* दिल्लीची विजयाची बोहनी
* मुंबईवर ९ विकेट्सनी मात
* वीरूची नाबाद ९५ धावांची झंझावाती खेळी
त्याला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला.. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातल्या सुरुवातीच्या काही सामन्यांत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही.. संघात परतल्यानंतरही त्याचा खेळ ही डेअरडेव्हिल्सची चिंता ठरली, पण जेव्हा तो बरसला तेव्हाच दिल्ली डेअरडेव्हिल्सने हंगामातला पहिलावहिला विजय साजरा केला. १६१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य मिळालेले असताना वीरेंद्र सेहवागरूपी वादळासमोर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. सेहवागने ५७ चेंडूत २ षटकार आणि १३ चौकारांसह नाबाद ९५ धावांची तुफानी खेळी करत दिल्लीची पराभवाची मालिका संपवली. त्याला यथार्थपणे साथ दिली ती माहेला जयवर्धनेने. जयवर्धनेने नेहमीच्या कलात्मक शैलीत ८ चौकार आणि एका षटकारासह ४३ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. जय-वीरूच्या शोलेमुळे मुंबई इंडियन्सला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
या जोडीने पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची खंबीर सलामी देत विजयाची पायाभरणी केली. लसिथ मलिंगा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग, ड्वेन स्मिथ या प्रमुख गोलंदाजांना सेहवागने आपल्या बॅटचा प्रसाद दिला. ही जोडी फोडण्यासाठी रिकी पॉन्टिंगने गोलंदाजीत सातत्याने बदल केले, मात्र सेहवागच्या तडाखेबंद खेळीसमोर मुंबई इंडियन्सचे सर्व इरादे निष्प्रभ ठरले. ड्वेन स्मिथच्या गोलंदाजीवर एक धाव घेत सेहवागने यंदाच्या हंगामातल्या पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. अर्धशतकानंतर आणखी आक्रमक होत सेहवागने दिल्लीला १८ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा या मुंबईकरांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दीडशे धावांची मजल मारली. फॉर्मात नसलेल्या रिकी पॉन्टिंगने स्वत:ऐवजी ड्वेन स्मिथला सलामीला धाडले. मात्र हा प्रयोग अयशस्वी ठरला. रोलएफ व्ॉन डर मव्‍‌र्हने स्मिथला (८) बाद केले. सचिनचा एक स्ट्रेट ड्राइव्ह गोलंदाज उमेश यादवच्या हाताला लागून यष्टींवर आदळल्याने दिनेश कार्तिक तंबूत परतला.
२ बाद २२ अशा स्थितीतून सचिन-रोहित जोडीने मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. आक्रमण आणि बचाव यांचा अचूक मिलाफ साधत या जोडीने धावफलक हलता ठेवला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. इरफान पठाणच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करत रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. आगरकरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत सचिनने अर्धशतकाची वेस ओलांडली. मात्र फटकेबाजीच्या नादात उमेश यादवच्या गोलंदाजीवर वॉर्नरकडे झेल देऊन तो बाद झाला. सचिन बाद झाल्यावर रोहितने आणखी फटक्यांची पोतडी उघडली. उमेश यादवने त्याची खेळी संपुष्टात आणली. रोहितने ५ चौकार आणि ५ षटकारांसह ४३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. कीरॉन पोलार्डने १० चेंडूत १९ धावांची उपयुक्त खेळी केली. दिल्लीतर्फे उमेश यादवने सर्वाधिक २ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
 मुंबई इंडियन्स : २० षटकांत ४ बाद १६१ (रोहित शर्मा ७३, सचिन तेंडुलकर ५४, उमेश यादव २/३१) पराभूत विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : १७ षटकांत १ बाद १६५ (वीरेंद्र सेहवाग नाबाद ९५, माहेला जयवर्धने ५९, लसिथ मलिंगा १/२६)
सामनावीर : वीरेंद्र सेहवाग
युवराज सिंग, पुणे वॉरियर्सचा फलंदाज
राहुल द्रविड १९९१ साली रॉजर बिन्नी यांच्याबरोबर रणजी करंडक खेळला होता आणि आता त्यांचा मलगा म्हणजे स्टुअर्टबरोबर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे.