तान महेला जयवर्धनेने गुरुवारी प्रथमच वीरेंद्र सेहवागला गोलंदाजीची संधी दिली.
धोनी एस. बद्रीनाथऐवजी चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरला आणि त्याने दिल्लीच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले. धोनीला १९ धावांवर जीवदान मिळाले होते, त्याचा त्याने फायदा उचलला. यादवच्या गोलंदाजीवर लाँग ऑफला अजित आगरकरने त्याचा झेल सोडला. धोनी आणि हसी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद १६९ (मायकेल हसी नाबाद ६६, महेंद्रसिंग धोनी ४४; उमेश यादव १/३३) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १७.३ षटकांत सर्व बाद ८३ (वीरेंद्र सेहवाग १७, केदार जाधव ३१; मोहित शर्मा ३/१०, आर. अश्विन २/१८)
सामनावीर : मायकेल हसी.