हैदराबादच्या उत्तल येथील राजीव गांधी स्टेडियमवर शिखर धवन तेजाने तळपला. धवनने आयपीएल हंगामातील दुसरे अर्धशतक झोकात साजरे केले. ५५ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारासह त्याने नाबाद ७३ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत हैदराबाद सनरायजर्सने बलाढय़ मुंबई इंडियन्सला ७ विकेट राखून पराभूत करण्याची किमया साधली.
मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजवाब कसोटी पदार्पण करणाऱ्या धवनने हनुमा विहारी (२३ चेंडूंत २५ धावा)सोबत तिसऱ्या विकेटसाठी ९.२ षटकांत ७४ धावांची भागीदारी रचली. याशिवाय कप्तान कुमार संगकाराने २१ धावा केल्या. त्यामुळेच फक्त १८ षटकांत सनरायजर्सला विजयाचे लक्ष्य पेलता आले.
त्याआधी, सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईच्या दिग्गज फलंदाजांना २० षटकांत फक्त ४ बाद १२९ धावसंख्येवर रोखले. वेगवान गोलंदाज इशांत शर्माने १५ धावांत २ तर लेग-स्पिनर अमित मिश्राने २४ धावांत २ बळी घेतले. करण शर्मा आणि डेल स्टेन यांनी आपल्या चार षटकांमध्ये प्रत्येकी २५ आणि २७ धावा देऊन मुंबईच्या धावगतीवर मर्यादा आणल्या.
मुंबई इंडियन्सला सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ यांनी ४ षटकांत ३१ धावांची सावध सलामी करून दिली. पाचव्या षटकात इशांतने सचिन तेंडुलकरचा (१४) त्रिफळा उडवला आणि मग फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकला भोपळाही फोडू दिला नाही. मग ड्वेन स्मिथ (३८), रोहित शर्मा (२२) यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अमित मिश्राने १३व्या षटकात या दोघांनाही तंबूची वाट दाखवली.
अंबाती रायुडूने ३४ धावांची उपयुक्त खेळी साकारली. याचप्रमाणे किरॉन पोलार्डने १९ चेंडूंत १४ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५० धावांची नाबाद भागीदारी रचली.
सनरायजर्सच्या खात्यावर आतापर्यंतच्या १० सामन्यांतील ६ विजयांसह १२ गुण जमा आहेत, तर ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. सलग तीन विजय मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सची वाटचाल हैदराबादने रोखली आहे. मुंबईचा संघ आता १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ४ बाद १२९ (ड्वेन स्मिथ ३८, रोहित शर्मा २२, अंबाती रायुडू ३४; इशांत शर्मा २/१५, अमित मिश्रा २/२४) पराभूत वि. सनरायजर्स हैदराबाद : १८ षटकांत ३ बाद १३० (शिखर धवन नाबाद ७३, कुमार संगकारा २१, हनुमा विहारी २५; धवल कुलकर्णी १/१३)
सामनावीर : इशांत शर्मा.
सुरेश रैना, चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज
पुणे वॉरियर्सविरुद्धच्या विजयाने आम्ही गुणतालिकेत अव्वल क्रमांक भक्कमपणे कायम ठेवला आहे. चेपॉकवर होणाऱ्या सामन्यात विजयात सातत्य राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू.