*  दिल्लीचा कोलकात्यावर सात विकेट्सने विजय
* वार्नरची दणकेबाज अर्धशतकी खेळी
भेदक गोलंदाजी आणि डेव्हिड वॉर्नरच्या दणकेबाज नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने अखेर स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला. अचूक मारा करत दिल्लीने कोलकाता नाइट रायडर्सला १३६ धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला सुरुवातीला दुहेरी धक्के बसले. परंतु वॉर्नरने उन्मुक्त चंदच्या साथीने संघाला कोलकातावर ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
कोलकाताच्या १३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने वीरेंद्र सेहवाग (१७) आणि कर्णधार महेला जयवर्धने (५) यांना अवघ्या २७ धावांमध्ये गमावले. २ बाद २७ अशी धावसंख्या असताना कोलकाताचा संघ आता वरचढ होईल असे वाटत होते. पण वॉर्नर आणि चंद यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचत संघाला विजयपथावर नेले. बाद होण्यापूर्वी उन्मुक्तने ४ चौकारांच्या मदतीने ३७ धावांची खेळी साकारली. वॉर्नरच्या दणकेबाज खेळीची प्रचिती पुन्हा एकदा सर्वाना आली. वॉर्नरने ४२ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ६६ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या कोलकाताला दिल्लीने भेदक गोलंदाजी करत १३६ धावांवर रोखण्यात यश मिळवले. दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार गौतम गंभीरला (०) इरफान पठाणने धावचीत करत पहिला धक्का दिला आणि या धक्क्यातून कोलकाताचा संघ सावरू शकला नाही. मोठे फटके मारण्याच्या नादात त्यांचे एकामागून एक बिनीचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांची १६व्या षटकात ६ बाद ८४ अशी अवस्था झाली. त्यानंतर रजत भाटीया आणि सुनील नरवाल (२३) यांनी सातव्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी रचत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. भाटीयाने २६ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने डावातील सर्वाधिक नाबाद २६ धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटकांमध्ये ब्रेट ली याने ६ चेंडूंत २ षटकारांच्या मदतीने नाबाद १६ धावांची खेळी साकारल्यामुळे कोलकात्याला १३६ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट राडयर्स : २० षटकांत ७ बाद १३६ (रजत भाटीया नाबाद २६, सुनील नरवाल २३; उमेश यादव २/३६) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १७.५ षटकांत ३ बाद १३७ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ६२, उन्मुक्त चंद ३७; ब्रेट ली १/२६).
सामनावीर : डेव्हिड वार्नर.