पहिल्या टप्प्याचा झंझावात संपल्यानंतर आता सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे ती प्ले-ऑफ फेरीची. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन मातब्बर संघांमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ‘काँटे की टक्कर’ रंगणार आहे.
प्ले-ऑफ फेरीचा पहिला सामना मंगळवारी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर रंगणार असून साखळी फेरीत १६पैकी ११ सामने जिंकणारे मुंबई आणि चेन्नई हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे या सामन्याची रंगत आणखीनच वाढली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने धडाकेबाज कामगिरी करताना वानखेडे स्टेडियमवरील सर्व आठ सामने जिंकून घरच्या मैदानावर आम्हीच शेर असल्याचे दाखवून दिले. मात्र घरच्या मैदानावर संमित्र यश मिळालेल्या चेन्नई सुपर किंग्सने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत उत्कंठावर्धक झालेल्या लढतींमध्ये बाजी मारली. चेन्नईला साखळी फेरीत दोन्ही लढतीत पराभूत केल्याने या सामन्यात मुंबई इंडियन्सचे पारडे जड मानले जात आहे.
फिरोजशाह कोटलाच्या स्टेडियमवर फलंदाजांची खरी कसोटी लागणार असल्यामुळे हा सामना सचिन वि. अश्विन, धोनी वि. हरभजन, पोलार्ड वि. मोहित शर्मा आणि माइक हसी वि. ओझा असा रंगणार आहे. दुखापतीमुळे दोन सामन्यांना मुकलेला सचिन तेंडुलकर संघात परतणार असून तो सलामीला उतरण्याची अपेक्षा आहे. सचिनला १४ सामन्यांत आतापर्यंत फक्त २८७ धावाच करता आल्या आहेत. सचिन आणि ड्वेन स्मिथ या सलामीच्या जोडीकडून मुंबईला आक्रमक सुरुवातीची आशा आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये कायम आपल्या फलंदाजीची छाप पाडली असून या मोसमात आतापर्यंत त्याच्या खात्यात ५२६ धावा जमा आहेत. महत्त्वाच्या सामन्यात रोहितसह किरॉन पोलार्डची फलंदाजी बहरेल, अशी आशा चाहत्यांना आहे. गोलंदाजीत मिचेल जॉन्सन (२२ बळी) आणि हरभजन सिंग (१९ बळी) यांनी कामगिरीत सातत्य राखले आहे. पण चेन्नईविरुद्ध अनुभवी फिरकीपटू असलेल्या हरभजनला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता मुंबई इंडियन्समध्ये असली तरी कोणतेही आव्हान पार करण्याची ताकद चेन्नईमध्ये आहे.
चेन्नईच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या माइक हसी या मोसमात भलत्याच फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत ६४६ धावांची लयलूट केली आहे. सुरेश रैनानेही अपेक्षेप्रमाणे चेन्नईला निराश केलेले नाही. अशक्य परिस्थितीतून सामना खेचून आणत कर्णधार महेंद्रसिंग धोनी अनेक सामन्यात चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. एकापेक्षा सरस फलंदाज ताफ्यात असल्यामुळे चेन्नईची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजीत चेन्नई संघ ड्वेन ब्राव्होच्या कामगिरीवर अधिक अवलंबून आहे. ‘पर्पल कॅप’चा दावेदार समजल्या जाणाऱ्या ब्राव्होने २५ बळी मिळवले असून कठीण परिस्थितीत तो फलंदाजीतही उपयुक्त ठरत आहे. हरयाणाचा फिरकीपटू मोहित शर्माने पहिल्याच मोसमात सुरेख कामगिरी करून सर्वानाच प्रभावित केले आहे. १७ बळी मिळवणारा मोहित मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.