01 October 2020

News Flash

आपत्ती व्यवस्थापन कुचकामी

दोषी खेळाडूंची गय करणार नाही, कलंकित खेळाडूंवर गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तातडीच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नंतर त्यांचा हताशपणा

| May 20, 2013 03:04 am

दोषी खेळाडूंची गय करणार नाही, कलंकित खेळाडूंवर गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तातडीच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नंतर त्यांचा हताशपणा साऱ्यांपुढे आला. हातामध्ये पुरेसे अधिकार नसल्याने स्पष्ट झाले. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची चौकशी समिती नेमण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतरच योग्य ती कारवाई करण्याचे संकेत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी आम्हाला खेळाडूंची चौकशी करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आपत्ती व्यवस्थापनाबरोबर आपली हतबलताही श्रीनिवासन यांनी व्यक्त केली.  रविवारचा पुणे वॉरियर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामना निश्चित असल्याचे कळल्यावर बीसीसीआयचे आपत्ती व्यवस्थापन कुचकामी असल्याचेच साऱ्यांपुढे आले.दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाचे मालक आणि व्यवस्थापनाने या तिन्ही दोषी खेळाडूंच्या विरोधात प्राथमिक तक्रार (एफआयआर) दाखल केली आहे.
बीसीसीआयतर्फे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख रवी सवानी यांची चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, या बैठकीसाठी आम्ही राजस्थान रॉयल्स संघाचे मालक आणि व्यवस्थापनाला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते आणि बैठकीमध्ये या प्रकरणाची माहिती देण्यास सांगितले होते. या वेळी राजस्थानकडून आम्हाला दोषी खेळाडूंविरोधात एफआयआर दाखल केल्याची माहिती दिली.
खेळाडूंच्या कारवाईबाबत श्रीनिवासन म्हणाले की, जोपर्यंत कोणीही दोषी आढळत नाही, तोपर्यंत त्याला निरागस असल्याचे समजले जाते. बीसीसीआय कोणालाही पाठिशी घालणार नाही, पण आमची कारवाई मात्र योग्य असेल. जर या प्रकरणात कोणीही दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही नक्कीच करू.
कारवाईबाबत श्रीनिवासन पुढे म्हणाले की, आम्ही चौकशी जलदगतीने करणार आहोत. दिल्ली पोलिसांकडून आम्ही या प्रकरणाची माहिती मागवणार आहोत, त्याचबरोबर सवानीही जलदगतीने चौकशी करून आम्हाला अहवाल सादर करतील आणि त्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू.
या प्रकरणानंतर आयपीएलबाबत काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीला २८ अधिकाऱ्यांसह अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री हे दोन्ही भारताचे माजी कर्णधार उपस्थित होते. या बैठकीमध्ये बीसीसीआयने आयपीएलच्या प्रत्येक संघाबरोबर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी ठेवण्याचा निर्णय घेतला असून खेळाडूंच्या मध्यस्थांनाही प्रमाणित केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत श्रीनिवासन म्हणाले की, सर्व खेळाडूंच्या मध्यस्थांना बीसीसीआय यापुढे प्रमाणित करेल. त्याचबरोबर आयपीएलच्या संघासोबत लाचलुचपत आणि सुरक्षा विभागाचे अधिकारीही असतील. हे अधिकारी खेळाडूंवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.
या वेळी आपली हतबलताही श्रीनिवासन यांना लपवता आली नाही. ते म्हणाले की, आमचेही हात कायद्याने काही प्रमाणात बांधले गेले आहेत. त्यामुळे खेळाडूंवर एका ठरावीक मर्यादेपर्यंत नियंत्रण राखता येऊ शकते, पण त्यानंतर मात्र आम्ही काहीच करूच शकत नाही, आम्ही हताश आहोत. सट्टेबाजांच्या कारवाईवर आमचे नियंत्रण नसल्याने हे सारे प्रकार रोखणे आमच्या हातात नाही.
दिल्ली पोलिसांकडून आतापर्यंत कोणतीच माहिती न मिळाल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘आम्हाला नियमांनुसारच वागावे लागेल, त्यामुळे या संदर्भातील माहिती देण्यासाठी आम्ही दिल्ली पोलिसांना विनंती केली आहे.
दोषी खेळाडूंविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, कारण हे खेळाडू राजस्थान रॉयल्स या संघाशी करारबद्ध आहेत. राजस्थानच्या संघाचे सहमालक मनोज बदाले या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी खेळाडूंविरुद्ध एफआयआर दाखल केल्याची माहिती आम्हाला दिली आहे.
 बीसीसीआयने माहिती अधिकाराच्या कक्षेत यावे, या माजी क्रीडामंत्री अजय माकन यांच्या वक्तव्यावर श्रीनिवासन यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, आमची खासगी संस्था आहे, आम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे माहिती अधिकाराच्या कक्षेत आम्ही येऊ शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2013 3:04 am

Web Title: desaster management worthless
टॅग Ipl,Sports
Next Stories
1 बीसीसीआयने माहिती अधिकाराच्या कक्षेत यावे
2 शेवटच्या स्थानाची नामुष्की पुण्याने टाळली
3 कोहलीची कमाल, बंगळुरू विजयी
Just Now!
X