संघात युवराज सिंग, झहीर खान, जे.पी.डय़ुमिनी, अँजेलो मॅथ्यूजसारखे दिग्गज असले तरी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या गोटामध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. कारण आयापर्यंतच्या सहा पराभवानंतर त्यांचे स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले असून कोलकाता नाइटरायडर्सविरुद्धचा गुरुवारचा सामना त्यांच्यासाठी करो या मरो, असाच असणार आहे. दुसरीकडे हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात होणार असून गतविजेत्यांनी आतापर्यंत ईडन गार्डन्सवर दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे दिल्लीसाठी हा सामना नक्कीच खडतर असेल.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताच्या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून ते ११ गुणांनिशी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर आता घरच्या मैदानात त्यांचे दोन सामने राहिले असून हा सामना जिंकून कोलकाताला बाद फेरीच्या दिशेने कूच करता येणार आहे. गोलंदाजीमध्ये सुनील नरीनसारखा अव्वल फिरकीपटू नसला तरी ऑस्ट्रेलियाचा बॅड्र हॉग आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी करत आहे. फलंदाजीमध्ये रॉबिन उथप्पा आणि गंभीर चांगली कामगिरी करत असले तरी युसूफ पठाण, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव यांना अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही.
ईडन गार्डन्सच्या संथ खेळपट्टीवर दिल्लीने इम्रान ताहीर आणि अमित मिश्रा यांना संधी दिल्यास हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडू शकतो. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात युवराज सिंगने अर्धशतक झळकावत संघाची कमान सांभाळली होती, त्याच्याकडून कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा असेल. मुंबईकर श्रेयस अय्यर आणि कर्णधार डय़ुमिनी यांनी आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखले असले तरी अन्य फलंदाजांना मात्र छाप पाडता आलेली नाही. संघात एकामागून एक चांगले खेळाडू असले तरी दिल्लीला अजूनपर्यंत लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. कोलकाताविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा असून हा सामना गमावल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
वेळ : रात्री ८.०० वा. पासून
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी पिक्स वाहिनीवर.

आम्ही सामना जिंकायला हवा होता- युवराज
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अखेर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या युवराज सिंगला सूर गवसला. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने दीडशे धावांपर्यंत मजल मारत मुंबईची ४ बाद ४० अशी अवस्थाही केली होती. पण दिल्लीला हा सामना गमवावा लागला आणि हा पराभव युवराजच्या जिव्हारी लागला. मुंबईचे चार फलंदाज झटपट बाद केल्यावर आम्ही हा सामना जिंकायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्याने
दिली. ‘‘आम्ही मुंबईची ४ बाद ४० अशी अवस्था केली होती. त्यानंतर अन्य फलंदाजांना गुंडाळून आम्ही हा सामना जिंकायला हवा होता, पण आम्ही हा सामना गमावला. पाऊस आणि दवामुळे बॅटवर चेंडू सहजपणे येत होता आणि त्याचाच फायदा मुंबईला झाला. मुंबईनेही ४ फलंदाज गमावल्यावर चांगला खेळ केला,’’ असे युवराज म्हणाला.