*पुणे वॉरियर्सवर १५ धावांनी विजय
*डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी
विजयासाठी मिळालेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना पुण्याला आरोन फिन्च आणि रॉबिन उथप्पा यांनी दमदार सलामी दिली. ७६ धावांच्या सलामीनंतर हे दोघेही ठरावीक अंतराने बाद झाले. यानंतर युवराज सिंग आणि ल्युक राइट यांनी अर्धशतकी भागीदारी करत पुण्याच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र उमेश यादवने एकाच षटकांत या दोघांना माघारी धाडत विजयाचे पारडे दिल्लीकडे झुकवले. स्टीव्हन स्मिथने विजयी चमत्काराची आशा दाखवली मात्र ती पुरेशी ठरली नाही आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने रायपूरच्या नव्या शहीद वीर नारायण सिंग मैदानावरील पहिल्याच लढतीत १५ धावांनी निसटता विजय मिळवला.
१६५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य मिळालेल्या पुण्याला बऱ्याच कालावधीनंतर चांगली सलामी मिळाली. रॉबिन उथप्पा आणि फिन्च या जोडगोळीने ७६ धावांची सलामी दिली. ही जोडी डेअरडेव्हिलसाठी डोकेदुखी ठरणार, असे वाटत असतानाच इरफान पठाणने दोन धावांच्या अंतरात दोघांनाही बाद केले. उथप्पाने ३३ चेंडूत ४ चौकारांसह ३७ धावा केल्या तर फिन्चने ३३ चेंडूत ५ चौकारांसह ३७ धावा केल्या. यानंतर युवराज सिंग आणि ल्युक राइट जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र उमेश यादवने एकाच षटकांत या दोघांना माघारी धाडत पुण्याला अडचणीत टाकले. युवराजने ३१ तर राइटने १९ धावा केल्या. युवराज बाद झाला तेव्हा पुण्याला १२ चेंडूत ३५ धावांची आवश्यकता होती. खेळपट्टीवर स्थिरावलेले दोन्ही खेळाडू बाद झाल्याने पुण्याच्या विजयाच्या आशा मावळल्या. स्टीव्हन स्मिथने ७ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १७ धावा फटकावल्या मात्र पुण्याला विजयासाठी त्या पुरेशा नव्हत्या. दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे इरफान पठाण आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी डेव्हिड वॉर्नरच्या २५ चेंडूतील ५१ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने १६४ धावांची मजल मारली. वीरेंद्र सेहवागने उन्मुक्त चंदसह दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने बेन रोहररच्या साथीने डाव सावरला. अभिषेक नायरने रोहररला बाद करत ही जोडी फोडली. केदार जाधव आणि वॉर्नरने पाचव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. केदार २५ धावा करून दिंडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉर्नरने ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५१ धावांची खेळी केली.
 
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ५ बाद १६४ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ५१, वीरेंद्र सेहवाग २८, केदार जाधव २५; अशोक दिंडा ३/३१) विजयी विरुद्ध विरुद्ध पुणे वॉरियर्स : २० षटकांत ४ बाद १४९ (रॉबिन उथप्पा ३७, एरॉन फिन्च ३७; उमेश यादव २/२४, इरफान पठाण २/२९)
 सामनावीर : डेव्हिड वॉर्नर
                   संघ            सा    वि    हा    गु
चेन्नई सुपर किंग्स              ९      ७    २    १४
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू             ९                ६          ३    १२
राजस्थान रॉयल्स              ८               ५    ३    १०
मुंबई इंडियन्स              ८              ५    ३     १०
सनरायजर्स हैदराबाद             ९            ५    ४    १०
किंग्स इलेव्हन पंजाब            ८              ४    ४    ८
कोलकाता नाइट रायडर्स       ९              ३    ६    ६
दिल्ली डेअरडेव्हिल्स              ९              २    ७    ४
पुणे वॉरियर्स                        ९              २    ७    ४